ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्टॅच्यू ऑफ यूनिटीला जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते. या रेल्वेगाड्या केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) येथून वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रेवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडल्या जातील.
केवडिया रेल्वे स्थानक हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट रेल्वे स्थानक आहे. आठ शहरांतून स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश झाल्यामुळे देशातील पर्यटकांना येथे येण्याची सुविधा मिळणार आहे, तर राज्याच्या महसुलातही लक्षणीय वाढ होणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या विविध ठिकाणांहून केवडिया येथे आठ रेल्वेगाड्या दाखल होणार आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवराची भव्यता केवडिया येथे आल्यावरच पहायला मिळते. केवडियाला जोडणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे स्थानिकांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.









