वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या स्थापनादिनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत अजब घटना घडली आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकविण्यासाठी सोनिया गांधी पोहोचल्या होत्या. परंतु दोर खेचताच झेंडा त्यांच्यावर कोसळला. या घटनेमुळे तेथे उपस्थित सर्व काँग्रेस नेत्यांना धक्का बसला. त्यानंतर एका महिला कार्यकर्त्याने धाव घेत झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही अपयश आले. अखेरीस सोनियांनी हातानेच पक्षाचा झेंडा फडकविला.
आमचा वारसा गंगा-जमुना संस्कृती मिटविण्याचा प्रयत्न होतोय. देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला असुरक्षित वाटू लागले आहे. लोकशाही आणि घटनेला बाजूला सारले जात असताना काँग्रेस गप्प बसू शकत नसल्याचे उद्गार सोनियांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना काढले आहेत.
काँग्रेस मूकदर्शक राहणार नाही आणि कुणालाही देशाची समृद्धी तसेच वारसा मिटवू देणार नाही. द्वेष आणि पूर्वग्रह बाळगून असलेल्या विभाजनकारी विचारसरणी आणि ज्यांची आमच्या स्वातंत्र्यलढय़ात कुठलीच भूमिका राहिलेली नाही, अशा विचारसरणी आता आमच्या समाजाच्या धर्मनिरपेक्ष स्वरुपाला धक्का पोहोचवित असल्याचे विधान सोनियांनी केले.
स्वतःला एक भूमिका मिळवून देण्यासाठी या विचारसरणी इतिहासाचे पुनर्लेखन करत आहेत. त्यांच्याकडून भावना भडकाविण्यात येतात, भीती निर्माण करत शत्रुत्व फैलावले जात आहे. आमच्या संसदीय लोकशाहीच्या उत्तम परंपरांना जाणूनबुजून नुकसान पोहोचविले जातेय. आमच्या दृढसंकल्पावर कुठलाच संशय राहू नये. आम्ही आमच्या मूलभूत विश्वासांवरून कधीच तडजोड केलेली नाही आणि कधीच करणार नसल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.
निवडणुकीत उतार-चढाव येत राहतात, परंतु विविध सामजाच्या सर्व लोकांची सेवा करण्याची आमची प्रतिबद्धता नेहमी सोबत राहते. पक्ष लोकविरोधी कटांना तोंड देण्यासाठी शक्य ते सर्व बलिदान करणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.









