यंदाची आयपीएल स्पर्धा ही ‘टीव्ही-ओन्ली’ इव्हेंट झाली आहे. फक्त टीव्ही वाहिन्यांवरच थेट प्रसारण पाहता येते. स्टेडियमवर जाऊन ना सामन्याचा आनंद लुटता येतो, ना कॅमेराचा फोकस आपल्यावर पडतो! पण, राहून राहून एक प्रश्न सर्वच चाहत्यांना सतावत आहे की, जर स्टेडियममध्ये प्रेक्षकच नसतील तर सध्या टीव्हीवर समालोचन सुरु असताना त्यामागे प्रेक्षकांचा आवाज येतो तो कुठून?
प्रत्यक्षात सामन्याचा फील यावा, यासाठी आयोजकांनी ही ट्रिक शोधून काढली आहे. प्रत्यक्ष स्पर्धा सुरु असताना तेथे आयोजन समितीचे अधिकारी, सुरक्षारक्षक, स्वयंसेवक आणि दोन्ही प्रँचायझी पथकातील सदस्य वगळता अन्य कोणीही नसते. त्यामुळे, प्रेक्षकांच्या गलबलाटाशिवाय, गोंगाटाशिवाय ही स्पर्धा ‘शांत’ रितीने खेळवली जात आहे. पण, टीव्हीवर प्रत्यक्ष सामने दाखवले जात असताना मात्र प्रेक्षकांचा संग्रहित आवाज, गोंगाट अशा पद्धतीने साजरा केला जात आहे की, जणू प्रेक्षकच तेथे असावेत आणि त्यांचाच हा खराखुरा गोंगाट आहे. आयपीएल सामन्यादरम्यान सोबतच्या छायाचित्राप्रमाणे प्रेक्षकांची गॅलरी सुनसान असते. प्रेक्षक हा खेळाचा प्राण असले तरी कोरोनाच्या संकटामुळे त्याशिवायच यंदाचे आयपीएल खेळवले जाणे आयोजकांना भाग पडले आहे.









