ऑनलाईन टीम / विंडहोक :
स्पुतनिक-व्ही लसीमध्ये एडेनोव्हायरस टाइप 5 व्हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता वाढते, असा दावा काही संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे नामिबिया या आफ्रिकन देशाने स्पुतनिक-व्ही लसीच्या वापरावर बंदी घातली आहे.
नामिबियाच्या आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे की, काही संशोधनातून स्पुतनिक-व्ही लसीमध्ये एडेनोव्हायरस टाइप 5 व्हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये एचआयव्हीचा धोका वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील नियामक शाहपराने देशात स्पुतनिक-व्ही लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी नाकारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयानंतर नामिबियाच्या सरकारनेही तात्काळ या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. जोपर्यंत डब्ल्यूएचओकडून या लसीच्या आपातकालीन परवानगी मिळत नाही, तोपर्यंत देशात लसीच्या वापराला परवानगी देणार नसल्याचे नामिबियाने म्हटले आहे. दरम्यान, स्पुतनिक-व्ही लस विकसित करणाऱया जमेलिया रिसर्च इन्स्टिटय़ुटने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत हा निर्णय कोणत्याही शास्त्रीय पुराव्यांवर आधारित नसल्याचे म्हटले आहे.









