प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात स्थगित झालेल्या क्वॉरी आणि दगड खाणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती खाण आणि भू विज्ञान अधिकारी मुरुगेश निराणी यांनी दिली आहे. विधानसौध येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिमोगा आणि चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात घडलेल्या क्रशरमधील स्फोटाच्या घटनेनंतर राज्याच्या अनेक क्वॉरी आणि दगड खाणी बंद झाल्या आहेत. त्यामुळे सरकारला 300 कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे दगड खाणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात याबाबतचा आदेश जारी करण्यात येईल. यापुढे दगड खाणी आणि क्रशर मालकांकडून हमीपत्र लिहून घेऊन खाणी सुरु करण्यास मुभा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
क्रशर मालकांनी स्फोटकांचा वापर करण्यासाठी सक्तीने परवानगी घ्यावी. राज्यात घडलेल्या दोन भीषण घटनांमुळे क्वॉरींमधील सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. काही दिवसांपासून दगड खाणी बंद असल्यामुळे अनेक बांधकामे अर्ध्यावरच थांबली आहेत. परिणामी अनेकांना रोजगार गमवावे लागले आहे. आणखी एकीकडे जनतेला मागण्यांनुसार खडी, दगड पुरवठा करणे शक्य झालेले नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन बंद असणाऱया क्वॉरी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ते म्हणाले.
स्फोटकांसाठी परवानगी सक्तीची
क्वॉरी आणि दगड खाण मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आपली भेट घेऊन बंद असणाऱया क्वॉरी पुन्हा सुरु करण्यास मुभा द्यावी, अशी विनंती केली होती. स्फोटकांच्या वापराशिवाय खाणी आणि क्रशर चालविणे शक्यच नाही. त्यामुळे खाण सुरक्षा महासंचालकांकडून परवानगी देणे अनिवार्य आहे. शिवाय या प्रक्रियेतील नियम शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री निराणी यांनी सांगितले.









