प्रतिनिधी/ रत्नागिरी
छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील मुदत संपलेले 11 गाळे ताब्यात घेण्यास नगर परिषद प्रशासनाकडून गाळेधारकांना यापूर्वीच नगर परिषद प्रशासनाने नोटीसा बजावलेल्या आहेत. ही कारवाई लक्षात घेत आता गाळेधारकांनीच आपल्या दुकानातील सामानासहीत साहित्य इतरत्र हलवण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.
व्यापारी गाळे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत ताब्यात घेण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला होता. त्यापूर्वी नगर परिषदेने गाळय़ा ताब्यात घेण्याची पावले उचलताच गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच नगरविकास मंत्रालयाकडे मुदतवाढीची याचना केली होती. उच्च न्यायालयाने नगर परिषदेची बाजू मान्य केली. त्यावेळी 4 आठवडय़ापर्यंत निर्णय घेऊन दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले होते. त्या आदेशामुळे नगर परिषदेने गाळय़ांची लिलाव प्रक्रिया हाती घेतली.
स्टेडियममधील 11 व्यापारी गाळे ताब्यात घेण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाकडून कारवाईसाठी वेगाने पावले उचलण्यात आलेली आहेत. त्याबाबत गाळेधारकांना नोटीसाही नगर परिषद प्रशासनाने बजावलेल्या आहेत. त्यामुळे होणारी कारवाई लक्षात घेत गाळेधारकांनी इतरत्र सामानाची हलवाहलव सुरू केली आहे.









