विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा
प्रतिनिधी / नवी मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील 24 वर्षीय स्वप्नील लोणकर नावाच्या युवकाने आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून स्पर्धा परिक्षा करणाऱ्या तरूणांनी व नेते मंडळींनी राज्य शासनाला लक्ष्य केले. यावरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
नैराश्यच्या गर्तेत समाजातील अनेक घटक अस्वस्थ आहे, यासाठी मोर्चे, आंदोलने निघत आहेत. यानिमित्ताने राज्य शासनाने आता तरी विद्यार्थी, बेरोजगार युवकांचा विचार करुन योग्य ती पावले उचलावीत. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलले, कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे, असे ही यावेळी ते म्हणाले.
सुटत चाललेली उमेदीची वर्षे आणि पैसा युवकांना नैराश्येकडे खेचतात
महाराष्ट्रातील अनेक युवक अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन वर्षानुवर्षे स्पर्धा परिक्षांची तयारी करत असतात. राज्य लोकसेवा आयोगाची जाहिरात निघाल्यापासून ते निकाल लागे पर्यंतची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी महिनो- महिन्याची असते. यासाठी युवकांना याची वाट पहावी लागते. हे स्वीकारुनच युवक या परिक्षांचा अभ्यास करत असले तरी बेताची परिस्थिती, वाढत्या वय, वाढत चालेले जबाबदारीचे ओझे, होणारा खर्च व ऐन उमेदीच्या वर्षातील वेळ आणि पैसा अभ्यासकाला कायम सतावत राहतो. यातुनच युवक नैराश्येच्या गर्तेत जातात. ज्याचा शेवट कधी- कधी युवक स्वत:ला संपण्याचा विचार करतात, अशाच प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत.