बेंगळुरातील 20 लाखांपेक्षा अधिक वाहने जाणार भंगारात
प्रतिनिधी / बेंगळूर
अलीकडे अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मांडलेल्या व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची आता जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमानुसार जुनी वाहने भंगारात टाकणे आवश्यक आहे. एखाद्यावेळेस हा नियम जारी झाल्यास बेंगळुरातील सुमारे 20 लाखापेक्षा अधिक वाहने भंगारात जाणार आहेत. वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी राबविण्याचे संकेत दिले आहेत. या धोरणामुळे वाहनधारकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
अलीकडेच बेंगळूर शहरात प्रदूषण वाढत असल्याचा इशारा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. स्पॅप पॉलिसीनुसार 15-20 वर्षावरील वाहने स्क्रॅपमध्ये टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्या वाहनांची मागणी वाढणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. 15-20 वर्षांवरील वाहनांची पहिल्यांदा आरटीओ अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या वाहनाची क्षमता पाहणार असून वाहन योग्य असल्यास टॅक्स भरून पुन्हा सदर वाहन रस्त्यावर उतरविण्यास परवानगी दिली जाणार आहे. पण वाहन वाहतुकीसाठी योग्य नसल्यास वाहन भंगारात टाकावे लागणार आहे. याचबरोबर वाहनाची क्षमता योग्य असूनदेखील वाहनाची कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास सदर वाहन जप्त करण्यात येणार आहे. पण या पॉलिसीची अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. आगामी दिवसात ही पॉलिसी येण्याची आशा आहे, असे आरटीओ अधिकारी शिवकुमार यांनी कळविले आहे.
ट्रवेल ओनर्स असोसिएशनकडून असमाधान
केंद्राच्या या पॉलिसीबद्दल राज्यातील ट्रवेल ओनर्स असोसिएशनने असमाधान व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना संघाचे अध्यक्ष राधाकृष्ण होळ्ळ यांनी, स्क्रॅप पॉलिसी करण्यापूर्वी देशातील स्क्रॅपिंग उद्योग वाढविण्याची गरज आहे. जुनी वाहने भंगारात टाकल्यानंतर त्या वाहन मालकांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी विविध सवलती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.









