क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
रिअल इस्टेटमधील यशस्वी उद्योजक तसेच फुटबॉल प्रोमोटर पीटर वाझ यांचे काल बेंगलोरच्या एका इस्पितळात वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. गेले कित्येक दिवस ते कोविडशी झुंज देत होते. करंझाळेतील रहिवासी असलेल्या वाझ यांची प्राणज्योत अखेर शुक्रवारी सकाळी मालवली.
गोव्यात एका खासगी इस्पितळात दाखल झाल्यानंतर त्यांना तेथून जीएमसीत आणण्यात आले होते. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना बेंगलोरात नेण्यात आले. पणजीत असलेल्या मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्स या बांधकाम उद्योगाचे ते मालक होते. फुटबॉलप्रेमी असलेले पीटर वाझ यांनी गोव्यात फुटबॉलच्या विकासासाठी केलेले कार्य सर्वश्रृत असून ते गोवा प्रोफेशनल लीगमध्ये खेळणाऱया स्पोर्टिंग क्लुब दी गोवा या संघाचे मालक होते.
वाझ हे चेअरमन असलेल्या स्पोर्टिंग क्लबने गोव्याच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलमध्ये गोव्याची शान नेहमीच राखली. 1999-2000 मध्ये गोवा फुटबॉल संघटनेची लीग स्पर्धा जिंकल्यानंतर वाझ यांच्या स्पोर्टिंग क्लबने मागे कधीच वळून पाहिले नाही. 2005 मध्ये ओएनजीसीचा सुपर कप जिंकल्यानंतर 2005, 2006 व 2014 मध्ये स्पोर्टिंग फेडरेशन चषक फुटबॉलच्या अंतिम फेरीत गेले. 2004-05 मध्ये राष्ट्रीय फुटबॉल लीगचे उपजेतेपदही स्पोर्टिंग क्लबने मिळविले होते.
पीटर वाझ यांनी नेहमीच स्थानिक फुटबॉलपटूंना आपल्या संघात स्थान दिले. गोव्यातील कित्येक क्लबांना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदतही केली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पीटर वाझ यांच्या जाण्याने फुटबॉलमधील एक चांगला प्रशासक गमविल्याचे म्हटले आहे. त्यांचे भारतीय फुटबॉलमधील योगदान न विसरण्यासारखे आहे, असे महासंघाचे सचिव कुशल दास यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही पीटर वाझ यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे. वाझ यांचे राज्यातील फुटबॉल खेळाला दिलेले योगदान न विसरण्यासारखे आहे, असे कामत म्हणाले. राज्यातील तसेच भारतीय फुटबॉलचे अतोनात नुकसान झाले आहे. आपण एक सच्चा मित्र गमविल्याची प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
पीटर वाझ यांच्या निधनामुळे गोवा फुटबॉल विकास मंडळाचे चेअरमन तथा अर्जुन पुरस्कार विजेते ब्रम्हानंद शंखवाळकर, सागचे प्रशिक्षण उपसंचालक ब्रुनो कुतिन्हो, संजू नागवेकर, गोवा फुटबॉल संघटनेचे सदस्य प्रकाश देसाई, फुटबॉल आयोजक दिनेश नाईक, एल्विस गोम्स, आर्नाल्ड कॉस्ता तसेच गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी शोक व्यक्त केला आहे.









