गोवा राज्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच जणू. जत्रोत्सवाच्या कार्यक्रमांबरोबरच विविध शैक्षणिक संस्थांची स्नेहसंमेलने गोमंतकीयांना वेगळा आनंद देऊन जातात.
गोवा राज्यातील विविध शैक्षणिक वास्तूंमध्ये होणारी स्नेहसंमेलने व बक्षीस वितरण सोहळा म्हणजे गोव्यातील पालक वर्गासाठी सांस्कृतिक मेजवानीच ठरते. स्नेहसंमेलनाची जर व्याख्या केली तर प्रेमाचे, स्नेहाचे मीलन व विद्यार्थ्यांच्या या स्नेहसंमेलनाच्या रूपाने पालकवर्ग, संस्था चालक एकत्रित येऊन खऱया अर्थाने हा आनंदोत्सव साजरा करतात. डिसेंबर अखेरपर्यंत विविध शैक्षणिक संस्थांनी स्नेहसंमेलने घडवून आणली व अजूनही होत आहेत. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कामगिरीची दखल घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली जातात. हा सोहळा विद्यार्थ्यांच्यादृष्टीने प्रेरणादायी ठरतो. काही स्नेहसंमेलनात तर यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होते व भाषण पेरणादायी ठरते. यातूनच विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधण्यास मदत होते. काही शैक्षणिक संस्था स्नेहसंमेलनाऐवजी क्रीडा महोत्सव साजरा करतात. या क्रीडा महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य सिद्ध करण्याचीही संधी लाभते. आताच्या मोबाईल युगात बहुतांश विद्यार्थीवर्ग व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. व्यायाम नसल्याने मुलांमध्ये अनेक शारीरिक व्याधी उद्भवण्याची भीती सध्या पालकवर्गात आहे. त्यांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढण्यासाठी क्रीडा महोत्सव होणे आता नितांत गरजेचे आहे. त्यादृष्टीनेही काही शैक्षणिक संस्थांनी पावले उचलली आहेत. काही महाविद्यालये ‘फन वीक’ साजरा करून वर्षभरातील करमणुकीचा कार्यक्रम सादर करून आपल्याबरोबरच पालकवर्गाचे मनोरंजन करतात.
सध्या गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे स्वरूप बदलत चालले असून ते भव्यदिव्य होत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडविले जाते. आज विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कला व संस्कृती खात्यातर्फे कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने या स्नेहसंमेलनामध्ये आता विविधरंगी कार्यक्रम पहायला मिळतात. आता विविध शैक्षणिक संस्था एक विषय ठरवून त्या विषयावर आधारित स्नेहसंमेलने गाजवतात. काही शैक्षणिक संस्था तर स्नेहसंमेलनाच्यारूपाने महानाटय़ाचे दर्शन रसिकांना घडवत आहेत. या महानाटय़ामुळे सर्व विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याची संधी लाभते. त्यांना त्यातून कला सादरीकरणाचा आनंद लाभतो. आपल्या पाल्याला स्नेहसंमेलनात सहभागी करून घेतल्यामुळे पालक वर्गाकडूनही समाधान व्यक्त होते. स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या पाल्याच्या वेषभूषेवरही आजचा पालकवर्ग बऱयाच प्रमाणात खर्च करताना दिसून येतो. मात्र या खर्चाचा विचार न करता आपल्या पाल्याला स्नेहसंमेलनाच्या रूपाने व्यासपीठ लाभते आहे, याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा ठरतो.
गोव्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘जाणता राजा’ महानाटय़ साकार झाल्यानंतर विविध शैक्षणिक संस्थांनी ही संकल्पना मनी रूजवून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ठरावीक विषयावर महानाटय़ सादरीकरणाची प्रथा सुरू केली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे स्वरूप बदलते आहे व रसिकांना जणू ही सांस्कृतिक मेजवानी ठरली आहे.
म्हादईचा प्रश्न सध्या बिकट होत चालला आहे. आपें-मडगाव येथील रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराच्या विद्यार्थ्यांनी तर लोकजागृतीचा हेतू नजरेसमोर ठेवून ‘म्हादई आमची आई’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलन सादर केले. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी तर प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांची उपस्थिती होती. वेळगे-सांखळी येथील बाळकृष्ण बांदोडकर शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच कला शिक्षकांनी स्नेहसंमेलनात व्यासपीठ सजविण्यासाठी तब्बल 50 किलो रद्दीचा वापर करून त्यापासून आकर्षक पर्यावरणपूरक व्यासपीठ साकारले व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला व गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश देणारा पुतळा साकारताना कलात्मकेचे दर्शन घडविले. मडगाव येथील पॉप्युलर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर ‘नारी तू नारायणी’ या विषयावर महानाटय़ सादर केले. या कार्यक्रमातून इतिहासातील पाच श्रेष्ठ महिलांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला. अशाचप्रकारे गोव्यातील अनेक विद्यालयांमधून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला.
लोकविश्वास प्रतिष्ठान ढवळी फोंडा यांच्यातर्फे विशेष मुलांचे ‘गीत रामायण’ महानाटय़ रविवार दि. 12 जानेवारी रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या महानाटय़ात एकूण 367 विशेष मुले सहभागी होणार असून विशेष मुलांनाही याद्वारे कलेचे व्यासपीठ लाभणार आहे, ही खरोखरच समाधानाची बाब आहे.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने विविध योजना आखलेल्या आहेत. स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरून कलेचे दर्शन घडविणाऱया या विद्यार्थ्यांच्यारूपाने भविष्यात चांगले कलाकार या गोमंतक भूमीला लाभून गोव्याचे कला दालन अधिकाधिक समृद्ध होईल, यात शंका नाही.
राजेश परब








