अफगाणिस्तानच्या स्थितीचा प्रभाव -आयएसआयकडून कट रचला जाण्याची भीती
अफगाणिस्तान आता तालिबानच्या कब्जात आहे. तालिबानची राजवट आता प्रस्थापित होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. भारताने आतापर्यंत याप्रकरणी भूमिका स्पष्ट केलेली नाही. याप्रकरणी ‘पहा आणि प्रतीक्षा करा’ या रणनीतिचा भारत अवलंब करत आहे.
जगातील अन्य महत्त्वाचे देश अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीबद्दल कुठलीच भूमिका घेत आहेत यावर विदेश मंत्रालय नजर ठेवून आहे. पाकिस्तान या संधीचा लाभ घेत भारताविरोधात वापर करण्यासाठी कट रचू शकतो, पण त्याला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण, तालिबानने यापूर्वीच काश्मीर मुद्दय़ाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद ठरविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्थितीबद्दल अधिकाऱयांकडून आढावा घेत आहेत. भारतीयांच्या सुखरुप वापसीवरून पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. जामनगर येथे पोहोचलेल्या भारतीयांसाठी सर्वप्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दहशतवादाचे केंद्र ठरण्याची भीती
अफगाणिस्तानवरून सुरक्षेसंबंधी चिंता निर्माण झाल्या आहेत. तालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तान आता दहशतवादाचे नवे जागतिक केंद्र ठरू शकतो. विशेष म्हणजे या देशात दहशतवादीच सत्तेवर असणार आहेत. अमेरिकेने अफगाण सैन्याला पुरविलेली शस्त्रास्त्रs आता तालिबानकडे आहेत. याचबरोबर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि लष्कर-ए-झांगवीचे अस्तित्व देखील असल्याचे समोर आले आहे. काबूलनजीकच्या काही गावांमध्ये या दहशतवादी संघटनांनी चेक पोस्ट तयार केल्या आहेत.
काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क
अफगाणिस्तानात वेगाने बदलत्या स्थितीदरम्यान काश्मीरमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. खोऱयातील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडे अफगाणिस्तानच्या स्थितीचा लाभ उचलून काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे बळ निश्चितच नाही. तसेही तालिबानने काश्मीरला भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय प्रश्न मानत असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. याचमुळे तालिबान प्रारंभिक काळात काश्मीरमध्ये हस्तक्षेप करू पाहण्यास धजावणार नसल्याचे मानले जात आहे.
आयएसआय सक्रीय
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय काश्मीर मुद्दय़ावर तालिबानला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकते. पण तालिबानवर आता आयएसआयचा फारसा प्रभाव राहिलच असे नाही, कारण तालिबान आता सत्तेवर आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे तळ अफगाणिस्तानात यापूर्वी होते, याचमुळे भारत आता यातून धडा घेत जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर करडी नजर ठेवून आहे.
स्थिती धोकादायक- थरूर
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अफगाणिस्तानच्या स्थितीला धोकादायक ठरविले आहे. तालिबानच्या राजवटीमुळे पाकिस्तान पूर्णपणे आनंदी होईल असे मला वाटत नाही. सत्तेवर आलेले पाकिस्तानसमर्थकच असेल असेही नाही. पण आमच्यासाठी स्थिती धोकादायक आहे हे मान्य करावे लागणार असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.









