रशियन प्रतिस्पर्धी लॉपसनची एकतर्फी मात, विजेंदरचे सलग विजयाचे मनसुबे उधळले
वृत्तसंस्था/ पणजी
भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदरची सिंगची व्यावसायिक मुष्टियुद्धातील अपराजित परंपरा अखेर शुक्रवारच्या लढतीत मायभूमीतच खंडित झाली. रशियन तगडा प्रतिस्पर्धी अर्तिश लॉपसनने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत विजेंदरच्या घोडदौडीला ब्रेक लावला. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधील कांस्यजेत्या विजेंदरचा 2015 मध्ये व्यावसायिक मुष्टियुद्धात पदार्पण केल्यानंतर हा पहिलाच पराभव आहे. यापूर्वी त्याने सलग 12 लढती जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्याला येथे ब्रेक लागला आहे.
शुक्रवारी येथील मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोवर रंगलेल्या लढतीत विजेंदरने अपेक्षेप्रमाणे पहिल्या फेरीत सावध पवित्र्यावर भर दिला. हरियाणाच्या विजेंदरला लॉपसनने अधिक उंचीच्या बळावर जेरीस आणण्यात कसर सोडली नव्हती आणि त्याच्या याच तंत्राचा विजेंदरला शेवटपर्यंत फटका बसत राहिला.
व्यावसायिक मुष्टियुद्धातील सातवी लढत खेळत असलेल्या रशियाच्या लॉपसनने मांडवी नदीच्या किनाऱयावरील कॅसिनोवर विजेंदरची घोडदौड संपुष्टात आणल्यानंतर भारतीय चाहत्यांची अर्थातच घोर निराशा झाली. पाचव्या फेरीत एक मिनिट 9 सेकंदांचा खेळ झाल्यानंतर रेफ्रींनी लॉपसनला विजयी घोषित केले.
या लढतीच्या दुसऱया फेरीत 26 वर्षीय लॉपसनने विजेंदरच्या अनुभवापेक्षा आपला क्लास भारी असल्याचे दाखवून दिले. त्याने हूक व स्ट्रेट पंचचे फटके लगावत विजेंदरला चांगलेच जेरीस आणले.
6 फूट 4 इंच इतकी ताडमाड उंची लाभलेल्या लॉपसनचा मुकाबला करणे विजेंदरला प्रारंभापासून कठीण जात होते आणि नंतरही यात काहीच फरक पडला नाही. ज्याप्रमाणे लॉपसनचा खेळ दृढ आत्मविश्वासाने बहरत गेला, त्याप्रमाणे विजेंदरचे मनोधैर्य खचत गेले. त्यानंतर पुढील दोन फेऱयांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते आणि एव्हाना विजेंदर थकला देखील होता. अंतिमतः याची परिणती विजेंदरच्या पराभवात होणार होती. ती त्याप्रमाणेच झाली. पाचव्या फेरीत लॉपसनचा एक पंच विजेंदरवर आघात करुन गेला आणि लॉपसनने बाजी मारली.
तत्पूर्वी, या मुख्य लढतीपूर्वी रंगलेल्या अन्य बाऊटमध्ये अनुभवी मुष्टियोद्धा नीरज गोयतने वेल्टरवेट डीव्हिजनमध्ये संदीप कुमारला नॉकआऊट केले. चेन्नईच्या सबरी जेने अमेय कळंबेला लाईटवेट कॅटेगरीमध्ये 60-54 असे नमवले. पुढे हरियाणाच्या कुलदीप धांडाला लाईटवेट गटात उत्तराखंडच्या महेश दिगारीकडून पराभव स्वीकारावा लागला. याच गटात कार्तिक सतीश कुमारने जयपाल जनगधनचा धुव्वा उडवला. प्रुझरवेट कॅटेगरीत धर्मेंद्र गेवालला आशिष अहलावतविरुद्ध एकमताने विजयी घोषित केले गेले.









