पुण्यात तयार झाली कार – दुसरे मॉडेल सादर
वृत्तसंस्था / मुंबई
सर्वार्थाने नवीन, आलिशान, मध्यम आकाराची, प्रशस्त जागा, सुरक्षिततेची हमी देणारी ‘स्लाव्हिया’ ही स्कोडा इंडिया 2.0 प्रकल्पातील दुसरी मॉडेल कार स्कोडाने नुकतीच बाजारात उतरवली. पुणे येथे या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘स्लाव्हिया’च्या सादरीकरणासह स्कोडा इंडियाच्या मध्यम आकाराच्या एसयुव्ही ‘कुशक’च्या सादरीकरणानंतर यशस्वी पदार्पण करणारी नवी कोरी सेदान झेक कारनिर्मितीकर्त्यांचे हे दुसरे इंडिया-स्पेसिफिक मॉडेल आहे. स्लाव्हियाची 95 टक्के इतकी निर्मिती भारतात झाली आहे.
स्कोडा ऑटोचे सीईओ थॉमस शाफर म्हणाले की, “कुशकच्या यशस्वी लॉन्चसह आम्ही आता आमच्या नव्याकोऱया आलिशान मध्यम आकाराच्या सेदानसह आणखी लोकप्रिय सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहोत. स्लाव्हियाची निर्मिती भारतामधील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन केली आहे. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की, कुशक आणि स्लाव्हिया, दोन्ही सध्याच्या आश्वासक आणि वाढत्या बाजारपेठेत यशस्वी होतील. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपराय म्हणाले की, ‘कुशकसोबत आम्ही इंडिया 2.0 प्रोजेक्टची यशस्वी सुरुवात केली, भारतात वैश्विक भागीदारीत आम्ही जे कमावले त्याची ही ठळक वैशिष्टय़े म्हटली पाहिजेत.’ प्रतिष्ठा व स्टाईलचा मिलाफ या गाडीत दिसतोच पण सर्वोत्तम क्षमतेच्या इंजिनची जोडही याला असल्याचे ते म्हणाले.
जगभरातील बाजारपेठेत तिचे कौतुक झाले. ‘ऑक्टाव्हिया’ आणि ‘सुपर्ब’ ने तयार केलेले मापदंड स्कोडा स्लाव्हिया निर्माण करेल याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो आणि त्यामुळे या सेगमेंटमध्ये आमचे वर्चस्व अधिकच बळकट करायला मदत मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









