वृत्तसंसथा/ वॉशिंग्टन
वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने पहिल्यांदाच आपल्या सौरमंडळाच्या बाहेरील ग्रहावरून येणाऱया रेडिओ सिग्नलचा शोध लावला आहे. हे सिग्नल्स 51 प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहप्रणालीवरून येत आहेत. नेदरलँड येथील रेडिओ दुर्बीणीने लो-फ्रिक्वेंसी ऍरेचा (लोफार) वापर करत टय़ाऊ बूट्स ताऱयाच्या प्रणालीवरून येत असलेल्या रेडिओ सिग्नलचा शोध लावला आहे. याच्या अत्यंत जवळून वायूने तयार झालेला ग्रह प्रदक्षिणा घालत असून त्याला कथित ‘उष्ण गुरु’ या नावानेही ओळखण्यात येते.
केवळ टय़ाऊ बूट्स ग्रह प्रणालीतून बाहेर पडणाऱया रेडिओ सिग्नल्सचा शोध लावला असून ते बहुधा ग्रहाच्या विशेष चुंबकीय क्षेत्रामुळे निघत असावेत असे ऍस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स या नियतकालिकात प्रकाशित संशोधनपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रेडिओ सिग्नलद्वारे आम्ही पहिल्यांदाच सौरमंडळाबाहेरील ग्रहाचा पहिला संकेत सादर केला आहे. हा संकेत टय़ाऊ बुट्स प्रणालीद्वारे येत असून यात दोन तारे आणि ग्रह आहेत अशी माहिती कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक जेक डी टर्नर यांनी दिली आहे.
दूरवरील जगाचा शोध लागणार
या ग्रहाची पुष्टी पुढील अध्ययनाने झालयास रेडिओ सिग्नल्सद्वारे सौरमंडळाबाहेरील ग्रहांच शोध लावण्याचा एक नवा मार्ग खुला होणार आहे. तसेच शेकडो प्रकाशवर्षांच्या अंतरावरील जगाविषयी जाणून घेण्याची नवी पद्धत मिळणार आहे. चुंबकीय क्षेत्राच्या आधारार सौरमंडळाबाहेरील ग्रहाचा शोध लावण्यात आल्याने अंतराळ शास्त्रज्ञांना त्या ग्रहाचे स्वरुप आणि वायुमंडळाच्या वैशिष्टय़ांचा शोध लावण्यासही मदत होईल. तसेच तारे आणि त्याला प्रदक्षिणा घालणाऱया ग्रहांचा भौतिक संबंध समजून घेणे सोपे ठरणार असल्याचे टर्नर म्हणाले.
चुंबकीय क्षेत्र महत्त्वाचे
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सौरवादळांच्या धोक्यापासून वाचविते आणि या ग्रहाला जीवसृष्टीस योग्य करते. सौरमंडळाबाहेरील ग्रहावर पृथ्वीसारखे चुंबकीय क्षेत्र संभाव्य जीवनयोग्य अवस्थेत योगदान देऊ शकते, कारण हे त्याच्या वायुमंडळाला सौरवादळ आणि ब्रह्मांडाच्या घातक किरणांपासून वाचविते आणि ग्रहाच्या वायुमंडळाला नष्ट होण्यापासूनही बचावत असल्याचे टर्नर यांनी सांगितले आहे.
गुरुसारखा ग्रह दोन वर्षांपूर्वी टर्नर आणि त्यांच्या सहकाऱयांनी गुरु ग्रहाकडून येणाऱया रेडिओ सिग्नल्सचे अध्ययन केले होते आणि त्याचप्रकारचे सिग्नल सौरंमडळाबाहेरील ग्रहाकडून येण्याचा अनुमान व्यक्त केला होता. हा ग्रह गुरुग्रहासारखाच असावा असे त्यांनी नमूद केले होते. गुरु आणि अन्य ग्रहांवरून येणाऱया रेडिओ सिग्नल्सचे नमुने ब्रह्मांडात पृथ्वीपासून 40 ते 100 प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहांचा शोध लावण्यास उपयुक्त आहेत.









