प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रीन व ऑरेंज झोनमधील नागरिकांना जिह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. रत्नागिरी जिह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिह्यात येण्यासाठी असे मिळून 35 हजार ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत. यातील 1700 जणांचे ऑनलाईन पास तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिह्यातून बाहेर जाण्यासाठी तब्बल 15 हजार अर्ज आले आहेत. यामध्ये राज्यातील अन्य जिह्यांमध्ये जाण्याबरोबरच कर्नाटक, केरळ, बिहार, पश्चिम बंगाल राज्यात जाण्यासाठीचेही अर्ज आहेत. त्याचप्रमाणे परजिह्यातून किंवा अन्य राज्यातून रत्नागिरी जिह्यात येण्यासाठीही 20 हजार अर्ज आले आहेत. यामध्ये फक्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 29 व्यक्तींची यादी देण्यात आली आहे. या व्यक्तींच्या सर्व तपासण्या व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना जिह्यात घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा स्पष्ट केले आहे.
जिल्हाबाहेर जाण्यासाठी मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यासाठी मजूरांची गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे. ज्यांना आपल्या गावी जायचे आहे त्यांनी स्वखर्चाने जायचे आहे. त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था झाली नाही तर प्रशासनाकडून ती करून देण्यात येईल. मात्र त्याचे शुल्क संबंधित प्रवाशांनाच भरावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाबाहेरून अधिकृत परवानगी घेवून येणाऱयाच लोकांना जिल्हय़ात प्रवेश दिला जाईल. त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या केल्या जातील. तसेच जिल्हय़ात आल्यानंतर क्वारंटाईन राहण्याची तयारीसुध्दा दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा अशा लोकांना परवानगी दिली जाणार नाही. जे लोक अनधिकृतपणे दाखल होतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.
जिल्हय़ात प्रवेश करण्यासाठी प्रथम संबधीत जिल्हय़ाच्या प्रशासनाकडून परवानगीची प्रक्रिया पार पाडावी लागते. संबंधित जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा परीपूर्ण प्रस्ताव आल्यानंतरच या नागरिकांना जिल्हय़ात घ्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
तिन्ही सीमांवर कडक नाकेबंदी
अत्यावश्यक सेवेच्या अथवा मालवाहू गाडय़ांमधून छुप्या पध्दतीने कोणी जिल्हय़ात दाखल झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होईलच पण संबधीत वाहन चालकाविरोधातही कारवाई केली जाणार आहे. तसेच कशेडी, कुंभार्ली आणि आंबा घाट या तिन्ही सीमेवर आणखी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हय़ात येणाऱया प्रत्येक वाहनांवर हे पोलीस वॉच ठेवतील असेही मिश्रा यांनी सांगितले.









