परवा सकाळची गोष्ट. आमचा मित्र नागजंपी ऊर्फ नाग्या घराच्या बाल्कनीत उघडाबंब उभा होता. योगासने करून बिचारा घामाघूम झाला होता. एक डोळा मिचकावीत तो फोनवर मोठमोठय़ांदा बोलत होता, “आमचं बायको नंदिनी स्टुपिड असतंय, यूसलेस असतंय. तिनं केलेलं स्वयंपाक खाऊन लाखो वेळा मी आजारी पडलंय, लाखो वेळा खूप जण आजारी पडलंय.’’
त्याची नाग्याची नागवाणी ऐकून सोसायटीत खळबळ उडाली. नाग्याचे तीर्थरूप गेली तीन वर्षे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मुलाचा निषेध करावा असं सोसायटीतल्या महिला बचत गटाचं म्हणणं होतं. पण तीर्थरूप मूग गिळून टीव्ही बघत बसले होते.
थोडय़ा वेळाने त्या घरातून नाग्याची ह्रदयद्रावक किंचाळी ऐकू आली. वीज कडाडल्याप्रमाणे नंदिनी वहिनींनी तारस्वरात काही शापवाण्या उच्चारल्या. त्यावेळी त्यांच्या घरात जाऊन आंखो देखा हालचा आनंद घेणे शक्मय नव्हते. तस्मात अस्मादिकांनी मनातल्या उतावीळ उत्सुकतेला आवर घातला. तासभर गेला. मग नंदिनी वहिनी तोंडाला मास्क लावून पिशवी-पर्स घेऊन भाजी मंडईकडे कूच करताना दिसली. नाग्याची थुलथुलीत आकृती एका हातात चहाचा कप आणि दुसऱया हातात फोन घेऊन बाल्कनीत येऊन खुर्चीत विराजमान झालेली दिसली. तेव्हा त्याला फोन लावला. फोनवर नाग्याने सांगितलेली ह्रदयस्पर्शी हकिकत अशी.
“तुम्ही मला स्टुपिड म्हणालात. माझ्या हातचा स्वयपाक खाऊन लाखो वेळा तुम्ही आजारी पडल्याचं विधान केलं. तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही स्वतःला काय समजलात?’’
बायकोचा संतप्त अवतार पाहून नाग्या गर्भगळीत झाला.
“अगं नंदिनी, मी ते विधान तुझ्याबद्दल बोलत नव्हतं. तुझ्याबद्दल मला खूप आदर असतंय. मी मघाशी व्हॉट्सपवरचं मेसेज मोठय़ा आवाजात वाचत होतं. तुझं उगीच गैरसमज झालं. तरी पण मी दिलगिरी व्यक्त करतंय.’’
नंदिनीनं हातातलं लाटणं त्याच्या डोळय़ांसमोर धरलं आणि म्हणाली, “याच लाटण्यानं लाटलेल्या पोळय़ा खाऊन तुम्ही आजारी पडलात काय?’’ आणि तिनं ते त्याच्या डोक्मयात घातलं. नाग्या जीव खाऊन किंचाळला. मग तिनं मिक्सरमधून काढलेल्या लसूण मिरचीच्या पेस्टने भिजलेली बोटे त्याच्या डोळय़ात कोंबायचा प्रयत्न केला. नाग्याच्या एका डोळय़ात मसाला गेला. दुसरा डोळा त्याने कसाबसा वाचवला.
मसाले गेलेला डोळा आता तासभर तरी बंद राहतोय.








