एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी कोणत्या ठिकाणी, कोणत्या परिस्थितीत, परिसरात राहते यावर त्या घटकांवर होणारा योग्य किंवा अयोग्य परिणाम अवलंबून असतो. अशा स्थानविशेष आणि योग्यायोग्यता सांगणारे काही श्लोक संस्कृतमध्ये आहेत.
कुस्थानस्य प्रवेशेन गुणवानपि पीडय़ते।
वैश्वानरोएपि लोहस्थः कारूकैरभिहन्यते।।
अर्थ – एखाद्या निंदनीय स्थानी प्रवेश केल्यावर (गेल्यावर) गुणवान माणसालाही त्रास दिला जातो. पहा ना, वैश्वानर असलेल्या अग्नीलाही लोखंडाचा आश्रय घेतल्यावर लोहाराकडून (घणाने) मारले जाते. वरील श्लोकात शक्तीशाली अग्नी केवढीतरी उलथापालथ करू शकतो. पण लोहाराच्या भात्याजवळ एखादी लोखंडी वस्तू आगीत घालून तापवून लाल केली जाते, तेव्हा एक सामान्य लोहार आपल्या अवजड घणाचे घाव आपल्याला हवा तो आकार देण्यासाठी तिच्यावर घालतो. म्हणजेच त्या लोखंड तापवणाऱया अग्नीलाच तो ठोकत असतो. लोहाराच्या शक्तीशाली घावांपुढे तो हतबल होतो. कवीने किती समर्पक उदाहरण दिले आहे ना! आता आणखी एक श्लोक पाहूया
अश्वः शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च।
पुरुषविशेषं प्राप्ता भवन्ति योग्या अयोग्या च।।
अर्थ- घोडा, शस्त्र, शास्त्र, वीणा, वाणी (भाषा), पुरुष आणि स्त्री या गोष्टी ज्या माणसाच्या संपर्कात येतात, त्याप्रमाणे त्या वागण्यास किंवा वापरण्यास योग्य किंवा अयोग्य होतात. वरील श्लोकात काही सजीव व काही निर्जीव गोष्टी सांगितल्या आहेत. सजीव गोष्टींवर म्हणजे प्राणी किंवा स्त्री-पुरुष यांच्यावर त्यांच्या घरात जसे संस्कार होतील त्याप्रमाणे ते योग्य किंवा अयोग्य वागतील. घोडय़ासारख्या हुशार प्राण्यावर तुम्ही प्रेम केलेत, त्याला छान प्रशिक्षण दिलेत तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल, तुमच्याशीही तो प्रेमाने वागेल. तेच माणसांचेही. घरात आईवडील, वडीलधारी माणसे यांच्याकडून मुलांना प्रेम मिळाले, एकमेकांशी कसे बोलावे, थोरांचा मान राखावा, नम्र असावे इ.संस्कार झाले, तर एक चांगले व्यक्तिमत्त्व घडेल. नाहीतर याच्या अगदी उलट असेल तर गुन्हेगारी किंवा बेफिकीर, उर्मट, उद्धट अशीच व्यक्ती घडेल. तेच निर्जीव गोष्टींचे. कोणतेही शस्त्र, वाद्य वापरताना त्याची योग्य ती निगराणी करावी लागते, ते चालवायचे किंवा वापरायचे कसे आणि केव्हा ते शिकावे लागते तरच त्याचा योग्य उपयोग करता येऊ शकतो. अन्यथा ते विनावापर पडून गंजून जाईल, निरुपयोगी होईल. म्हणूनच त्या त्या गोष्टींचे महत्त्व योग्य स्थान मिळाल्यासच वाढते. नाहीतर कोणालाही ते उपयुक्त रहात नाही किंवा त्याचा उपद्रव होऊ शकतो.








