भारतीय बॉक्सिंगची ‘सुपरस्टार’…निखत झरीन !

एकेकाळी भारतीय बॉक्सिंग म्हटलं की, विक्रमी कामगिरी करणाऱया मेरी कॉमचा चेहरा समोर यायचा. आता ती जागा घेतलीय निखत झरीननं…तेलंगणच्या या तुफानी बॉक्सरनं अलीकडच्या काळात विलक्षण दबदबा निर्माण करताना लोकप्रियतेच्या बाबतीत पुरुषांचं वर्चस्व देखील मोडीत काढलंय…
14 जून, 1996 रोजी निजामाबाद, तेलंगण येथे जन्मलेली आणि घरात तीन बहिणींसमवेत वाढलेली ‘ती’ मुलगी लहानपणी विलक्षण खोडकर होती…‘ती’ शेजारच्या मुलांशी भांडायची, झाडावर चढायची….‘तिच्या’तील ऊर्जेला चांगली वाट दाखविण्यासाठी वडील मोहम्मद जमील अहमदनी ‘तिला’ धावण्याचं प्रशिक्षण दिलं. पण लहान पल्ल्याच्या ‘स्प्रिंट’मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही ‘तिच्या’वर भुरळ टाकली ती बॉक्सिंगनं…या खेळानं मनात असं काही घर केलं की, रिंगणात उतरण्यासाठी ‘तिनं’ धावण्याच्या ‘ट्रक’ला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला…अन् आज ‘तिच्या’कडे दिग्गज मेरी कॉमनंतरची भारतीय बॉक्सिंगमधील ‘सुपरस्टार’ म्हणून पाहिलं जातंय…निखत झरीन !
तिची आई परवीन सुलताना या निर्णयावर फारशी खूश नव्हती, कारण मग निखतशी लग्नग्न करणार कोण याची चिंता तिला भेडसावू लागली. पण मुष्टियुद्धातील करिअरला सुरुवात करण्याच्या दृष्टीनं तिला वडिलांचा पाठिंबा पुरेसा ठरला…निखत झरीन त्यावेळी स्थानिक व्यायामशाळेत बॉक्सिंग करणारी एकमेव मुलगी होती. वडिलांसोबत एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर 2009 मध्ये निखतला द्रोणाचार्य पुरस्कारविजेते आय. व्ही. राव यांनी धडे देण्यास सुरुवात केली अन् त्याचे परिणाम लवकरच दिसून आले…तिनं राष्ट्रीय उपकनिष्ठ विजेतेपद पटकावलं. शिवाय 2011 साली कनिष्ठ तसंच युवा जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकही खात्यावर जमा केलं. 2013 मध्ये युवा जागतिक स्पर्धेत आणखी एका रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर तिची वरिष्ठ स्तराच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली…
हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता, पण त्यामागचं कारण वेगळं…भारतातील बहुतांश महिला बॉक्सर्सप्रमाणं निखत झरीनचीही आदर्श जागतिक स्पर्धेत विक्रमी सहा सुवर्णपदकं, पाच आशियाई किताब आणि एक ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी मणिपूरची बॉक्सर मेरी कॉम. विशेष म्हणजे निखतसाठी प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उभी ठाकली ती नेमकी तीच. कारण दोघांचाही लढण्याचा वजन गट एकच-‘फ्लायवेट’ (52 किलो)…मेरी कॉम, पिंकी जांगरासारखी नावं आधीच प्रस्थापित झालेली असल्यानं कनिष्ठ स्तरावरील जागतिक विजेती असूनही निखतला त्या गटात स्थान मिळवणं, भारताच्या वरिष्ठ संघात प्रवेश करणं खूप कठीण गेलं…
निखत झरीननं 2015 साली सर्वप्रथम राष्ट्रीय शिबिरात प्रवेश केला त्यावेळी ती 19 वर्षांची. 2016 च्या जागतिक स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये वेगळय़ा 54 किलो गटातून लढण्याचा तिला सल्ला देण्यात आला तो तिच्या वजन श्रेणीतील तीव्र स्पर्धेमुळंच. तिनंही न डगमगता ते आव्हान पेलून नुसत्या चाचण्याच जिंकल्या नाहीत, तर अस्ताना इथं झालेल्या जागतिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारून दाखविली…त्यानंतर दोन वर्षं उलटली, तरी 2017 सालचा आशियाई किताब आणि 2018 मधलं आणखी एक जागतिक विजेतेपद यामुळं ‘फ्लायवेट’ गटात भारताची पहिली पसंती राहिली ती मेरी कॉमच. त्यातच 2017 मध्ये उजवा खांदा निखळल्यानंतर निखतच्या समस्या वाढल्या अन् तिला तब्बल एक वर्ष रिंगणापासून दूर राहावं लागलं…
परंतु खचून न जाता परतलेल्या निखत झरीननं 2018 साली ‘बेलग्रेड व्हिनर इंटरनॅशनल’ स्पर्धेत रौप्यपदक जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर दणक्यात पुनरागमन केलं आणि पुढच्याच वर्षी आशियाई स्पर्धेत कांस्य (2019, बँकॉक), तर ‘स्ट्रँडजा बॉक्सिंग’ स्पर्धेत (सोफिया) सुवर्णपदक पटकावून दाखविलं. पण भारतीय बॉक्सिंग संघाच्या ‘फ्लायवेट’ गटातील जागेवर चालणारं मेरी कॉमचं राज्य कायम होतं. त्यामुळं निखत एक जुगार खेळली. 2020 मधील टोकियोतील ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण्यासाठी तिनं निवड चाचणी घेण्याची विनंती राष्ट्रीय महासंघाला केली. मेरी कॉमविरुद्धच्या त्या लढतीत सपशेल पराभव पत्करावा लागला, तरी तिच्या जिद्दीत तसूभरही फरक पडला नाही…
मेरी कॉमनं टोकियो ऑलिम्पिकमधील उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर स्पर्धांत उतरणं बंद केलं अन् तेलंगणातील या बॉक्सरसाठी खऱया अर्थानं दरवाजे उघडले…त्यानंतर निखत झरीननं 2021 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. पाठोपाठ ‘बॉस्फोरस ओपन’ तसंच ‘स्ट्रँडजा मेमोरियलमध्ये’ सरशी…पण या नावानं खरी सनसनी माजविली ती गेल्या वर्षी इस्तांबूल, तुर्किये इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत. निखत त्यात प्रतिस्पर्ध्यांवर अक्षरशः तुटून पडली अन् सर्व लढती आपल्या नावावर एकमतानं जमा करून घेतल्या. ‘फ्लायवेट’ गटाच्या अंतिम फेरीत तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या थायलंडच्या जुटामास जितपाँगला धूळ चारून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं अन् अशी झळाळती कामगिरी करणारी ती सरिता देवी (2006), जेनी आर. एल. (2006), लेखा के. सी (2006) अन् मेरी कॉम (2002, 2005, 2006, 2008, 2010 नि 2018) यांच्यानंतरची पाचवी भारतीय महिला बॉक्सर बनली…
16 वर्षांनी मेरी कॉम वगळता दुसऱया एखाद्या भारतीय महिलेचं जागतिक विजेती म्हणून दर्शन घडलं. त्यानंतर ऑगस्टमध्ये निखतनं राष्टकुल खेळांतील सुवर्णपदक खात्यात जमा करून भारतीय बॉक्सिंगची नवीन सुपरस्टार ही आपली प्रतिमा आणखी मजबूत केली. राष्ट्रकुलात उतरण्याची तिची ती पहिलीच खेप. पण निखतनं महिलांच्या 50 किलो गटातील उपउपांत्यपूर्व फेरीनंतरच्या तिन्ही लढती जिंकल्या त्या चक्क 5-0 च्या फरकानं. अंतिम फेरीत तिनं उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलवरही निर्विवाद वर्चस्व गाजविलं…अन् आता ‘सोने पे सुहागा’ म्हणतात तसं जागतिक स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक !
यंदाचा जागतिक किताब किती खास ?…
- निखत झरीननं यंदाच्या जागतिक स्पर्धेत अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यांवर समर्थपणे वाहून नेत गेल्या वर्षीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली अन् घरच्या मैदानावर दुसरं विश्व विजेतेपद पटकावलं. यापूर्वी मेरी कॉम ही एकापेक्षा जास्त जागतिक किताब खात्यात असलेली एकमेव भारतीय बॉक्सर होती. आता त्या पंक्तीत निखतनंही स्थान मिळविलंय…
- यावेळचं आव्हान इस्तांबूलहून खडतर होतं. कारण पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धा सुरू होत असल्यानं अनेक बॉक्सर्सनी आपला वजन गट बदललाय. त्यामुळं ऑलिम्पिकमधील सहा गटांपैकी सर्वांत कनिष्ठ 50 किलो गटात गर्दी वाढली. निखतलाही ‘फ्लायवेट’वरून (52 किलो) या ‘लाईट फ्लायवेट’मध्ये यावं लागलं. ही तिच्यासाठी मोठी कसोटी होती. पण नवीन गटात देखील पारडं भारी ठरल्यानं निखत झरीननं आपण पॅरिसमधील विजेतेपदाची भक्कम दावेदार बनू शकते हे पुरेपूर सिद्ध केलंय…
- निखत अंतिम फेरीत पोहोचली त्याचवेळी तिची आशियाई खेळांसाठीची निवड पक्की झाली…तिच्या मते इस्तंबूलचं विजेतेपद ‘विशेष’ असलं, तरी नवी दिल्लीतील किताब जास्त ‘कठीण’ होता…‘गेल्या जागतिक स्पर्धेवेळी मला वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले नाहीत. या नवीन गटासाठी मात्र मला आहाराचं काटेकोरपणे पालन करण्याबरोबर अतिशय शिस्तबद्ध राहावं लागलं. राष्ट्रीय स्पर्धेनंतर मला तयारीसाठी फारसा वेळही मिळाला नाही, पण मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केले’, ती सांगते…
- या स्पर्धेत निखत एकामागून एक विजय मिळवत सुटली. एकूण सहा सामन्यांत तिनं प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. एखाद्या स्पर्धेत तिनं जिंकलेल्या या सर्वांत जास्त लढती…यादरम्यान लागोपाठच्या लढतींमुळं दमूनही निखत झरीननं 2017 व 2022 मध्ये आशियाई जेतेपद मिळविलेल्या डावखुऱया थी टॅमला अंतिम फेरीत धूळ चारली…
वेगावर भर…
पायांच्या जबरदस्त हालचाली अन् अचूक ‘पंचेस’ हे वैशिष्टय़ असलेल्या निखत झरीनच्या मते, बॉक्सिंगमध्ये वेग हा फार महत्त्वाचा. कारण तो प्रतिस्पर्ध्याला आश्चर्यचकित करू शकतो. त्यामुळं वेग सुधारण्यासाठी ती ‘स्पीड बॅग’ घेऊन सराव करते. त्यानंतर ‘बॅग पंचिंग’. या प्रकारच्या सरावामुळं शक्ती मिळते. मग ‘कार्डिओ सत्र’. ‘दोरीवरील उडय़ा’ हा तर तिच्या दैनंदिन व्यायामाचा एक प्रमुख भाग. याखेरीज ‘ट्रेडमिल’, ‘मेडिसिन बॉल’सह व्यायाम, ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’, ‘बारबेल स्क्वॅट्स’, ‘डंबेल पुश-अप’, ‘पॉवर क्लीन’चा ती आधार घेते…
स्पर्धेपूर्वी ‘डाएट’चं काटेकोर पालन…
जर हैदराबादी खवय्ये असाल, तर ‘डाएट प्लॅन’चं काटेकोर पालन करणं कठीण हे सांगण्यास निखत विसरत नाही. मात्र येथे तिच्या मदतीला धावून येते ती शिस्त. ती स्पर्धेच्या सुमारे दोन महिने आधी व्यायाम, सरावाद्वारे वजन कमी करू लागते. अशा वेळी ती प्रथिनंयुक्त आहारावर लक्ष केंद्रित करते आणि साधारणपणे दररोज 200 ते 300 ग्रॅम वजन घटवण्याचं लक्ष्य ठेवते. स्पर्धेसाठी किती दिवस शिल्लक आहेत त्यानुसार हे प्रमाण बदलतं…एरव्ही निखत झरीनला ‘टेहरी’ तसंच ‘बिर्याणी’वर ताव मारायला खूप आवडतं…
खेळ जुनाच, ओळख नवी ! बॉक्सिंग…

बॉक्सिंग हा जगातील सर्वांत जुन्या खेळांपैकी एक…त्याचे रिंगण हे चौकोनी आणि साधारणपणे 16 ते 25 फूट (4.9 ते 7.6 मीटर) इतक्या लांबीचे व रूंदीचे असते. मुष्टियोद्धे ग्लोव्हज परिधान करतात आणि आधुनिक ग्लोव्हज सहसा 12 औंस, 14 औंस किंवा 16 औंस वजनाचे असतात…
- बॉक्सिंग व्यावसायिक नि हौशी अशा दोन गटांत विभागलेले असून बॉक्सर्ससाठी विविध वजन गट असतात आणि वेगवेगळ्या प्रशासकीय संघटनांच्या अनुसार वेगवेगळे वजन गट आणि त्यांची नावे असतात. बॉक्सर्स फक्त समान वजनाच्या विरोधकांशी लढतात…
- टोकियो ऑलिम्पिकचा विचार करता त्यात पुरुष बॉक्सर्ससाठी ‘फ्लायवेट’ (52 किलो), ‘फेदरवेट’ (57 किलो), ‘लाईटवेट’ (63 किलो), ‘वेल्टरवेट’ (69 किलो), ‘मिडलवेट’ (75 किलो), ‘लाईट हेविवेट’ (81 किलो), ‘हेविवेट’ (91 किलो) आणि सुपर हेविवेट’ (91 किलोंहून अधिक) अशा आठ वजन गटांचा, तर महिलांसाठी ‘फ्लायवेट’ (51 किलो), ‘फेदरवेट’ (57 किलो), ‘लाईटवेट’ (60 किलो), ‘वेल्टरवेट’ (69 किलो) आणि ‘मिडलवेट’ (75 किलो) अशा पाच गटांचा समावेश राहिला…
- रिंगणातील पंचाच्या जोडीला रिंगणाबाहेर तीन ‘जज्ज’ राहून ते व्यावसायिक स्तरावर वैयक्तिक फेरीनंतर कोणता बॉक्सर जिंकला असे वाटते ते विशिष्ट पद्धत वापरून ठरवितात. नॉकआउट, निवृत्ती किंवा अपात्रता या प्रकारे सामन्याचा निकाल लागू शकला नसेल, तर ‘जज्जां’चे स्कोअरकार्ड वापरले जाते. जर तिन्ही ‘जज्ज’ सहमत असतील, तर निर्णय एकमताने होतो. जर दोघांना वाटत असेल की, एखादा बॉक्सर जिंकला, तर तो विभाजित निर्णय राहतो. जर दोन ‘जज्जां’ना किंवा एकाला लढत बरोबरीत राहिली असे वाटले आणि इतर दोन ‘जज्जां’ची मते विभागलेली असतील, तर सामना अनिर्णीत ठरविला जातो…
- जर बॉक्सर जमिनीवर पडला आणि 10 सेकंदांत उठू शकला नाही, तर त्याचं आव्हान संपुष्टात येतं. पंच एखाद्या बॉक्सरला चुकीच्या खेळासाठी अपात्र ठरवू शकतो. जिंकण्याची दुसरी पद्धत म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा ‘नॉकआऊट’. जर बॉक्सर लढत पुढे चालू ठेवण्यास तयार नसेल किंवा पंचांना वा त्याच्या कॉर्नर टीमला अथवा वैद्यकीय कर्मचाऱयांना बॉक्सर पुढे लढण्यास असमर्थ वाटत असेल, तर तो ‘तांत्रिक नॉकआउट’ ठरतो. एखाद्या फेरीत निर्धारित वेळा (सामान्यतः तीनदा) एखाद्या बॉक्सरला मुक्का मारून खाली पाडल्यास देखील असा निकाल दिला जाऊ शकतो…
- हौशी बॉक्सिंगमध्ये वेगळ्या पद्धती वापरल्या जातात, उदाहरणार्थ पंच निर्णय घेऊ शकतो किंवा रिंगणाच्या बाहेरचे ‘जज्ज’ इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंगचा वापर करून मारले गेलेले मुक्के मोजतात…
- हौशी बॉक्सिंग सामन्यात एकूण 3 फेऱया असतात, तर व्यावसायिक बॉक्सिंग सामन्यामध्ये प्रत्येकी तीन मिनिटांच्या 9 ते 12 फेऱया असतात आणि या फेऱयांदरम्यान एका मिनिटाची विश्रांती असते. प्रतिस्पर्ध्यावर बेल्टच्या खाली, मूत्रपिंडाच्या ठिकाणी किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला, मानेवर मुष्टिप्रहार करता येत नाही…
– राजू प्रभू









