‘विराट’ वारसदार…शुभमन गिल !

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भलेही शुभमन गिलला संधी मिळाली नसेल, पण सध्याच्या घडीला तो एकदिवसीय सामन्यांतील भारताचा सर्वांत भरवशाचा फलंदाज बनलाय यात शंकाच नाही…यंदाच्या दोन मालिकांत त्यानं दाखविलेला झपाटा हा त्यांच्या गुणांची व्यवस्थित झलक दाखविणारा अन् ‘विराटचा वारसदार’ हे वर्णनही सार्थ ठरविणारा…
शुभमन गिल…आता अनेकांच्या तोंडी जाऊन बसलेलं, चक्क विराट कोहलीचा वारसदार या नजरेतून पाहिलं जाऊ लागलेलं नाव…त्याला सर्वप्रथम प्रकाशात आणलं ते 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकानं…गिलनं त्या स्पर्धेत 418 धावा जमवत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चौथ्यांदा जेतेपद पटकावण्याच्या बाबतीत जबरदस्त हातभार लावला. त्यात समावेश होता तो पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय शतकाचा नि तीन अर्धशतकांचा…त्यापूर्वी त्याची चर्चा चालू नव्हती असं नव्हे. कारण प्रत्येक वयोगटातील स्पर्धेत शुभमननं केलेली धावांची लयलूट…
भारताच्या एकदिवसीय संघात शुभमनला बोलावण्यात आलं खरं, पण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रस्थापितांवर विश्वास टाकणं पसंत केल्यानं त्याच्यावर राखीव खेळाडूंसाठीच्या बाकावर बसून राहण्याची पाळी आली…त्यानंतर त्यानं कसोटीत पदार्पण केले ते सर्वांत कठीण परिस्थितीत. 2020 मधील मेलबर्नच्या त्या लढतीत तो सलामीला आला…ऍडलेडमध्ये 9 बाद 36 अशी नामुष्की वाटय़ाला आल्यानंतर मेलबर्नचा सामना अजिंक्य रहाणेच्या चमकदार कामगिरीमुळं, तर तो ऑस्ट्रेलिया दौरा रिषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, नटराजन आणि चेतेश्वर पुजारा यांच्यामुळं स्मरणात राहील. पण त्या सर्वांच्या पुढं वरच्या फळीत मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड सारख्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या ‘कूकाबुरा’ चेंडूच्या माऱयाचा समर्थपणे मुकाबला केला तो गिलनं…
मेलबर्नमध्ये दोन डावांत 80 धावा, सिडनीत प्रथमच अर्धशतक आणि त्यानंतर जिथं भारतानं जणू चमत्कार घडवला त्या गब्बावर अंतिम दिवशी अविस्मरणीय 91 धावांची खेळी…तो दिवस भलेही पंतच्या धाडसानं आपल्या नावावर केलेला असला, तरी स्टार्क, कमिन्स नि फिरकी गोलंदाज लिऑनला न जुमानता आक्रमक ड्राईव्ह्स, पुल, कटचा सपाटा लावणारा गिलचा डाव हा काही कमी चमकदार नव्हता…त्या ऑस्ट्रेलिया दौऱयानंतरच्या दोन वर्षांत शुभमन अनेकदा स्वस्तात बाद होण्यात मोठा वाटा राहिला तो त्याच्या चुकांचा. त्यातच रोहित शर्मा, के. एल. राहुल यांनी घेतलेल्या उसळीमुळं त्याला संघातील स्थान गमवावं लागलं…गेल्या वर्षीच्या अखेरीस बांगलादेशमध्ये सलामीला येण्याची शुभमन गिलला पुन्हा संधी मिळाली ती रोहितच्या अनुपस्थितीमुळं आणि त्यानंही पहिल्या कसोटी शतकासह त्याचं सोनं केलं…
तेव्हापासून शुभमननं मागं वळून पाहिलेलं नाहीये. त्याच्या फलंदाजीला आता आणखी एक नवीन आयाम मिळालाय तो वेगवान गोलंदाजांना उत्तुंग षटकार खेचण्याच्या क्षमतेचा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वांत फॉर्मात असलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडेच बोट दाखवावं लागेल…मागं वळून पाहताना गिलला क्रिकेटच्या सर्व प्रकारांतील भारतीय संघात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी वेळ लागला हे खरंच. पण या जादा वेळेनं त्याच्या फलंदाजीला तांत्रिकदृष्टय़ा मजबूत होण्यास मदत केलीय. त्यामुळंच 2023 चा शुभमन तीन वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये सलामीला आलेल्या गिलपेक्षा जास्त परिपूर्ण दिसतोय !

गिलचा झपाटा…
- शुभमन गिल हा विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागं टाकून एकदिवसीय सामन्यांत 1 हजार धावा सर्वांत जलदरीत्या पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरलाय…त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात सलग दुसरं शतक झळकावताना हा पराक्रम केला. गिलनं 19 डावांमध्ये टप्पा गाठलाय, तर कोहली नि धवन यांना त्यासाठी लागले 24 डाव…
- डावांचा विचार करता जागतिक स्तरावर सर्वांत जलद 1000 धावा करण्याच्या बाबतीत गिल पाकिस्तानच्या इमाम-उल-हकसह संयुक्तरीत्या दुसऱया क्रमांकावर विसावलाय…पहिल्या स्थानावर आहे तो पाकचाच फखर जमान (18 डाव)…
- शुभमननं क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यांत शतकांची नोंद केलीय. असा मान मिळविणारा तो पाचवा भारतीय. यापूर्वी कसोटी, एकदिवसीय अन् ‘टी20’मध्ये सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल नि विराट कोहली यांनी असा पराक्रम गाजविलाय…
- गिलनं ‘टी20’ सामन्यात जेव्हा शतक झळकविलं तेव्हा त्याचं वय होतं 23 वर्षं नि 146 दिवस. यावेळी त्यानं मोडीत काढला तो सुरेश रैनाचा विक्रम…
- शुभमन 18 जानेवारी रोजी एकदिवसीय सामन्यांत दुहेरी शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा व इशान किशननंतर पाचवा भारतीय फलंदाज बनला…
यंदा सुसाट…
- शुभमन गिलनं 1 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध 63 चेंडूंत नाबाद 126 नोंदविल्या अन् त्यावेळी त्याचा ‘स्ट्राईक रेट’ होता तब्बल 200. यंदाच्या वर्षात एखाद्या ‘टी20’ डावात 200 हून अधिक ‘स्ट्राईक रेट’ची नोंद केलीय ती फक्त सूर्यकुमार यादवनं (219.6)…
- गिलनं एकदिवसीय लढतीत तीन व ‘टी20’मध्ये एक शतक फटकावून यावर्षी नोंद केलीय ती एकूण चार शतकांची. विश्वातील अन्य कुठल्याही फलंदाजाला यंदा क्रिकेटच्या विविध प्रकारांत इतक्या शतकांची नोंद करणं शक्य झालेलं नाहीये..
- यंदा शुभमननं 76.90 च्या सरासरीनं 12 डावांमध्ये 769 धावा (एकदिवसीय व ‘टी20’) जमवल्याहेत त्या 134.37 एवढय़ा ‘स्ट्राईक रेट’नं…
- न्यूझीलंडविरुद्धच्या ‘टी20’ लढतीत नाबाद 126 धावांची तडाखेबंद खेळी करणाऱया गिलनं सपाट केला तो 8 सप्टेंबर, 2022 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दुबई इथं विराट कोहलीनं नोंदविलेला 122 धावांचा विक्रम…शिवाय एखाद्या देशाच्या फलंदाजानं न्यूझीलंडविरुद्ध ‘टी20’ सामन्यात नोंदविलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या…
क्रिकेटसाठी आहारात बदल…
- शुभमन गिलच्या आहारात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बदल झालाय…‘मी पंजाबी कुटुंबातील असल्यानं किती लोणी आणि पराठे खायचो याची एखादा कल्पना करू शकतो…जेव्हा मी क्रिकेटबद्दल अधिक गंभीर झालो तेव्हा मला आहार बदलावा लागेल याची जाणीव झाली. पण मला माहीत होतं की, मी माझ्या आहारातून रोटय़ांना पूर्णपणे काढून टाकू शकणार नाही. म्हणून ग्लुटेनमुक्त रोटय़ांकडे वळलो’, शुभमनचे शब्द…
- गिल न्याहारीत भरपूर फळं खाण्यावर भर देतो, तर प्रथिनांसाठी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट यावर ताव…दुपारच्या जेवणात ‘कार्बोहायड्रेट्स’वर लक्ष केंद्रित करून सहसा ‘ग्रील्ड चिकन’ किंवा डाळ-भात आणि काही वेळा त्यात रोटय़ांचा देखील समावेश असतो. पण त्या नेहमीप्रमाणं गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या नव्हे, तर ‘मल्टिग्रेन’च्या असतात…रात्रीचं जेवण फारसं जड राहणार नाही याची काळजी घेताना शुभमन भरपूर भाज्यांसोबत मांस पसंत करतो…
कारकिर्दीतील आकडे…
| प्रकार | सामने | डाव | नाबाद | धावा | सर्वोच्च | सरासरी | स्ट्राईक रेट | शतकं | अर्धशतकं |
| कसोटी | 13 | 25 | 2 | 736 | 110 | 32 | 57.68 | 1 | 4 |
| एकदिवसीय | 21 | 21 | 4 | 1254 | 208 | 73.76 | 109.8 | 4 | 5 |
| टी20 | 6 | 6 | 1 | 202 | नाबाद 126 | 40.4 | 166.57 | 1 | – |
- जन्म : 8 सप्टेंबर, 1999 (फझिल्का जिल्हा, पंजाब)…
- उंची : 5 फूट 10 इंच…
- ‘अ’ श्रेणी क्रिकेट पदार्पण : पंजाबच्या वतीनं 2016-17 मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत…
- प्रथम श्रेणी पदार्पण : 2017-18 मोसमात रणजी चषक स्पर्धेत…
- कसोटीत पदार्पण : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न इथं (26-29 डिसेंबर, 2020)…
- ‘वन डे’ पदार्पण : न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन इथं (31 जानेवारी, 2019)
- ‘टी20’ पदार्पण : श्रीलंकेविरुद्ध वानखेडेवर (3 जानेवारी, 2023)…
खेळ जुनाच, ओळख नवी : टेबल टेनिस

प्रचंड वेगवान अन् रोमांचक खेळांपैकी एक म्हणजे टेबल टेनिस…मुळात व्हिक्टोरियन युगातील इंग्लंडमधील उच्चभ्रू वर्गासाठीचा हा विरंगळुय़ाचा प्रकार. 1922 मध्ये टेबल टेनिस असे नामकरण करण्यापूर्वी या खेळाला ‘पिंग पाँग’ म्हटलं जात असे…सुरुवातीच्या काळात या खेळावर युरोपियन, विशेषतः हंगेरियन खेळाडूंचं वर्चस्व होतं. तथापि, 50 च्या दशकात आशियात प्रवेश केल्यावर टेबल टेनिस या खंडात जबरदस्त लोकप्रिय झाला…चीनमध्ये पहिला विश्वचषक आयोजित केल्यानंतर आठ वर्षांनी 1988 साली टेबल टेनिसनं उन्हाळी ऑलिंपिकमध्ये स्थान मिळविलं ते दक्षिण कोरियाच्या सोलमधून…
- टेबल टेनिसच्या नियमांनुसार, हा खेळ फायबरवूडपासून बनवलेल्या 2.74ƒ 1.53 मीटरच्या आयताकृती टेबलवर खेळला जातो. हे टेबल दोन भागांमध्ये विभागलेलं अन् गडद रंगानं रंगविल्यानं ‘मॅट’सारखं दिसत असतं. टेबलच्या मधोमध बांधलेलं जाळं 15.25 सेंटीमीटर उंचीचं असतं…
- सामान्यतः ‘रॅकेट’ किंवा ‘पॅडल’ म्हणून ओळखल्या जाणाऱया बॅटची लांबी साधारणपणे 17 सेंटीमीटर आणि रुंदी 15 सेंटीमीटर असते. ते प्रामुख्यानं लाकडापासून बनवलेलं असतं अन् त्याच्या दोन्ही बाजूला रबरी पृष्ठभाग काळय़ा नि लाल रंगात असतात…
- चेंडू सामान्यतः पांढऱया किंवा केसरी रंगाचा अन् सुमारे 2.7 ग्रॅम वजनाचा तसंच नियमांनुसार 40 मिलीमीटर व्यासासह गोलाकार असतो…
- टेबल टेनिसचा सामना पंच नाणेफेक घेऊन सुरू करतात. नाणेफेकीत जिंकणाऱयाला प्रथम सर्व्ह करण्याचे किंवा टेबलाच्या हव्या त्या भागाची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होतात…
- सर्व्ह करताना चेंडू खुल्या तळहातावर धरून वर उडवून नंतर फटकावणे आवश्यक असतो. चेंडू टेबलच्या सर्व्हरच्या बाजूला प्रथम टप्पा घेऊन मग जाळय़ावरून दुसऱया बाजूला जायला हवा…
- प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू जाळय़ावरून दुसऱया बाजूने फटकावू शकतो. तथापि, जर खेळाडूनं चेंडू टेबलवर टप्पा घेण्याच्या आधी तो परतविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘फाऊल’ ठरविलं जातं…
- एकेरीत सर्व्हिस करणार खेळाडू टेबलच्या कोणत्याही भागात चेंडू टाकू शकतो, तर दुहेरीमध्ये सर्व्हिसला तिरप्या दिशेनं प्रवास करावा लागतो. दुहेरीत सर्व्हिस करणारा खेळाडू टेबलच्या उजव्या बाजूने खेळत असतो…
- ‘टेटे’च्या नियमांनुसार, खेळाडू 11 गुण मिळवून ‘गेम’ जिंकू शकतो. प्रत्येक चुकीसाठी एक गुण दिला जातो. प्रत्येक खेळाडूला सलग दोनदा सर्व्हिस करायला मिळते.
- जो खेळाडू प्रथम 11 गुण मिळवितो त्याला विजेता घोषित केलं जातं. जर गुणांच्या बाबतीत 10-10 अशी बरोबरी झाली, तर खेळाडूला ‘गेम’ जिंकण्यासाठी दोन गुणांची आघाडी मिळवावी लागते…
- सामन्यातील ‘गेम्स’ची संख्या स्पर्धा आणि गटानुसार बदलते. एकेरी सामने सहसा सात, तर दुहेरीतील पाच गेम्सचे असतात…
– राजू प्रभू









