‘गब्बर’ इज बॅक

‘त्या’ आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाला ओळखलं जातं ते ‘गब्बर’ या टोपण नावानं…भारताच्या कसोटी, ‘टी-20’ नि एकदिवसीय संघातील स्थान भलेही गमवावं लागलं असलं, तरी ‘आयपीएल’मध्ये तो सातत्यानं जबरदस्त कामगिरी करत आलाय…अन् यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद न राहता ‘त्यानं’ पुरेपूर दाखवून दिलंय…‘गब्बर इज बॅक’…
शिखर धवन…या नावाचा बोलबाला सुरू झाला तो 2004 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्यानं 3 शतकांसह 505 धावा लुटल्यापासून. मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यामुळं त्याला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागली. परंतु डावखुरा सलामीवीर असलेला धवन हा गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागसमवेत दिल्लीच्या फलंदाजीचा मुख्य आधार बनण्यास फारसा वेळ लागला नाही…
देशांतर्गत अनेक मोसमांत प्रभावी कामगिरी केल्यानंतर शेवटी धवनला 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची द्वारं खुली झाली. पण त्यात खातंही उघडता आलं नाही. त्यामुळं काही काळ बदली खेळाडू म्हणूनच मैदानात वावरण्याचा प्रसंग आला…तथापि मार्च, 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर सेहवागला देण्यात आलेला वादग्रस्त डच्चू सारी परिस्थिती बदलून गेला. शिखरनं त्या कसोटीत अशी काही तुफानी सुरुवात केली की, इतरांनी सोडाच खुद्द त्यानं स्वप्नात देखील त्याची कल्पना केलेली नसेल…
2013 मध्ये ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ अन् ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजचा भारत दौरा या माध्यमांतून शिखर धवनचा एकदिवसीय सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्म चालू राहिला आणि त्या कॅलेंडर वर्षात तो भारतासाठी सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला…परंतु 2013 सालच्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या अन् खास करून 2014 मधील इंग्लंडमधील कसोटी मालिकेत ‘स्विंग’ होऊन ऑफ स्टंपबाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या बाबतीत त्याचा कच्चा दुवा उघडा पडला. 2014-15 मोसमातील
‘बॉर्डर-गावसकर चषक’ मालिकेतही ग्रहण लागून त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा आटल्यानंतर शिखरची जागा चालून गेली ती के. एल. राहुलकडे. मात्र एकदिवसीय सामन्यांतील त्याची घोडदौड चालू होती… शिखर धवन ‘आयपीएल’ सातत्यानं गाजवत असला, तरी मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून त्याला भारताच्या ‘टी-20’ संघाबाहेर रहावं लागलंय. त्यामुळं त्याची एकमेव हुकूमत राहिली होती ती ‘वनडे’मध्ये. ती देखील संपुष्टात येण्याची चिन्हं गेल्या वर्षापासून दिसू लागली…रोहित शर्माला विश्रांती दिल्यावर झिम्बाब्वे, श्रीलंका नि वेस्ट इंडिज दौऱ्यांवर तसंच दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांसाठी पर्यायी कर्णधार म्हणून खरं तर त्याच्याकडे सूत्रं सोपविण्यात आली खरी, तरीही त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला…2022 मध्ये 22 एकदिवसीय सामन्यांतून शिखर धवनला फक्त 34.40 च्या सरासरीनं 688 धावा जमवता आल्या आणि मागील चार वर्षांत त्याला एकाही शतकाची नोंद करता आलेली नाही. कमी होत जाणारा ‘स्ट्राइक रेट’ आणि चांगल्या सुऊवातीचं मोठ्या डावात रूपांतर करण्यात येणारं अपयश यामुळं हळूहळू ‘टी-20’प्रमाणं एकदिवसीय लढतींतील सलामीवीर म्हणून देखील त्याच्या जागी शुबमन गिलची वर्णी लागू लागली अन् गिलनं त्याचा व्यवस्थित फायदाही घेतला. यंदा तर शिखरला एकही ‘वनडे’ खेळण्याची संधी मिळालेली नाही…
‘आयसीसी’ स्पर्धांत जबरदस्त फॉर्म
तरीही 37 वर्षीय शिखर धवनला यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी संधी मिळण्याची शक्यता चर्चेत आलीय ती त्यानं सध्या चालू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये लावलेल्या धडाक्यामुळं अन् ‘आयसीसी’च्या प्रमुख स्पर्धांत नेहमी तळपलेल्या त्याच्या
बॅटमुळं…2013 मधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’त केवळ पाच सामन्यांमध्ये दोन शतकांसह 363 धावा जमवून तो स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला…तर 2015 च्या विश्वचषकात
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरील वेग आणि उसळी यांना भीक न घालता धवननं स्पर्धेत चक्क 412 धावा फटकावल्या. त्यात समावेश राहिला तो पाकिस्तानविऊद्धच्या 72 धावांच्या आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या शानदार 137 धावांच्या खेळींचा…2019 च्या विश्वचषकातही त्यानं धमाकेदार सुऊवात करताना साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध सनसनाटी शतक झळकावलं होतं. परंतु पुढं बोटाला झालेल्या दुखापतीमुळं तो स्पर्धेबाहेर फेकला गेला…‘आयसीसी’च्या स्पर्धांतील 20 सामन्यांमध्ये (विश्वचषक तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी मिळून) शिखर धवनची सरासरी 65.15 राहिलीय आणि त्यात अंतर्भाव आहे तो तब्बल सहा शतकांचा…
अफलातून फटकेबाज…
- शिखर धवननं आपल्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 85 चेंडूंत शतकी खेळी करून पदार्पणात सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा मान पटकावला…पहिल्या डावात बाद होण्यापूर्वी त्यानं मोहालीतील त्या मैदानावर 185 धावांचा डोंगर रचला. कसोटी पदार्पणात एखाद्या भारतीय खेळाडूनं नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या….
- एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत सध्या खेळत असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली (12471 धावा) नि रोहित शर्मा (9554 धावा) यांच्यांनतर शिखरचा (6793 धावा) तिसरा क्रमांक लागतो…
- गेल्या वर्षी जुलैमध्ये एकदिवसीय सामन्यांत 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी रोहित शर्मा व शिखर धवन ही चौथी सलामीची जोडी बनली…या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ती महान सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दुक्कल (एकूण 6609 धावा)…शतकी भागीदाऱ्यांच्या बाबतीत रोहित-शिखर जोडी (18) रोहित-विराट कोहलीप्रमाणं (18) तिसऱ्या स्थानावर विसावलीय…
- ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत शिखर (6476 धावा) विराट कोहलीच्या (6844 धावा) मागं दुसऱ्या स्थानावर असून 2016 पासून प्रत्येक मोसमात त्यानं 400 हून अधिक धावा केल्याहेत…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
- कसोटी 34 58 1 2315 190 40.61 7 5
- वनडे 167 164 10 6793 143 44.11 17 39
- ‘टी20’ आंतरराष्ट्रीय 68 66 3 1759 92 27.92 – 11
- आयपीएल 210 209 28 6476 106 35.78 2 49
तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार
- 2018 पासून शाकाहारी बनलेला शिखर धवन म्हणतो, ‘संतुलित आहारासाठी मी हिरव्या पालेभाज्या समाविष्ट केल्याहेत. मला तळलेले पदार्थही सोडून द्यावे लागलेत’…धवननं सांगितल्यानुसार, तो लवकर उठतो अन् उठल्याबरोबर बदाम, टरबुजाच्या बियांसह मिश्र फळांवर ताव हा ठरलेला. नाश्त्यासाठी सहसा पोहे, चिल्ला, एवोकॅडो टोस्ट आणि चहाला पसंती…दुपारच्या जेवणात अधिक घरगुती आणि साधे पदार्थ. उदाहरणार्थ राजमा भात, डाळ, बीटरूट रोटी नि मिस्सी रोटी…शिखर सहसा सायंकाळी 7 पर्यंत रात्रीचं जेवण आटोपतो. ते शक्य तितकं हलकं ठेवण्याकडे कल. त्यात समावेश राहतो तो ‘टोफू’, जपानी किंवा ‘कॉन्टिनेन्टल फूड’चा…
- ‘प्रोटिन शेक’ हा त्याच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग…सामन्याच्या वेळी शिखर धवन विशेष आहार घेतो. त्यात अंतर्भाव राहतो तो सत्तूचे लाडू, तिळाचे लाडू किंवा ‘प्रोटिन बार’चा…
‘आयपीएल’मधील झळाळती कारकीर्द…
‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये शिखर धवनला तत्कालीन ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’नं 2008 मध्ये उचललं तेव्हा तो ‘स्टार’ही नव्हता. त्या वर्षी तो तिसऱ्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला (14 सामन्यांत 340 धावा)…मात्र ‘दिल्ली’नं शिखरला पुढच्या हंगामात ‘मुंबई इंडियन्स’कडे जाऊ दिलं आणि पुढील दोन हंगाम त्याच्यासाठी निराशाजनक राहिले. त्यानंतर तो त्यावेळच्या ‘डेक्कन चार्जर्स’ म्हणजेच आताच्या ‘सनरायजर्स हैदराबाद’कडे गेला अन् हा निर्णय त्याच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देणारा ठरला. संघासाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक बनण्याबरोबर लवकरच त्याची भारतीय संघात निवड झाली. तेव्हापासून तो त्याच्या ‘आयपीएल’ संघासाठी सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक राहिलाय…
2019 च्या ‘आयपीएल’ लिलावापूर्वी शिखरला ‘सनरायजर्स हैदराबाद’नं ‘दिल्ली’च्या हाती सोपविलं अन् 11 वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा ‘दिल्ली’चं प्रतिनिधीत्व करताना तो पहिल्याच हंगामात त्यांचा आघाडीचा धावा करणारा खेळाडू राहिला…2020 च्या हंगामातही तो स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्यानं त्याचं पहिलं ‘आयपीएल’ शतक नोंदविलं ते त्याच वर्षी. त्यानंतर लागोपाठ शतकं झळकविणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला खेळाडू बनण्याचा मान त्यानं पटकावला…2021 मध्ये सुद्धा धवन ‘दिल्ली कॅपिटल्स’साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला. त्यानंतर ‘मेगा लिलावा’त त्याला ‘पंजाब किंग्स’नं खेचल्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्यातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला तो तोच. मग त्याला कायम ठेवण्याबरोबर संघाचं कर्णधारपदही सोपविण्यात आलं…
खेळ जुना ओळख नवी ! : मोटोक्रॉस

- ‘मोटोक्रॉस’ किंवा ‘एमएक्स’ हा एक ‘डर्ट-बाईक रेसिंग’ क्रीडा प्रकार असून यात मोटरसायकलचालक मातीच्या, चिखलाच्या किंवा गवताळ रस्त्यासारख्या ‘ऑफ-रोड कोर्स’वर आपले कौशल्य दाखवितो…हे ‘ट्रॅक’ 1 ते 3 मैल लांबीचे असतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात अडथळे पार करावे लागतात…ब्रिटनमध्ये 20 व्या शतकाच्या सुऊवातीला मोटरसायकल चाचण्यांच्या शर्यतींमधून या खेळाचा विकास झाला…
- ‘प्रो मोटोक्रॉस शर्यती’मध्ये सामान्यत: 30 मिनिटांची ‘मोटो’ आणि अतिरिक्त ‘लॅप्स’ असतात. हौशी शर्यत साधारणपणे 8 ते 15 मिनिटांची असते. ‘इंटरनॅशनल मोटरसायकलिंग फेडरेशन’ (एफआयएम) तसेच ‘अमेरिकन मोटरसायकलिस्ट असोसिएशन’ची मान्यता असलेल्या ‘आऊटडोअर मोटोक्रॉस इव्हेंट’मध्ये प्रत्येकी 30 मिनिटांच्या दोन ‘मोटो’ आणि त्यांच्या अखेरीस दोन ‘लॅप्स’ असतात…
- ‘रायडर्स’ ज्या स्थानावर शर्यत पूर्ण करतात त्यानुसार त्यांना गुण दिले जातात. उदाहरणार्थ ‘एफआयएम’च्या पद्धतीप्रमाणे पहिल्या स्थानासाठी 25, दुसऱ्या क्रमांकासाठी 20, तिसऱ्या स्थानासाठी 16, चौथ्या क्रमांकासाठी 13, तर पाचव्या स्थानासाठी 11 अशा प्रकारे. दहाव्या क्रमांकावर राहिल्यास 6, तर पंधराव्या स्थानावर राहिल्यास 1 गुण मिळतो…प्रत्येक वर्गात दोन ‘मोटों’चा समावेश राहत असल्यामुळे सर्वोच्च गुणांसह शर्यत पूर्ण करणारा स्पर्धक विजेता ठरतो…
- ‘इंटरनॅशनल मोटरसायकलिंग फेडरेशन’ ही ‘मोटरसायकल रेसिंग’ची जागतिक प्रशासकीय संस्था असून ती 116 राष्ट्रीय मोटरसायकल महासंघांचे प्रतिनिधीत्व करते…त्यांचे सात ‘मोटरसायकल रेसिंग’ विभाग असून त्यामध्ये 82 जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यती होतात. या विभागांमध्ये ‘एंड्युरो’, ‘ट्रायल’, ‘सर्किट रेसिंग’, ‘मोटोक्रॉस आणि सुपरमोटो’, ‘क्रॉस-कंट्री’, ‘ई-बाईक’ अन् ‘ट्रॅक रेसिंग’ यांचा समावेश…
- ‘एफआयएम ‘ग्रां प्रि मोटोक्रॉस वर्ल्ड चॅम्पियनशिप’ प्रामुख्याने युरोपमध्ये आयोजित केली जाते. परंतु त्यात उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील स्पर्धांचाही समावेश राहतो. ही जगभरातील प्रमुख ‘मोटोक्रॉस
- मालिका’ मानली जाते. त्यात ‘450 सीसी’ दुचाक्यांसाठी ‘एमएक्स जीपी’, ‘250 सीसी’साठी ‘एमएक्स 2’ आणि महिलांची ‘एमएक्स’ अशा तीन वर्गांचा समावेश राहतो…
- या शर्यतींच्या बाबतीत चार प्रकारच्या मोटरसायकल्स आढळतात. त्यापैकी ‘मोटोक्रॉस मोटर्स’ या कमीत कमी वजनाच्या आणि ‘लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शन’ने युक्त असतात. त्यांची आखणी ‘ऑफ-रोड रेसिंग’साठीच केलेली असते. याव्यतिरिक्त तीन प्रकार म्हणजे ‘ट्रेल बाइक्स’, ‘एंड्युरो बाइक्स’ व ‘पिट बाइक्स’…
गिरिप्रेमीची ‘पी क्यूब माउंट मेरु मोहीम 2023‘

रताच्या वायव्येपासून ईशान्येपर्यंत विस्तीर्ण पसरलेला हिमालय म्हणजे नितांत सुंदर व रोमांचकारी अनुभवांचा स्रोत. 1978 पासून आजपर्यंत मी हिमालयात व्यतीत केलेल्या दिवसांनी मला नेहमीच समृद्ध केले आहे. हिमालय हा प्रत्येक भेटीत नवा भासतो, तो आपल्याला खुणावतो. 2012 साली आम्ही गिरिप्रेमीने जेव्हा माउंट एव्हरेस्ट शिखरावर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम यशस्वी केली, तेव्हा हिमालयाचं खुणावणं अन कवेत घेणं अगदी जवळून अनुभवलं. एव्हरेस्ट पासून अन्नपूर्णा-1 पर्यंत जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी आठ शिखरांना दहा वर्षांत गवसणी घालण्यासोबतच माउंट सतोपंथ, माउंट शिवलिंग, माउंट नून, माउंट श्रीकंठ अशा भारतीय हिमालयातील उंचीने कमी पण आव्हानांनी भरलेल्या शिखरांवर मोहीम यशस्वी करण्याची किमया गिरिप्रेमीने केली. माउंट मंदा-1 सारख्या शिखरावर चढाई करण्याचा ध्यास तर आम्ही तब्बल तीन दशके उराशी बाळगला, 1989 अन 1991 ला आलेल्या अपयशानंतर आम्ही 2021 साली माउंट मंदा-1 शिखराच्या उत्तर धारेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत शिखरमाथा गाठला. 70 ते 80 अंश कोनातील खड्या उभ्या बर्फाच्या भिंती, अतिउंचीवर नेटाने करावे लागणारे प्रस्तरारोहण (रॉक

क्लायम्बिंग) अन अतिशय तीव्र धारेवर करावी लागणारी चढाई, अशी आव्हानांची मालिका यशस्वी पार करत, जीवाची बाजी लावून गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी भारताचा तिरंगा माउंट मंदा-1 वर फडकविला. उत्तर धारेने अजिंक्य मंदा शिखरावर यशस्वी चढाई करणारा गिरिप्रेमीचा संघ हा पहिला भारतीय संघ ठरला, हे विशेष. या सर्व यशामुळे, चित्तथरारक प्रवासामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला व यांतूनच उभी राहिली माउंट मेरू मोहीम!
स्कंद पुराणामध्ये अमृत मिळविण्यासाठी समुद्र मंथनाचे जे वर्णन करण्यात आले आहे, त्यात समुद्र घुसळण्यासाठी जो रवी वापरण्यात आला तो मेरूदंड म्हणजे हा मेरू पर्वत. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून हिमालयातील शिखरांचे महत्व मोठे आहे. गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात तपोवन भागामध्ये शिवलिंग, थलाई सागर, भृगु पर्वत यांच्या साथीने माउंट मेरूचे भव्यदिव्य रूप उठून दिसते. येथील चढाई ही एव्हरेस्टच काय इतर अनेक अष्टहजारी शिखरांपेक्षा कैक पटीने आव्हानात्मक आहे. तीन शिखरांचा समूह असलेल्या मेरू येथे दक्षिण शिखर 6660 मीटर उंच आहे, मध्य शिखर 6310 मीटर उंच आहे, तर उत्तर शिखर 6450 मीटर उंच आहे. यातील मध्य शिखरावरील चढाई अशक्यप्राय अवघड गणली जाते. आजपर्यंत येथे 20 हुन अधिक वेळा चढाईचे प्रयत्न झाले मात्र केवळ चार वेळाच आजपर्यंत गिर्यारोहक चढाई करू शकले आहेत. येथे असलेले ‘शार्क फिन‘ हे अजब व रोमांचक आहे. शिखरांच्या ईशान्य बाजूला मध्य शिखरापर्यंत जाणारा 1400 मीटरचा चढाई मार्ग म्हणजे ग्रॅनाईट युक्त व 90 अंशापेक्षा जास्त कोनातील भिंत. एखाद्या ब्लेड प्रमाणे किंवा नाकाप्रमाणे याचा आकार आहे. दुरून पाहिल्यावर शार्कच्या कल्याप्रमाणे याचा आकार वाटतो. म्हणून हा चढाई मार्ग शार्क फिन म्हणून ओळखला जातो. या शार्क फिनवर होणारी चढाई तर तांत्रिकदृष्ट्या अवघड आहेच, सोबतीला येथे येणारे हिमप्रपात, हिमवादळे यांमुळे आव्हानांत भर पडत जाते. 1986 पासून अमेरिकन, ब्रिटिश, रशियन, जपानी गिर्यारोहकांनी शार्क फिन मार्गावरून चढाई करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. 2001 साली रशियन गिर्यारोहक वॅलेरी बाबानोव्ह यांनी शार्क फिन मार्गाच्या खालच्या भागांतून अर्धी चढाई केली, मात्र त्यांना शार्क फिनने खूप झुंजवले. शेवटी मार्ग बदलून त्यांनी मेरू मध्य शिखर चढाई यशस्वी केली. मध्य शिखरावर यशस्वी झालेली ही गिर्यारोहण इतिहासातील पहिली चढाई होती व वॅलेरी यांनी ही चढाई ‘सोलो‘ केली होती हे विशेष.
मेरू शिखराशी निगडित असाच एक अनोखा विश्वविक्रम आहे. 2006 साली ऑस्ट्रेलियन साहसवीर डॉ. ग्लेन सिंगलमॅन व हीथर स्वान यांनी 6604 मीटर उंचीपर्यंत चढाई करून तेथून बेस जम्प करत पायथा गाठला होता. त्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सर्वात उंचीवरून बेस जम्प करण्याचा विक्रम
ऑस्ट्रेलियन जोडगळीच्या नावावर होता. पुढे तो 2013 साली वॅलेरी रोझोव्ह यांनी एव्हरेस्टच्या
नॉर्थ फेसहुन बेस जम्प करत आपल्या नावावर केला. सिंगलमॅन व स्वान यांनी बेस जम्पसाठी निवडलेले ठिकाण म्हणजे मेरू शिखरमाथ्याजवळील भाग हा चढाईच्या दृष्टीने अतिशय अवघड होता. त्यांनी यासाठी केलेली तयारी अतिशय सखोल होती. तब्बल सहा वर्षे या जोडगळीने मेरू शिखराचा व परिसराचा सर्वात्मक अभ्यास केला होता. या मोहिमेत सहभागी झालेला दार्जिलिंगचा मिंग्मा शेर्पा हा गिरिप्रेमीचा मानद सदस्य आहे. मंदा-1 मोहिमेच्या यशात मिंग्मा शेर्पाचा मोठा वाटा आहे, त्याला जेव्हा म्हटलं कि मेरू मोहीम करूयात का, तेव्हा तो आनंदित चेहऱ्याने म्हणाला होता, “हां, मेरू तो करेंगे, मै आपके साथ आऊंगा.“ एक अनुभवी शेर्पा स्वत:हून आम्हाला प्रोत्साहित करत होता, हा आमच्यासाठी शुभ संकेतच होता.
मेरू सारख्या सर्वार्थाने अजस्त्र मोहिमेची तयारी ही तेवढीच काटेकोर व सखोल करावी लागणार होती. त्यामुळे आम्ही सर्वात प्रथम संपर्क साधला तो 2006 सालच्या ऑस्ट्रेलियन मोहिमेचे नेते डॉ. सिंगलमॅन यांच्याशी. झूम कॉलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. त्या दोघांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले. दरम्यानच्या काळात आम्ही माउंट मेरूची मोहिमेची घोषणा पुण्यात केली होती. एक वर्षाचा पुरेसा अवधी घेऊन आम्ही 2023 च्या मे-जून महिन्यात मोहिमेसाठी जाणार आहोत. त्यामुळे मेरूची प्रत्यक्ष तयारी कशी करता येईल हे विचार मनात घेऊन मी माउंट मेरूच्या बेस कॅम्पवर जाण्याचे ठरविले.
जुलै 2022 च्या शेवटी विवेक शिवदे व वरूण भागवत या तरुण गिर्यारोहकांना घेऊन मी गंगोत्री परिसरात दाखल झालो. सोबतीला दार्जिलिंगहुन मिंग्मा शेर्पा आमच्यासोबत बेस कॅम्पवर येण्यासाठी गंगोत्रीत दाखल झाला. गंगोत्री राष्ट्रीय उद्यानामध्ये आम्हाला जावे लागणार असल्याने वन खात्याची परवानगी व कागदी सोपस्कार आम्ही पार पाडून डोंगर प्रवासाला सुरवात केली. 3500 मीटर उंचीवर वसलेल्या अन विस्तीर्ण पसरलेल्या गंगोत्री हिमनदी परिसरातून आम्ही चालत निघालो. इतक्या उंचीवर टप्प्याटप्प्याने पुढे जायचे असते, त्यामुळे शरीराला अतिउंचीवरील
ऑक्सिजनच्या कमी उपलब्धतेत समरस होण्यास मदत होते. गंगोत्री ते गोमुख हे 18 किलोमीटरचे अंतर आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. यात भोजबासा व चीडबासा अशा दोन ठिकाणी पुरेशी विश्रांती घेऊनच आम्ही निघालो.
आम्ही भोजबासाला मुक्काम करणार होतो. या भागांमध्ये प्रचंड थंडी होती, सोबतीला पावसाळी ढगाळ वातावरण आमच्यासोबत लपंडाव खेळात होते. जेव्हा आकाश निरभ्र असे, तेव्हा आमच्या मार्गावर डावीकडे माउंट शिवलिंग, भागीरथी व सुदर्शन ही शिखरे उठून दिसत होती. इतक्या सुंदर परिसरांतून प्रवास करताना मन हरखून जात असे व आपण किती चालत आहोत, आपल्याला काही त्रास होतो आहे का, याची जाणीव देखील होत नसे. मात्र आमचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. भागीरथी नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी आम्ही जेव्हा किनाऱ्याला थांबलो होतो, तेव्हा नदी ओलांडण्याचा एकच मार्ग आमच्या समोर उपलब्ध होता, तो म्हणजे एका लोखंडी दोरीवर टांगलेल्या ट्रॉलीतून नदी ओलांडणे. त्या ट्रॉलीची अवस्था बघता, सुरक्षिततेचे उपाय बघता त्यात बसण्यास मन धजावत नव्हते. मात्र, खाली अत्यंत वेगाने वाहत असलेला भागीरथी नदीचा प्रवाह हा नदीत उतरून ओलांडण्याचा पर्याय सोईस्कर नाही, हेच सुचवत होते. शेवटी नाईलाजाने आम्ही त्या ट्रॉलीतून पुढे निघालो. आम्ही जेव्हा नदी ओलांडून पुढे गेलो तेव्हा गोमुख, अर्थात गंगा नदीच्या उगमस्थानाकडे निघालो.
आम्ही चौघे सोबत चार भारवाहक व एक कुक असे नऊ जण मेरू बेस कॅम्पकडे निघालो होतो. आमच्याकडे 7 दिवस पुरेल एवढा शिधा होता. तब्बल 150 किलो सामान घेऊन आम्ही निघालो होतो. 6 तास अतिशय कठीण चढाई करून आम्ही जेव्हा तपोवनला आलो. अतिशय सुंदर परिसर आहे तो. इतक्या उंचीवर छान पसरलेले गवताळ पठार अन सोबत दिसणारे शिवलिंग, केदारगंगा शिखरे. मन मोहून टाकणारा माहौल होता तो. शिवलिंग शिखराच्या पलीकडच्या बाजूला मेरू शिखर वसले आहे. याचा बेस कॅम्प हा शिवलिंग शिखराच्या कॅम्प 1 पेक्षा उंच ठिकाणी आहे. त्यामुळे मेरू बेस कॅम्पला जायचे, आवश्यक ते डाक्युमेंटेशन करायचे व पुन्हा खाली येऊन झोपायचे, असे आम्ही दोन दिवस केले.
मेरू शिखराच्या पायथ्यापर्यंत पोहोचणे ही देखील सुद्धा एक मोहीमच होती. या पूर्वतयारीच्या जोरावरच आमची मुख्य मोहीम आधारलेली आहे. 7 दिवस, 70 किलोमीटर पायपीट करून, नदीच्या प्रवाहांना ओलांडून, दोरखंडाच्या सहाय्याने चढाई उतराई करून आम्ही आवश्यक ती माहिती गोळा करुन परतीच्या मार्गावर निघालो, परत येताना पुन्हा एकदा गंगामातेचे दर्शन घेऊन पुढच्या वर्षीच्या मोहिमेला बळ दे, या प्रार्थनेसह मार्गस्थ झालो. माउंट मेरूचे स्वप्न हे मेरू दंड उचलण्याइतके आव्हानात्मक आहे. मात्र, हे आव्हान आम्ही नक्कीच यशस्वीपणे पेलू व भारतीय गिर्यारोहण इतिहासातील एक सुवर्णाध्याय रचू, या विश्वासासह आम्ही कार्यरत आहोत.
तपोवनच्या पुढे गंगोत्री हिमनदीत उजव्या बाजूला कीर्ती बमककडे जाऊन आतल्या बाजूला मेरू बमक गेल्यावर मेरूचा बेस कॅम्प लागतो. हा संपूर्ण रस्ता रॉक फॉलच्या धोक्याने भरलेला आहे. मिंग्मा शेर्पाने आम्हाला आधीच सावध केले होते. 2006 साली जेव्हा तो या परिसरात आला होता तेव्हा अचानक मोठे दगड रस्त्यावर निखळून पडले व पुढे जाण्याचा मार्गच बंद झाला. 5 तास चालत एक मोठा वळसा घालून त्यांना बेस कॅम्प गाठावा लागला, हे त्याने सांगितले. आमच्या मोहिमेत अशी विघ्नं येऊ नयेत, अशी मी मनोमन प्रार्थना केली.
आम्हाला मेरू बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी देखील दोन ठिकाणी दोरखंड लावावा लागला. साधारण 300 मीटरची चढाई- उतराई ही तीव्र उतारा वरून करावी लागणार आहे, याची जाणीव आम्हाला झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रत्यक्ष मोहिमेच्या वेळी काय तयारी करावी लागेल, याचा अंदाज बांधता आला. 2023 मध्ये होणाऱ्या मेरू मोहिमेचा संघ मोठा असणार आहे. यात एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले, कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे व डॉ. सुमित मांदळे, मंदा शिखरवीर पवन हडोळे तसेच वरुण भागवत यांसारखे अनुभवी व तरुण गिर्यारोहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आर्मी ऍडव्हेंचर विंगचे प्रमुख व एव्हरेस्ट शिखरवीर विंग कमांडर देवीदत्त पंडा देखील शिखर चढाई करणार आहेत. 30-35 दिवसांचे नियोजन करावे लागणार आहे. संपूर्ण संघाचे सामान काही क्विंटल होणार असून त्यासाठी भारवाहकांचे देखील नियोजन करावे लागणार आहे.
मेरू शिखराच्या पायथ्यापर्यंत पोहोचणे ही देखील सुद्धा एक मोहीमच होती. या पूर्व तयारीच्या जोरावरच आमची मुख्य मोहीम आधारलेली आहे. मेरू बेस कॅम्प मोहिमेचा एक मोठा अध्याय आम्ही संपवून माघारी फिरलो. 7 दिवस, 70 किलोमीटर पायपीट करून, नदीच्या प्रवाहांना ओलांडून, दोरखंडाच्या सहाय्याने चढाई उतराई करून आम्ही आवश्यक ती माहिती गोळा करुन परतीच्या मार्गावर निघालो, परत येताना पुन्हा एकदा गंगामातेचे दर्शन घेऊन पुढच्या वर्षीच्या मोहिमेला बळ दे, या प्रार्थनेसह मार्गस्थ झालो.
लेखक गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक असून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्टसह जगातील सर्वोच्च चौदा अष्टहजारी शिखरांपैकी आठ शिखरांवर यशस्वी मोहिमा करण्यात आल्या आहेत. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय गिर्यारोहण मोहीम नेते आहेत.
माउंट मेरूचे स्वप्न हे मेरू दंड उचलण्याइतके आव्हानात्मक आहे. मात्र, हे आव्हान आम्ही नक्कीच यशस्वीपणे पेलू व भारतीय गिर्यारोहण इतिहासातील एक सुवर्णाध्याय रचू, या विश्वासासह आम्ही कार्यरत आहोत.
– उमेश झिरपे









