क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
ओडिशा एफसीने आगामी आयएसएल फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेनचे फ्रान्सिस्को रेमेरीझ गोंझालेज यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. किको या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले 51 वर्षीय गोंझालेजचा ओडिशा एफसीबरोबरचा करार एक वर्षाचा असून तो वाढविण्याची मुभाही त्यांना देण्यात आली आहे.
प्रोफेशनल फुटबॉलपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर रेमेरीज गोंझालेज यांनी स्पेनच्या जिम्नॅस्टीक या क्लबचे साहायक प्रशिक्षक म्हणून 2002 मध्ये आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरूवात केली. 2010 मध्ये पोब्ला माफूमेट या संघाला प्रशिक्षण दिल्यानंतर ते परत 2012 मध्ये जिम्नॅस्टीक संघाचे प्रशिक्षक बनले होते.
स्पेनच्या सीई हॉस्पिटालेट, सीडी कास्तेलोन आणि सीई साबादेल या संघांनाही त्यांचे प्रशिक्षण लाभले आहे. स्पेनचे फर्स्ट डिव्हीजनमध्ये ते नास्तिक दी तार्रागोनाचे प्रशिक्षक राहिल्यानंतर 2017 मध्ये गोंझालेज यांनी पोलंडच्या पॉलीश फुटबॉल क्लब विस्ला क्राकोलाही प्रशिक्षण दिले आहे. भारतात येण्यापूर्वी यूईएफए प्रो. लायसन्स असलेले गोंझालेज ग्रीकच्या एओ शेंठी एफसीचे व्यवस्थापकही राहिले आहेत. आपल्या फुटबॉलपटूच्या कारकिर्दीत गोंझालेज साबादेल, मलागा, सीयूटा आणि कार्तागोनोव्हा या बलाढय़ संघांतून खेळले आहेत.









