जवळपास 67 टक्क्यांची मजबूत वाढ – एसबीआय अध्यक्ष खारा यांची माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणाऱया भारतीय स्टेट बँकेच्या डिजिटल माध्यमांच्या वापरातून करण्यात आलेल्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये बँकेच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सदरची देवाणघेवाण 67 टक्क्यांच्या घरात पोहोचली असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले आहे. हाच आकडा कोविड महामारीच्या दरम्यान 60 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली होती.
महामारीच्या दरम्यान लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे ई-कॉमर्स प्लॅटफार्मवर मजबूत वाढ होत गेली आहे. याचा सकारात्मक लाभ म्हणजे हीच स्थिती आजही वाढत असल्याचे दिसून आले आहे.
समाधानकारक आकडेवारी
ग्राहकांमधील जागरूकतेमुळे डिजिटल व्यवहारात मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती येत्या काळातही राहणार असल्याचा मला विश्वास असल्याचे एसबीआय अध्यक्ष खारा यांनी स्पष्ट केले आहे.
आरटीजीएस सुविधेची मदत
रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (आरटीजीएस) ची चोवीस तास सेवा उपलब्ध करुन देण्यासोबत नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी)च्या व्यवहारामध्ये झालेल्या वाढीमुळे डिजिटल देवाण वेगाने वाढण्यास मदत होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच बँकेचे डिजिटल योनो ऍपनेही चालू आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे.









