जिद्दीचं ‘यशस्वी’ प्रतीक !

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये गाजणाऱ्या नावांत आघाडीवर आहे तो ‘राजस्थान रॉयल्स’चा युवा ‘सेन्सेशन’ यशस्वी जैस्वाल…त्याच्या धडाकेबाज फलंदाजीइतकाच सलाम ठोकण्यासारखा आहे तो त्यानं या टप्प्यापर्यंत पोहोचताना केलेला जबरदस्त संघर्ष नि दाखविलेली विलक्षण जिद्द…
‘तो’ वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत दाखल झाला ती क्रिकेटच्या विश्वात भरारीची स्वप्नं घेऊनच…परंतु प्रत्यक्षात आपल्या ताटात काय संघर्ष वाढून ठेवलाय याची ‘त्याला’ जराही कल्पना नव्हती…मग ‘त्याच्या’वर प्रसंग आला तो ज्या घरात राहत होता तेथून हाकललं जाण्याचा नि मैदानातील एका तंबूत राहण्याचा…पोटाची खळगी भरण्यासाठी ‘त्यानं’ चक्क ‘पानी पुरी’ विकण्याचं कामही केलं…पण धीर व प्रयत्न या दोघांनाही सोडलं नाही…कधी कांदे-बटाटे सराईतपणे कापण्यात गुंतणाऱ्या ‘त्याच्या’ हातात विसावलेली बॅट आज चेंडूवर तलवारीसारखी चालू लागलीय अन् धावांच्या बरसातीमुळं ‘आयपीएल’मध्ये ‘त्याचा’ जबरदस्त बोलबाला चाललाय…जिद्दीचं मूर्तिमंत प्रतीक…यशस्वी जैस्वाल !
जैस्वाल मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही गावचा. तिथं त्याची प्रतिभा वाया जाईल असं सांगून वरिष्ठ खेळाडूंनी त्याला सूचवलं ते मुंबईत जाण्याचं. त्याचे वडील भूपेंद्र जैस्वाल हे एका लहान हार्डवेअर दुकानाचे मालक. मुंबापुरी ही काय चीज आहे ते माहीत असल्यानं वडील त्याला पाठविण्यास सुऊवातीला थोडे कचरू लागले होते. कारण यशस्वीकडे मुंबईत तग धरण्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असलेली जागा नव्हती…परंतु एक काका त्याच्या मदतीला धावून आले अन् त्यांनी यशस्वी जैस्वालला आपल्या घरी राहू देण्याच्या बदल्यात अट घातली ती ‘डेअरी’त मदत करण्याची. तो सरावासाठी जाण्यापूर्वी जागा साफ करायचा. परत आल्यावर खूप दमून जात असल्यानं त्याला पुन्हा दुकानात जाणं कठीण व्हायचं. त्यामुळं खूष नसलेल्या काकांनी एके दिवशी त्याला बाहेरचा रस्ता दाखविला…
घरात समस्या पाचवीलाच पुजलेल्या असल्यानं यशस्वीनं परत जाऊन कुटुंबाच्या त्रासात आणखी भर न घालण्याचं ठरविलं. काकांनी घराबाहेर काढल्याचं त्यानं कुटुंबियांना कळविलं देखील नाही. बॅगा भरल्या आणि तो थेट आझाद मैदानात येऊन तेथील एक क्लब चालविणाऱ्या इम्रान यांना भेटला. त्यांनी त्याला एका सामन्यात खेळण्याची संधी दिली अन् जैस्वालनं त्यात चांगली कामगिरी करून दाखविल्यानं ते त्याला त्यांच्या तंबूत राहण्याची परवानगी देण्यास तयार झाले…राहण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला, पण अडचणी संपल्या नव्हत्या. यशस्वी ज्या तंबूत राहायचा तिथं विजेची सोयही नव्हती. तंबू इतका गरम व्हायचा की, अनेकदा त्याला झोप येणं कठीण व्हायचं, तर पावसाळ्यात पाणी भरायचं. तिथं राहणारे माळीही दमदाटी करायचे, कधी कधी मारहाणही व्हायची…
तीन वर्षं तंबूत घालविल्यानंतर जैस्वालच्या जीवनात अनपेक्षितपणे कलाटणी देणारा क्षण चालून आला तो ज्वाला सिंग यांच्या भेटीनं…क्रिकेट प्रशिक्षक असलेल्या ज्वाला यांनी स्वत: काही कमी त्रास काढले नव्हते. त्यांनी यशस्वीला डिसेंबर, 2013 मध्ये एका स्पर्धेत फलंदाजी करताना पाहिलं अन् या मुलामध्ये अव्वल प्रतीचा खेळाडू बनण्याचे गुण दडलेत हे त्यांच्या पारखी नजरेनं लगेच ताडलं. जैस्वालच्या परिस्थितीची कल्पना आल्यानंतर लगेच त्यांनी त्याला सांगितलं, ‘पुन्हा कधीही कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, परंतु बदल्यात प्रचंड समर्पित वृत्तीनं क्रिकेटला वाहून घ्यायचं’…अन् यशस्वीनं त्यांना निराश केलं नाही…
आंतर-शालेय क्रिकेटमध्ये सातत्यानं काढलेल्या धावा आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीतर्फे इंग्लंडच्या दौऱ्यात मिळालेली संधी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या 16 वर्षांखालील संघाची दारं उघडी करून गेली. तेव्हापासून तो वेगानं प्रगतीच्या शिडीची एकेक पायरी चढत गेलाय…पुढं भारताच्या 19 वर्षांखालील संघात वर्णी लागून फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्यानं अक्षरश: जबरदस्त कामगिरी केली. तिथं त्यानं 88, नाबाद 105, 62, नाबाद 57, नाबाद 29 अन् 59 असा धावांचा पाऊस पाडला. यशस्वी सदर स्पर्धेतील सर्वाधिक धावा (400) काढणारा फलंदाज ठरून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा चषक चालून आला तो त्याच्याचकडे…
त्याआधी 2019 च्या डिसेंबर महिन्यात ‘राजस्थान रॉयल्स’नं ‘आयपीएल’च्या लिलावात यशस्वी जैस्वालला 2.4 कोटी ऊपयांना घेतलं अन् त्यांच्यातर्फे तीन वर्षं खेळल्यानंतर यंदा हा 21 वर्षीय डावखुरा सलामीवीर पूर्ण बहरात आलाय…आतापर्यंत 9 सामन्यांत 428 धावा जमवून तो ’ऑरेंज कॅप’च्या प्रमुख दावेदारांपैकी एक बनलाय…त्यात सर्वांत लक्षवेधी ठरलीय ती त्याची वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सविऊद्धची 62 चेंडूतील 124 धावांची धडाकेबाज खेळी. भलेही त्याचा संघ हरला, पण जैस्वालचा शानदार खेळ सर्वांची मनं जिंकून गेल्याशिवाय राहिला नाही…त्यात षटकार नि चौकारांची बरसात करताना दिसून आलेली त्याची विलक्षण ताकद हे त्या खेळीचं एक लक्षणीय वैशिष्ट्या…जोफ्रा आर्चरचा चेंडू तर त्यानं वानखेडेबाहेर भिरकावून दिला. यंदाच्या मोसमातील यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीत परिपक्वतेचं दर्शन घडतंय. तो पूर्ण आत्मविश्वासानं चेंडू ड्राईव्ह, कट आणि पूल करतोय…जैस्वाल 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचा असून चेंडू खेळताना या उंचीचा तसंच ‘क्रीज’चा तो पुरेपूर वापर करतोय !
‘यशस्वी’ प्रताप…
- ‘मुंबई इंडियन्स’विरुद्ध 124 धावांची खेळी करून यशस्वी जैस्वाल ‘आयपीएल’मध्ये भारतातर्फे न खेळलेल्या खेळाडूंपैकी सर्वांत जास्त धावा काढणारा फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम होता तो ‘पंजाब किंग्स’च्या पॉल वलथाटीच्या नावावर (नाबाद 120 धावा)…
- भारतातर्फे न खेळलेला अन् ‘आयपीएलमध्ये शतक ठोकणारा जैस्वाल आता पाचवा खेळाडू बनलाय…
- त्याचप्रमाणं तो ‘आयपीएल’मध्ये शतक ठोकणारा चौथा सर्वांत तरुण खेळाडू (वय 21 वर्षं 123 दिवस) ठरलाय. याबाबतीत अग्रक्रमांकावर आहे तो मनीष पांडे (19 वर्षे 253 दिवस)…
- यंदाच्या ‘आयपीएल’धील सर्वाधिक चौकार (56) हाणणारा फलंदाज ठरण्याचा मान त्यानं पटकावलाय. त्याशिवाय 18 षटकारही खेचलेत…
- मुंबईविरुद्धच्या यशस्वीच्या शतकात समावेश राहिला तो 16 चौकार व 8 षटकारांचा…त्यानं 90.32 इतक्या सरासरीनं धावा जमविताना मोडीत काढला तो सनथ जयसूर्यानं मुंबईतर्फे 9 चौकार नि 11 षटकारांच्या साहाय्यानं नाबाद 114 धावा काढताना नोंदविलेला 89.47 हा सरासरीचा उच्चांक…
- घरगुती क्रिकेटमध्ये देखील यशस्वी जैस्वाल हे नाव काही कमी दणाणलेलं नाहीये. त्यात तिन्ही प्रकारांमध्ये तो खेळलेला असून 2019 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या खात्यावर जमा झालीत ती 15 शतकं आणि 16 अर्धशतकं…
उदरनिर्वाहासाठी ‘पानी पुरी’ विकण्याचा प्रसंग…
तंबूत दिवस काढताना प्रत्येक सामन्यामागं यशस्वी जैस्वालला 200-300 रुपये मिळायचे. पण तेवढ्यानं भागणारं नव्हतं. त्यामुळं तो उदरनिर्वाहासाठी ‘पानी पुरी’ विकू लागला…‘राम लीलाच्या वेळी मला चांगली कमाई व्हायची. पण मी प्रार्थना करायचो की, माझे सहकारी ‘पानी पुरी’ खाण्यासाठी तेथे येऊ नयेत. कधी कधी ते यायचे अन् मला त्यांची सेवा करताना वाईट वाटायचं’, जैस्वाल सांगतो…
प्रशिक्षक ज्वाला सिंगची मोलाची भूमिका…
यशस्वी जैस्वालची कारकीर्द पूर्णपणे बदलली ती प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याला पंखाखाली घेतल्यानंतर…ते स्वत: 1995 मध्ये मुंबईत आले होते क्रिकेटपटू बनण्याच्या ध्येयापायी. पण दुखापती आडव्या आल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली…17 डिसेंबर, 2013 रोजी आझाद मैदानावर, यशस्वी त्यांना भेटला तेव्हा तो 12 वर्षांचा. ज्वालांना त्याची कहाणी ऐकून दया आली आणि त्यांनी त्याला आंतर-शालेय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल विचारलं. ते आकडे त्यांना आवडले अन् तो एक चांगला खेळाडू असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला थेट घरीच नेलं. पुढील आठ वर्षं तो कुटुंबातील सदस्याप्रमाणं त्यांच्याबरोबर राहिला…‘मी क्रिकेटचं वेड असलेल्या व्यक्तीच्या शोधात होतो. मला यशस्वीमध्ये ते दिसलं अन् त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. त्याची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे तो स्वत:शी आणि खेळाशीही प्रामाणिक आहे’, ज्वाला म्हणतात…
जड प्लास्टिक चेंडूनं सराव…
प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यंदाच्या ‘आयपीएल’साठी यशस्वी जैस्वालला सिमेंटच्या खेळपट्टीवर जड प्लास्टिकच्या चेंडूंना सामोरं जायला लावून दररोज अनेक तास सराव करायला लावला. ज्वालांनी त्याच्यावर मारा केला तो बाउन्सर अन् आखूड टप्प्याच्या चेंडूंचा. चेंडू रॉकेटसारखा यायचा अन् काही वेळा यशस्वीच्या छातीवर, मांडीवर, तर कधी हातावर आणि खांद्यावर आदळायचा. पण वेदना त्याला मागं हटवू शकल्या नाहीत…आणि आता याचा ‘इफेक्ट’ मैदानात दिसून येतोय…
‘आयपीएल’मधील वाटचाल…
- सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी स्ट्राईक रेट शतकं अर्धशतकं चौकार षटकार
- 2023 9 9 – 428 124 47.56 159.7 1 3 56 18
- एकूण 32 32 – 975 124 30.47 144.66 1 6 118 40
अशी जुळली सात्विक-चिरागची केमिस्ट्री!

सात्विकसाईराज रनकीरे•ाr व चिराग शेट्टी ही जोडी 2015 मध्ये जमली. खरं तर दोघांचाही खेळ आक्रमक आणि दोघेही कोर्टवर मागे राहून खेळणारे. त्यामुळे ही जोडी दुहेरीत कितपत यशस्वी होईल याबद्दल शंकाच होती पण मलेशियन प्रशिक्षक टॅन किम यांनी त्यांना एकत्र आणले. त्यांच्या खेळात बदल केला. त्यांनीसुद्धा तो स्वीकारला, मैदानाबाहेर मैत्रीसुद्धा घट्ट केली आणि आज त्यांचे यश आपण बघतोय. गतवर्षी या जोडीने सर्वाधिक यश मिळवले आणि त्यातील जवळपास प्रत्येक ठिकाणी भारताचे पुरुष दुहेरीतील ते पहिलेच यश होते. यंदाच्या वर्षी मात्र त्यांनी कमाल करताना आशिया चषक बॅडमिंटनमध्ये 58 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. आतापर्यंत पुरुष दुहेरीत कोणाला न जमलेली कामगिरी या जोडीने करुन दाखवली, हे विशेष…
बॅडमिंटनमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडू एकेरीत चमकत होते. किदांबी श्रीकांत, सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, लक्ष्य सेन, पारुपल्ली कश्यप ही नावे त्याचे उदाहरण आहे. दुहेरीत आधीच्या काळात एक ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा ही जोडी सोडली तर फारसे उल्लेखनीय यश नव्हते मात्र गेल्या दीड दोन वर्षात हे चित्र बदलले आहे. सायना, सिंधू, श्रीकांत यांनी ऑलिम्पिकसह अन्य जागतिक स्पर्धेत एकेरीत भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
एकेरीनंतर सात्विकसाईराज रनकीरे•ाr व चिराग शेट्टी आणि गायत्री गोपीचंद व त्रीशा जॉली यांनी दुहेरीतही भारताचा दबदबा निर्माण केला आहे. यापैकी सात्विक व चिराग या जोडीने स्वीस ओपन जिंकून यंदाचे आपले पहिले अजिंक्यपद आणि एकूण पाचवे अजिंक्यपद पटकावले. शिवाय राष्ट्रकुल सामन्यांचे सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पिशनशीपचेही कांस्यपदक त्यांच्या नावावर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, थॉमस कप व यंदाच्या वर्षातील आशिया चषकातील जेतेपद ही त्यांची कामगिरी अतिशय महत्वपूर्ण ठरली आहे. चिराग हा मुंबईकर असून त्याचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत तर सात्विकसाईराज हा आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिह्यातील अमलापुरम येथील आहे. सुरुवातीला दोघांचा आक्रमक खेळावर भर होता पण नंतर त्यांनी जबरदस्त सुधारणा करत आपली बचावाची बाजू भक्कम केली. प्रशिक्षकांच्या सहाय्याने त्यांनी आपला खेळ अधिक चांगला कसा होईल यावर भर दिला. विशेष म्हणजे, चिरागने नेटजवळच्या खेळाकडे तर सात्विकने मैदानात मागच्या बाजूला चौफेर आणि चांगला खेळ कसा होईल याकडे लक्ष दिले. यासाठी चिरागने आपली उंची अधिक असली तरी नेटजवळच्या खेळासाठी हवे ते बदल केले. सात्विकने स्मॅशेस आणखी ताकदीने मारायचे तंत्र स्वीकारले.
संवाद, समन्यवयामुळे यश
चिराग शेट्टी म्हणतो की, सात्विक आणि माझा कल सुरुवातीपासूनच दुहेरीत सोबत खेळण्याकडे होता. यात अडचणी भरपूर आल्या. चिराग हिंदीत बोलायचा तर सात्विक तेलुगुमध्ये. त्यामुळे आपसांत संवाद, समन्वय वाढविण्यासाठी प्रशिक्षकांनी त्यांना मैदानाबाहेरही अधिकाधिक वेळ सोबत राहण्याचे सांगितले. ते स्पर्धांठिकाणी एकाच खोलीत राहू लागले. क्राईम थ्रिलर सिनेमे सोबत बघताना मजा आली असे सात्विक सांगतो. आता त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी बोलायची गरज पडत नाही. आमचा प्लॅन तयार असतो आणि आपण काय करतोय हे आम्हाला ठाऊक असते असे सात्विकने सांगितले.
कोणत्याही पुरूष दुहेरीच्या जोडीला जमलं नाही ते करून दाखवलं…
30 एप्रिल रोजी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपची फायनल दुबई येथे झाली. फायनलमध्ये सात्विकराज आणि चिराग यांनी मलेशियाच्या ओंग सिन आणि तेओ ई यीचा पराभव करत इतिहास रचला. चिराग-सात्विक जोडी ही आता आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी भारताची पहिली पुरूष दुहेरी जोडी ठरली आहे. अर्थात, मागील काही वर्षात उभयतांनी घेतलेले परिश्रम यामागे आहेत. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात पुरुष दुहेरी प्रकारात फारसे यश कोणाला मिळालेले नाही. या जोडीने मात्र मागील काही वर्षात स्वीस ओपन, फ्रेंच ओपन, थॉमस चषक, आशिया चषक बॅडमिंटन यासारख्या महत्वपूर्ण स्पर्धांचे जेतेपद पटकावत आपला ठसा उमटवला आहे. आगामी काळात देखील या युवा भारतीय जोडीकडून भारताला शानदार कामगिरीची अपेक्षा असेल, हे मात्र निश्चित….
– विनायक भोसले, कोल्हापूर
खेळ जुना ओळख नवी : ‘पोल व्हॉल्ट’

- ‘पोल व्हॉल्ट’ म्हणजे खरे तर उंच उडीचाच एक प्रकार. फरक इतकाच की, त्यात थेट उडी न मारता त्यासाठी एक लांब दांड्याचा (पोल) आधार घेतला जातो…या खेळाचे मूळ अज्ञात असले, तरी ‘पोल व्हॉल्ट’ स्पर्धेची प्रथम नोंद ही ख्रिस्तपूर्व 1829 मध्ये झालेल्या आयरिश ‘टेलटेन गेम्स’मध्ये आढळते…हा खेळ 1896 मध्ये ऑलिम्पिकचा भाग बनला अन् 2000 पासून ऑलिम्पिकमध्ये महिलांची ‘पोल व्हॉल्ट’ स्पर्धाही दाखल झाली…
- ‘पोल व्हॉल्ट’मध्ये कोणत्याही विशिष्ट उंचीच्या बाबतीत जास्तीत जास्त तीन उड्यांना परवानगी दिली जाते. सलग तीन उड्या चुकल्यास अॅथलीट आपोआप बाद होतो…नाव पुकारल्यानंतर खेळाडूला दोन मिनिटांत कामगिरी करावी लागते…एकाच उंचीच्या बाबतीत दोन स्पर्धकांमध्ये ‘टाय’ झाल्यास कमी प्रयत्न केलेल्या खेळाडूला विजेता म्हणून घोषित केले जाते…
- स्पर्धकाला कोणतीही कृत्रिम मदत किंवा वजन वापरण्यास परवानगी नाही…विशेष वैशिष्ट्यांचे ‘शूज’ही वापरण्यास सक्त मनाई आहे. जखम वगळता बोटांच्या कोणत्याही भागावर टेप लावता येत नाही. तसेच कोणत्याही खेळाडूला परवानगीशिवाय इतर स्पर्धकाचा ‘पोल’ वापरता येत नाही…
- ‘क्रॉसबार’ (ओलांडायची आडवी पट्टी) ‘पोल’ किंवा अॅथलीटच्या शरीराच्या स्पर्शामुळे खाली पडल्यास ते ‘फाऊल’ मानले जाते…त्याचप्रमाणे उडी मारल्यानंतर ‘क्रॉसबार’ ओलांडण्यात अयशस्वी झाल्यास, ‘क्रॉसबार’ चुकीच्या पद्धतीने ओलांडल्यास किंवा अॅथलीट निर्धारित वेळेत प्रयत्न सुरू करण्यात अयशस्वी झाल्यासही ‘फाऊल’चा ठपका येतो…
- अॅथलीट ज्यावरून ‘पोल’ घेऊन धावत येतो तो ‘पॉलीयुरेथेन ट्रॅक’ सरळ अन् 40 ते 45 मीटर्सचा असतो…‘क्रॉसबार’ हा प्लास्टिक किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेला असतो, ज्याची लांबी अंदाजे चार मीटर्स (13.1 फूट) असते…तर खेळाडू उडी मारल्यानंतर ज्यावर उतरतात त्या ‘लँडिंग मॅट’ची रुंदी 19 फूट 8 इंच आणि खोली 20 फूट 2 इंच असते…
- मूळ ‘पोल’ बांबूचा असायचा. कालांतराने तो लवचिक ‘फायबरग्लास’चा आणि आता ‘कार्बन फायबर’चा बनलेला आहे. हा ‘पोल’ अॅथलीटच्या पसंतीनुसार कोणत्याही लांबीचा किंवा व्यासाचा असू शकतो. मात्र सहसा तो 3.05 मीटर्स ते 5.30 मीटर्स इतक्या लांबीचा असतो…
- पोल व्हॉल्टमधील जागतिक विक्रम हा ‘इनडोअर’ किंवा मैदानात नोंदवला जाऊ शकतो…पुऊषांमध्ये सध्याचा जागतिक विक्रम अमेरिकेत जन्मलेला स्वीडिश अॅथलीट आर्मांद डुप्लांटिसच्या नावावर असून (6.22 मीटर्स) तो त्याने यंदा फेब्रुवारीत नोंदवला…तर महिला गटात 2009 मध्ये रशियाच्या एलेना इसिनबायेव्हाने केलेला विक्रम (5.06 मीटर्स) अजून मोडता आलेला नाही…पण ‘पोल व्हॉल्ट’ म्हटले की, प्रथम नाव डोळ्यांसमोर येईल ते युक्रेनचा दिग्गज ‘व्हॉल्टर’ सर्जी बुबकाचेच. त्याने 35 वेळा (17 मैदानी आणि 18 इनडोअर) जागतिक विक्रम मोडीत काढले आहेत…
– राजू प्रभू









