ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
स्पाइसजेटची खजुराहो ते दिल्ली विमानसेवा आजपासून (दि.१८) पूर्ववत झाली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. रविवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे.
जागतिक पर्यटननगरी असलेली खजुराहोची विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे. स्पाइसजेटने १८ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी दिल्लीहून खजुराहो विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ७८ आसनी एसजी २९५६ विमान दिल्लीहून ११.५० वाजता सुटेल आणि दुपारी १.१० वाजता खजुराहो येथे पोहोचेल, खजुराहो विमानतळावरून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि २.५० वाजता दिल्लीला पोहोचेल.
स्पाइसजेटचे मालक अजय सिंह म्हणाले, दिल्ली-खजुराहो सेवा सुरू करण्यासाठी आम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होतो. कोरोनामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. सिंधिया यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मार्चमध्ये त्याची सुरुवात करण्याची आमची योजना होती, पण सिंधिया यांच्या सांगण्यावरून ती आजपासूनच पूर्ववत करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय सिंधियाना जाते. दिल्ली-खजुराहो दरम्यानचे हे एकमेव विमान आहे. आठवड्यातील शुक्रवार आणि रविवार असे दोन दिवस आम्ही ते चालवू. प्रवाशीसंख्या वाढल्यास आम्ही या फेऱ्या वाढवू.









