मानसिक स्वास्थ्य, दुखापतीसाठी घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्याच्या कारणास्तव बेमुदत ब्रेक घेणार असल्याने त्याने भारताविरुद्ध होणाऱया मालिकेतून माघार घेतली असल्याचे ईसीबीने सांगितले.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘स्टोक्सच्या डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली असून त्याला विश्रांती मिळावी यासाठीही त्याने ब्रेकचा निर्णय घेतला आहे. या दुखापतीनंतर या महिन्याच्या सुरुवातीला त्याने पुनरागमन केले होते. पण त्याची दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नाही.’ कोरोना महामारीच्या कालावधीत खेळाडूंना दीर्घ काळपर्यंत बायोबबलमध्ये राहून खेळावे लागत असल्याने क्रिकेटपटूंचे मानसिक आरोग्य हा सतत चर्चेचा विषय बनला असून इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक ऍश्ले जाईल्स यांनी स्टोक्सच्या या निर्णयाला ईसीबीचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ‘बेनने आपल्या भावना व्यक्त करण्याचे मोठे धाडस दाखवले असून सर्वांचे मानसिक आरोग्य व कल्याण जास्त महत्त्वाचे असल्याचे आम्ही मानतो आणि यापुढेही त्याला आमचे प्राधान्य असेल,’ असे जाईल्स म्हणाले.
कोरोनामुळे सुरक्षित वातावरणात दीर्घ काळपर्यंत रहावे लागल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एका विशिष्ट वातावरणात बराच काळ कुटुंबियापासून दूर राहणे तसेच हालचालीवरील निर्बंध हे खरोखरच खूप आव्हानात्मक आहे. गेले सुमारे 16 महिने या परिस्थितीला खेळाडूंना सामोरे जावे लागले असून त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. स्टोक्सला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले असून त्याला योग्य वाटते तेव्हा त्याने पुनरागमन करावे. तो लवकरच इंग्लंडसाठी पुन्हा खेळताना दिसेल, अशी आशाही जाईल्स यांनी व्यक्त केली. स्टोक्सच्या जागी इंग्लंड संघात आता क्रेग ओव्हरटनचा समावेश करण्यात आला आहे.









