ऑनलाईन टीम / पुणे :
स्टारविन्स ग्रुप यांच्या वतीने दिनांक २१ ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिवलचे उद्घाटन रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार रोहित पवार आणि अभिनेते गिरीश परदेशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर आणि राज लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या फेस्टिवलमध्ये देशभरातून विविध छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे तसेच रेखाटलेली पेंटिंग्स पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाचे यंदा ५ वे वर्ष आहे. दरवर्षी क्षण छायाचित्र प्रदर्शन,पॅलेट चित्र प्रदर्शन आणि कलाधिपती छायाचित्र प्रदर्शन भरविले जाते.
फेस्टिवलअंतर्गत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान देणा-या व्यक्तींना क्षण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. इंटरनॅशनल धनूर्विद्यापटू स्वप्निल ढमढेरे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी, छायाचित्रकार आशीष काळे, कवी वैभव जोशी, अभिजीत मुथा हे यंदाचे क्षण पुरस्काराचे मानकरी आहेत.
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच असे आर्ट फेस्टिवल होत आहे. २०२० या वर्षांत कोरोनामुळे प्रदर्शनाचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे एकत्रित प्रदर्शनांचे आर्ट फेस्टिवल भरविण्यात येत आहे. फेस्टिवलच्या माध्यमातून ग्रुपने नेहमीच नवोदित छायाचित्रकर आणि चित्रकारांना संधी दिली आहे.
सोमवार दिनांक २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सकाळी १० ते ८ या वेळेत पुणेकरांसाठी फेस्टिवल खुले असणार आहे. फेस्टिवलसाठी विनामूल्य प्रवेश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी कलेची अनुभूती घेण्यासाठी फेस्टिवलला भेट द्यावी असे आवाहन स्टारविन्स ग्रुपतर्फे करण्यात आले.








