रिषभ पंत-संजू सॅमसन आज आमनेसामने भिडणार
मुंबई / वृत्तसंस्था
मागील सामन्यात कर्णधार संजू सॅमसनच्या धडाकेबाज शतकानंतरही पराभवाची नामुष्की पत्कराव्या लागलेल्या राजस्थान रॉयल्स संघासमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. संजू सॅमसन व रिषभ पंत हे दोन युवा कर्णधार या निमित्ताने आज आमनेसामने भिडतील. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
यंदाच्या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सने नवा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दमदार विजयी सुरुवात केली. त्यांनी चेन्नई सुपरकिंग्सला 7 गडी राखून धूळ चारली. दुसरीकडे, राजस्थानला देखील आपल्या पहिल्या लढतीत पंजाब किंग्स इलेव्हनविरुद्ध अंतिम क्षणी 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
विजयासाठी 222 धावांचे खडतर आव्हान असताना सॅमसनने (63 चेंडूत 119) धडाकेबाज शतक साकारले होते. मात्र, शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना हाच सॅमसन झेलबाद झाला. सॅमसनच्या त्या जिगरबाज खेळीत 12 चौकार व 7 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
हा पराभव कमी असावा म्हणून की काय, बेन स्टोक्स उर्वरित आयपीएल मोसमात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आणि आता स्टोक्सच्या गैरहजेरीत जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग यांच्यावर अधिक जबाबदारी असेल, हे स्पष्ट आहे. दुबळी गोलंदाजी ही देखील राजस्थानची आणखी एक चिंता आहे. चेतन साकारियाने (3-31) स्वप्नवत पदार्पण केले. अन्य गोलंदाज मात्र चांगलेच अपयशी ठरले. मुस्तफिजूर रहमान, ख्रिस मॉरिस, स्टोक्स, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया या सर्वांची गोलंदाजी महागडी ठरली.
दिल्लीची स्वप्नवत सुरुवात
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी यंदा स्वप्नवत सुरुवात झाली असून पहिल्या लढतीत त्यांनी चेन्नई सुपरकिंग्सचा फडशा पाडला आहे. वास्तविक, त्या सामन्यात चेन्नईने 7 बाद 188 धावांचा डोंगर रचला होता. पण, शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी 138 धावांची सलामी देत विजयाची भक्कम पायाभरणी केली होती. त्यानंतर पंत (नाबाद 15), स्टोईनिस (14) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दिल्लीने 8 चेंडूंचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला होता.
गोलंदाजीत ख्रिस वोक्स (2-18) व अवेश खान (2-23) यांनी उत्तम मारा केला आणि त्याची पुनरावृत्ती येथेही करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. रविचंद्रन अश्विन, टॉम करण, अमित मिश्रा व स्टोईनिस यांना मागील अपयशाची भरपाई करण्यासाठी येथे प्रयत्न पणाला लावावे लागतील. या लढतीच्या निमित्ताने दोन युवा कर्णधार आमनेसामने भिडणार आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनूज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, ऍन्ड्रय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला.
सामन्याची वेळ- सायं. 7.30 वा.
ऍनरिच नोर्त्झे कोरोनाबाधित, दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का
दिल्ली कॅपिटल्सचा दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाज ऍनरिच नोर्त्झे कोरोना पॉझिटिव्ह झाला असून हा राजस्थान रॉयल्ससाठी आणखी एक धक्का ठरला आहे. या संघातील अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर फेकला गेल्यानंतर काही तासांमध्येच नोर्त्झे देखील पुढील काही सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
बीसीसीआयच्या दिशानिर्देशानुसार, कोरोनाबाधित खेळाडू/सदस्यांनी लक्षणे दिसून आली, तेव्हापासून किंवा चाचणीसाठी नमुने घेतले गेले, तेव्हापासून किमान 10 दिवस स्वतःला आयसोलेट करणे सक्तीचे आहे. यापैकी जो कालावधी लवकर असेल, ते यासाठी विचारात घेतले जाते. नोर्त्झे यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत खेळला होता. पहिले दोन सामने खेळल्यानंतर तो आयपीएल स्पर्धेसाठी भारताकडे रवाना झाला. भारतात पोहोचल्यानंतर तो सात दिवस क्वारन्टाईन होता व येथे दाखल झालेल्या त्याचा अहवाल निगेटिव्ह होता. यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी अक्षर पटेल हा दिल्लीचाच आणखी एक खेळाडू देखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या मोसमात खेळणार नाही, हे स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच सर्वश्रुत होते.









