युरो चषक फुटबॉल- मोराटा, लेवान्डोवस्की यांनी नोंदवले गोल
वृत्तसंस्था/ सेव्हिले, स्पेन
मिळालेल्या संधींचा लाभ उठवण्यात पुन्हा एकदा असमर्थ ठरल्याने युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत स्पेनला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्याच्या उत्तरार्धात त्यांना मिळालेल्या पेनल्टीचा लाभ उठविता आला नाही. यामुळे बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेलाही धक्का बसला आहे.
अल्वारो मोराटाने 25 व्या मिनिटाला स्पेनला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात 54 व्या मिनिटाला स्टार खेळाडू रॉबर्ट लेवान्डोवस्कीने जबरदस्त हेडरवर गोल नोंदवून पोलंडला बरोबरी साधून दिली. पोलंडने पूर्वार्धात दोनदा गोलजाळय़ाच्या दिशेने फटके मारले होते. पण त्यांची नेमबाजी सदोष ठरल्याने या संधी वाया गेल्या. बरोबरी झाल्यानंतर स्पेनला काही वेळातच पेनल्टी मिळाली होती. पण त्यांच्या गेरार्ड मॉरेनोने मारलेला फटका बारला लागून परतला. या रिबाऊंड झालेल्या चेंडूवर मोराटाने मारलेला फटका वाईड गेल्याने स्पेनची ही सुवर्णसंधी वाया गेली. स्वीडनविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातही स्पेनला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. येथील अनिर्णीत सामन्यानंतर गट ई मध्ये 2 गुणांसह स्पेन तिसऱया स्थानावर असून बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी बुधवारी स्लोव्हाकियाविरुद्ध होणाऱया सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. पोलंड एक गुण घेत या गटात तळाच्या स्थानावर असला तरी त्यांनाही आगेकूच करण्याची संधी आहे.
स्पेनचे मॅनेजर लुईस एन्रिक यांनी स्वीडनविरुद्ध खेळलेल्या संघात फक्त एक बदल केला. पण त्यांना मिळालेल्या संधींचा लाभ घेता न आल्याने एन्रिक यांनी फेरान टॉरेसच्या जागी मॉरेनोला मैदानात उतरवले. पोलंडला एक संधी मिळाली होती. पण त्यांच्या मॅथ्यूज क्लिचने लांबवरून मारलेला फटका बारच्या टॉपला लागून बाहेर गेला. मात्र 25 व्या मिनिटाला स्पेनला पहिले यश मिळाले. उजव्या विंगेतून मॉरेनोने आगेकूच करीत डाव्या पायाने मोराटाकडे क्रॉस पुरविला आणि मोराटाने त्याला गोलजाळय़ाची दिशा देण्याचे काम केले. मोराटाला प्रथम ऑफसाईड ठरविण्यात आले होते. पण व्हीएआर रिव्हय़ू पाहिल्यानंतर हा गोल वैध ठरविण्यात आला. दुसरा गोल नोंदवण्याची संधीही स्पेनला मिळाली होती. पण यावेळी मॉरेनोचा फ्री किक फटका वाईड गेल्याने ही संधीही वाया गेली. पोलंडलाही बरोबरीची संधी लाभली होती. त्यांच्या कॅरोल स्विडरस्कीने मारलेला फटका पोस्टला लागून परतलेला चेंडू लेवान्डेवस्कीच्या मार्गात पडला. त्याने गोलच्या दिशेने जोरदार फटका मारला होता. पण पोलंडच्या उनाव सायमनने अप्रतिम बचाव करीत तो वाया घालविला. उत्तरार्धात 54 व्या मिनिटाला पोलंडला बरोबरीची संधी मिळाली. कामिल जोझवियाककडून मिळालेल्या क्रॉसला लेवान्डोवस्कीने उंच उडी घेत हेडरवर चेंडूला गोलजाळय़ाच्या कोपऱयात धाडले. या सत्रात पोलंडच्या गोलरक्षकानेही काही अप्रतिम बचाव केल्याने स्पेनला आघाडी वाढविता आली नाही.









