कॅन्टोन्मेंट बोर्डचे रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया स्टेशनरोड येथे पथदीप नसल्याने प्रवाशांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे हा संपूर्ण परिसर अंधारात आहे. रात्रीच्यावेळी प्रवाशांना येणे-जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर पथदीपांची सोय करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रेल्वे स्टेशन येथून पोस्टमन सर्कल पर्यंतच्या मार्गावर पथदीप नाहीत. दररोज शेकडो प्रवासी रेल्वे स्टेशन व कारवार बसस्टँड येथे येत असतात. रात्रीच्यावेळी रेल्वे स्थानक परिसरात दाखल झालेल्या प्रवाशांना या अंधाराचा फटका बसत आहे. रात्रीच्या अंधारातूनच वाट काढत प्रवासी प्रवास करीत आहेत. यामुळे चोरीचे प्रकारही वाढत असल्याने या परिसरात पथदीप बसवावे अशी मागणी होत आहे.









