युरोपीय देश संसर्गाच्या दुसऱया लाटेला तोंड देत आहेत. स्पेनमध्ये दिवसभरात 3,594 नवे रुग्ण सापडले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत लस प्रकल्पाच्या आढाव्यासह अलिकडच्या काळात उपलब्ध औषधांविषयी चर्चा करण्यात आली आहे. टाळेबंदी हटविण्यात आल्यावर स्पेनमध्ये पुन्हा वेगाने कोरोनाबाधित वाढू लागले आहेत.
अम्मानमध्ये टाळेबंदी

जॉर्डनमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदीची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात राजधानी अम्मानमध्ये टाळेबंदी करण्यात येणार आहे. कठोर पावले उचलण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही. लोकांना खबरदारी बाळगली असती तर अशाप्रकारचे पाऊल उचलावे लागले नसते असे तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अम्मानमध्ये आज टाळेबंदी लागू होणार आहे. या कठोर टाळेबंदीत केवळ मेडिकल स्टोअर्स उघडता येणार आहे. अन्य व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
टय़ुनीशियात कठोर नियम

देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता टय़ुनिशियाच्या आरोग्य मंत्रालयाने नियमांचे कठोर पालन करविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱया लोकांना आता दंड ठोठावला जाणार आहे. मास्क परिधान करणे आता अनिवार्य आहे. आदेश न मानणाऱयांना 120 ते 5 हजार टय़ुनिश दिनारपर्यंतचा (सुमारे 3,200 ते 1,36,00 रुपये) दंड आणि 6 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो असे कार्यकारी आरोग्यमंत्री मोहम्मद हबीब कैचौ यांनी सांगितले आहे.
डॉक्टरांची रजा रद्द

दक्षिण कोरियाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. याच कारणामुळे तेथील सर्व डॉक्टरांची रजा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. सर्व डॉक्टरांना कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशानंतरही देशातील डॉक्टर्स तीन दिवसांच्या संपावर जाण्याबाबत ठाम आहेत. योग्यवेळी संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा विचार केला जाऊ शकतो असे सरकारने म्हटले आहे.
12 मिनिटात चाचणी अहवाल

स्कॉटलंडच्या आरोग्य सेवेने लुमिराडीएक्स नावाच्या कंपनीचे कोरोना किट वापरण्यासाठी करार केला आहे. लुमिराडीक्सने तयार केलेल्या विशेष चाचणी किटद्वारे कोरोना संसर्गाचा अहवाल केवळ 12 मिनिटांमध्ये प्राप्त होणार आहे. हे टेस्ट किट सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. 300 रॅपिड टेस्टिंग मशीन्स आणि 5 लाख चाचण्यांकरता 67 लाख पौंड खर्च केले जाणार आहेत. या टेस्टिंग उपकरणात वापरल्या जाणाऱया विशेष प्रकारच्या स्ट्रिपची निर्मिती स्कॉटलंडमध्येच केली जाणार आहे.









