वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पेनच्या टेनिस क्षेत्रातील लिजेंड टेनिसपटू म्हणून ओळखले जाणारे पुरूष टेनिसपटू मॅन्युएल सँटाना यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. ते माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धेचे मानद अध्यक्ष होते.
मॅन्युएल सँटेना हे विंबल्डन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद मिळविणारे पहिले स्पॅनीश टेनिसपटू म्हणून ओळखले जातात. सँटेना यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत चार प्रमुख स्पर्धांमध्ये एकेरीतील अजिंक्यपदे मिळविली आहेत. 1961 आणि 1964 साली त्यांनी प्रेंच स्पर्धेत, 1965 साली अमेरिकन खुल्या तर 1966 साली विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते. मेक्सिकोमध्ये 1968 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सँटेना यांनी एकेरीत सुवर्ण तर दुहेरीत रौप्यपदक मिळविले होते. मेक्सिकोतील ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्यांदा टेनिस क्रीडाप्रकाराचा समावेश करण्यात आला होता. 1980 ते 1985 या कालावधीत ते स्पेनच्या डेव्हिस चषक संघाचे कर्णधारही होते. स्पेनच्या टेनिस फेडरेशनतर्फे सँटेना यांना आदरांजली वाहण्यात आली.









