विविध स्वरूपातील आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना परिणामकारक करण्यासाठी, त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल टेस्टींग एजन्सी’ म्हणजेच एनटीए ही संस्था महनीय काम करीत आहे.
राजधानी दिल्ली लगतच्या ‘नोएडा’ परिसरातील एनटीएचे अद्ययावत व सुसज्ज केंद्र असून या केंद्राद्वारे वेगवेगळय़ा स्पर्धा परीक्षांचे नियोजन-आयोजन करण्याचे काम निरंतर व अद्ययावत स्वरूपात सुरू असते. देशांतर्गत स्पर्धा परीक्षांच्या सर्व केंद्रांशी समन्वय साधून ठरावीक व पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक या केंद्रातर्फे केले जाते. अर्थात हे सारे साधण्यासाठी एनटीए संगणकीय प्रणालीवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करीत असते.
‘एनटीए’च्या कामकाजाची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये झाली. त्यावेळी एजन्सीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱया स्पर्धा परीक्षेच्या आयोजनाद्वारे आपल्या कामाचा मुहूर्त साधला. त्यानंतरच्या काळात एजन्सीने विविध प्रमुख संस्था आणि विभागांच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण अशा 11 स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सुमारे 54 लाख विद्यार्थ्यांची विविध संदर्भातील स्पर्धा परीक्षांच्या माध्यमाद्वारे चाचणी घेतली आहे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. याउलट स्पर्धा परीक्षांमधील जागतिक स्तरावर एनटीएची प्रतिस्पर्धी समजली जाणाऱया व एसएटी, जीआरई यासारख्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणाऱया एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसेस या संस्थेने मात्र जागतिक स्तरावर सुमारे 28 लाख विद्यार्थी-उमेदवारांची चाचणी घेतली एवढे सांगितले म्हणजे एनटीएची कामगिरी निश्चितच सरस ठरते.
एनटीएची स्थापन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे स्पर्धा परीक्षांचे संचालन करण्यासाठी एक स्वायत्त संस्था अशा स्वरूपात करण्यात आली. संस्थेची स्थापना करण्यामागे आपल्या स्पर्धा परीक्षांना स्वतंत्र, स्वायत्त व आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दर्जेदार स्वरूप मिळावे हा उद्देश स्पष्ट करण्यात आला. त्याचवेळी राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा दर्जा वाढवितानाच या स्पर्धांपोटी विद्यार्थी व पालकांना येणारा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश पण देण्यात आले होते हे विशेष.या अनुषंगाने आपल्या स्थापना काळापासूनच एनटीएने आधुनिक तंत्र व संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग पुरतेपणी करून घेतला. यामागे आपल्या स्पर्धा परीक्षांना अधिकाधिक दर्जेदार व आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम आणि परिणामकारक बनविणे असे बहुविध उद्देश होते. त्यादृष्टीने एजन्सीने पण अगदी सुरुवातीपासून स्वतःला अद्ययावत ठेवले.या संदर्भातील विशेष यशस्वी प्रयत्न म्हणून ‘एनटीए’तर्फे यावषी आयोजित करण्यात आलेल्या एनईईटी या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करावा लागेल. या वषीची ‘नीट’ स्पर्धा परीक्षा संगणकीय पद्धतीने आयोजित केली गेली नव्हती. त्यामुळे अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि गांभीर्य कायम राखण्यासाठी एनटीएतर्फे विशेष खबरदारीचा उपाय म्हणून कुठल्याही ‘नीट’ परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेआधी प्रश्नपत्रिका पेटी उघडण्यात आल्यास एनटीएच्या मुख्यालयात त्याची त्वरित सूचना मिळण्याची अद्ययावत पद्धती अमलात आणली व त्यामुळेच यावषीची राष्ट्रीय स्तरावर लिखित स्वरूपात निर्धारित करण्यात आलेली ‘नीट’ परीक्षा खऱया अर्थाने नीट व यशस्वीपणे संपन्न झाली.‘एनटीए’च्या यानंतरच्या प्राधान्यक्रमात प्रामुख्याने समावेश आहे तो उमेदवारांच्या कल चाचणीचा. विद्यार्थ्यांचा त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित विषयात भविष्यकालीन करिअर म्हणून कितपत रस वा रूची आहे याची पडताळणी करण्यासाठी या कल चाचण्यांचा ‘एनटीए’ उपयोग करून घेणार आहे. सध्यातरी या कलचाचणीचा प्रयोग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.याच्याच जोडीला ‘एनटीए’तर्फे अद्ययावत व संगणकीय पद्धतीवर आधारित अशा कॉम्प्युटराईज्ड ऍडाप्टिव्ह टेस्टींग म्हणजेच ‘कॅट’ या स्पर्धा परीक्षेची सुरुवात करण्यासाठी एजन्सी सज्ज आहे. या चाचणी परीक्षेचा मुख्य उद्देश संबंधित विद्यार्थ्यांच्या क्षमतेची पातळी पडताळून त्याची भविष्याच्या संदर्भातील शैक्षणिक क्षमता कितपत राहू शकेल याचा अधिकाधिक प्रमाणात अद्ययावत अंदाज घेणे अशा दुहेरी स्वरूपाचा आहे. पारंपरिक लेखी परीक्षेऐवजी कॅट या तुलनेने अल्पकालीन अशा चाचणी परीक्षेत संक्षिप्त उत्तर-प्रतिसादावरच भर देण्यात येईल असे पण या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.एनटीएने दिलेल्या माहितीनुसार ‘कॅट’ परीक्षा मुळातच आव्हानपर व लवचिक असते. या परीक्षेचे स्वरूप व प्रक्रिया उमेदवारांचे उत्तर वा प्रतिसादावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चूक दिल्यास त्या उमेदवाराला पर्यायी प्रश्नाचे उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध असतो तर बरोबर उत्तर देणाऱयाला त्याहून अधिक कठीण प्रश्न विचारला जाऊन त्याची बुद्धिमत्ता पडताळणी करण्यात येते. संगणकीय पद्धतीने आयोजित या परीक्षेतील अचूक उत्तरांच्या आधारे त्यांचे अंतिम मूल्यांकन ‘कॅट’द्वारा करण्यात येते. जागतिक स्तरावर जीमॅट, सॅट, जीआरई यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठीपण याच तत्त्वानुसार मूल्यांकन केले जाते हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.एनटीएच्या परीक्षा संगणकीय पद्धतीवर आधारित व लवचिक व सुलभतेने घेता येण्यासारखी असल्याने या स्पर्धा परीक्षा आयोजक व उमेदवारांच्या सोयीनुसार 4 ते 5 दिवसांच्या सोयीस्कर कालावधीत घेता येतात. यातूनच यावषी प्रथमच एनटीएतर्फे जेईई (मेन) ही स्पर्धा निवड परीक्षा प्रथमच वर्षातून घेण्यात आली हे उल्लेखनीय आहे. या लवचिक परीक्षा पद्धती व वेळापत्रकामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी व त्यांचे पालक या उभयतांचा तणाव कमी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.आपल्या स्थापनाकाळाच्या एक वर्षाच्या आतच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आता विविध प्रकारच्या वा विविध स्वरूपाच्या 13 स्पर्धा परीक्षांचे नियोजन-आयोजन करण्याचे महत्त्वपूर्ण काम देण्यात आले असून यामुळे ‘एनटीए’च्या यशस्वी सुरुवातीवर यश आणि विश्वासाची जणू मोहोरच लागली असेच म्हणावे लागेल.








