किंमत 17 लाखाच्या घरातः अनेक सुविधांचा कारमध्ये समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी स्कोडाने पुढच्या महिन्यासाठी खास बेत आखला आहे. सदरच्या पुढच्या महिन्यात कंपनीची खास नवी ऑक्टोव्हिया भारतीय बाजारात दाखल केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सदरची नवी कार हय़ुंडाईच्या इलांट्राला टक्कर देणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
पुढच्या पिढीला पसंत पडणारी ही नवी कार असणार असल्याचे कंपनीने सांगत सदरच्या कारची किंमत 17 लाख रुपयांच्या आसपास असणार असल्याचे सुतोवाच केले आहे. 2.0 लिटर 4 सिलेंडर टर्बोचार्जड् पेट्रोल इंजिनसह ऑक्टोव्हियाची सुधारीत आवृत्ती दाखल होणार आहे.
सदरची गाडी एप्रिलअखेर लाँच करण्याच्यादृष्टीने कंपनीने तयारी चालवली आहे. सुरूवातीला गाडीच्या बुकिंगची नोंदणी केली जाणार असून मेअखेर गाडीचे वितरण करण्याचा हेतू कंपनीने बोलून दाखवला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या गाडीचे डिझाइन जागतिक स्तरावरचे आकर्षक केले आहे. गाडीला समोरच्या बाजुला फुल मॅट्रीक्स एलइडीसह शार्प दिसणारे एलइडी हेडलॅम्प बसवण्यात आलेले आहेत. याशिवाय या नव्या गाडीत 10 इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, जेश्चर कंट्रोल, ऍडव्हान्स व्हॉईस कंट्रोल्ड डिजिटल असिस्टंट, मल्टीकलर ऍम्बीयंट लाइट, 12 स्पीकर कँटन साऊंड सिस्टीम, 5 युएसबी-सी सपोर्ट, वायरलेस चार्जिंगसारख्या सुविधा असणार आहेत.
इलेक्ट्रीक वाहन आत्ताच नाही
स्कोडा कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक मोटारी उतरवण्याबाबतचे भाष्य करताना सध्याला तरी इलेक्ट्रीक वाहने बाजारात उतरवण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. भारतीय बाजारात स्कोडाची इलेक्ट्रीक गाडी येणार का याबाबत विचारलं असता कंपनीने वरील उत्तर दिलं आहे. भारतीय बाजारपेठ ही इलेक्ट्रीक वाहनांकरीता पूर्णपणे तयार नाही आहे, तेव्हा सध्या तरी थांबणंच योग्य असल्याचे स्कोडाने म्हटले आहे.









