‘स्टिंग’मध्ये भाजपात प्रवेश करण्याचे वचन, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी/पणजी
विधानसभा निवडणूक उंबरठय़ावर येऊन ठेपलेली असताना एका हिंदी चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेसचे संकल्प आमोणकर, आवेर्तान फुर्तादो, सावियो डिसिल्वा यांच्यासह तृणमूलचे चर्चिल आलेमाव हे चारही उमेदवार गोत्यात आले आहेत.
मात्र हा प्रकार म्हणजे भाजप आणि आम आदमी पार्टी या पक्षांचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा दावा करत काँग्रेसने रात्री उशिरां मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत.
काँग्रेसला मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या भाजप आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी काँग्रेसच्या बदनामीचे हे षडयंत्र रचल्याचा आरोप काँग्रेस निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव आणि अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याचे देतात वचन
स्टिंग ऑपरेशननुसार वरील सर्व उमेदवार आपल्या विद्यमान पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाल्यास नंतर काही कोटींच्या मोबदल्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याचे वचन देत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ऑपरेशनकर्ता त्यांना प्रत्येकी 2 ते 3 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे दिसत असून हेच उमेदवार नंतर अन्य आमदारांनाही आणत असेल तर हवी तेवढी किंमत मोजण्याची तयारी दर्शवत असल्याचे ऐकू येत आहे.
प्रचार संपल्यानंतर व्हिडिओ झाले व्हायरल
निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्याच्या काही क्षणातच सदर चारही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यानंतर काही क्षणातच भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे आणि आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर हे स्थानिक पत्रकारांकडे त्यासंबंधी प्रतिक्रिया देत असल्याचा दावा गुंडूराव यांनी केला. त्यावरून हा केवळ योगायोग नसून दोन्ही पक्षांचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्यथा त्या दोन्ही नेत्यांना ही गोष्ट लगेच कशी समजली, असा सवाल गुंडूराव यांनी उपस्थित केला आहे.









