ऑनलाईन टीम / कोलकाता :
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गांगुली यांच्यावर एका महिन्यात दोन वेळा अँजिओप्लास्टी करण्यात आली. अपोलो रुग्णालयाचे डॉक्टर राणा दासगुप्ता यांनी गांगुली यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले.
छातीत दुखू लागल्याने गांगुली यांना 27 जानेवारीला कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. धमन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी दोन स्टेंटही टाकण्यात आल्या. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ देवी शेट्टी यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर गांगुली यांचीची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता.
तीन आठवड्यांपूर्वी निवासस्थानी व्यायाम करताना छातीत दुखत असल्याची तक्रार गांगुली यांनी केली होती. त्यानंतर त्याच्या धमनीत तीन अडथळे असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले होते. पहिली अँजिओप्लास्टी झाल्यानंतर 7 जानेवारीला त्यांना याच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.









