टेलिव्हिजन विश्वात नवनवीन प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी येत्या 2 सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. फुलाला सुगंध मातीचा आणि मुलगी झाली हो असं या दोन मालिकांचं नाव असून या दोन्ही मालिकांद्वारे मुलीचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व यासारख्या सामाजिक विषयाला हात घालण्यात येणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने रंग माझा वेगळा या मालिकेनंतरचे पुढचे पाऊल म्हणून फुलाला सुगंध मातीचा आणि मुलगी झाली हो या दोन वेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी तयार केल्या आहेत. आजही कित्येक ठिकाणी वंशाला दिवा हवाच या हव्यासापोटी मुलीचा भफण गर्भातच संपवला जातो. तिच्या जगण्याचा मुलभूत हक्कच नाकारला जातो. मुलगी झाली हो या मालिकेतून याच भावनिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे साजिरीची. जिचा जन्मच तिच्या पित्याकडून नाकारण्यात आला. अश्या या साजिरीचं काय असेल भविष्य? याची भावनिक गोष्ट मुलगी झाली हो या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
मुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखिल नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱया संसाराची आहे. या दोन्ही मालिकांचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ’स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच कथेमध्ये वेगळेपणा जपत असते. ते करत असताना संपूर्ण कुटुंब ती मालिका एकत्र बघू शकेल याकडेही लक्ष असतं. मालिकेचा एखादा भाग पाहायचा राहून गेला तर काहीतरी मिस करु अशा धाटणीच्या या दोन्ही मालिकांच्या कथा आहेत. समोर येणाऱया परिस्थितीवर मात करुन कसं जगायचं आणि त्यासाठी योग्य साथ कशी असावी याचं उदाहरण म्हणजे या दोन मालिका असतील. मुलगी होण्याचा आणि असल्याचा अभिमान दर्शवणारी हृदयस्पर्शी मालिका मुलगी झाली हो आणि जोडीदार योग्य असेल तर काहीच अशक्य नाही हे सिद्ध करणारी फुलाला सुगंध मातीचा ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. 2 सप्टेंबरपासून फुलाला सुगंध मातीचा रात्री 8.30 वाजता आणि मुलगी झाली हो रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.