दसरा, दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात
बाजार समितीचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांतून संताप
सुभाष वाघमोडे / सांगली
लॉकडानऊमुळे गेल्या तीन-चार महिन्यापासून बेदाण्याचे सौदे बंद आहेत. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोल्डस्टोअरेजमध्ये विक्रीविना तब्बल 80 ते 90 हजार टन बेदाणा पडूण आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे सौदे बंद झाल्याचा आरोप शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात असून तातडीने सौदे काढण्याची मागणी केली जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन पाळण्यात आला. जिल्ह्यातही याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीने गर्दी टाळण्यासाठी बेदाण्यासह हळद, गुळ, आदी शेतीमालाचे लिलाव पध्दतीने होणारे सौदे बंद ठेवले होते. एप्रिलमध्ये दोन आठवडे सौदे सुरू केले होते, मात्र शहरासह जिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे बाजार समितीने पुन्हा सौदे बंद ठेवले. गेली तीन-तीन चार महिन्यासून सौदे बंद आहेत. चार महिन्यांनी सोमवारी हळदीचे सौदे सुरू करण्यात आले मात्र बेदाणा, गुळ सौदे सुरू करण्याबाबत अध्याप कोणताही निर्णय झाला नाही.
नाशिक नंतर द्राक्षासाठी सांगली जिल्हा प्रसिध्द आहे. येथील द्राक्ष आणि बेदाणा देश आणि देशाबाहेर विक्रिला जातो, गत हंगामामध्ये जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी बेदाणा केला. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बेदाण्याची विक्रीच होऊ शकली नाही. गेली तीन-चार महिने सौदे बंद राहिल्याने गत हंगामातील तब्बल 80 ते 90 हजार टन बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहे. सरासर 150 रू किलोने विक्री झाल्यास याची सुमारे 1350 कोटी इतकी रक्कम होते. सौदे बंद असल्याने शेतकऱयांसमोर मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. मिरज, तासगाव, जत, कवठेमहाकांळ, खानापूर, यासह अन्य भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बेदाण्यावर चालते मात्र सौदेच बंद असल्याने ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर आर्थीक संकट उभे राहिले आहे. सध्या दिवाळीच्या सणासाठी बेदाण्याचा मोठया प्रमाणात उठाव होतो, मात्र या कालावधीत मागणी वाढल्याने दरही चढे राहतात मात्र सध्या सौदे बंद असल्याने दर म्हणावे तेवढे वाढलेले नाही, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच बेदाणा विक्रीविना पडून असल्याने शेतकऱयाला दुहरी नुकसान करावे लागत आहे.
सध्या बेदाण्याचा बाजारात 20 रूपये किलोला दर वाढला असून पिवळा 100 ते 140, हिरवा गोल 120 ते 180, काळा 40 ते 50 रू किलो इतका दर आहे. सौदे सुरू असल्यास या दरात थोडीफार वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी सध्या हजारो टन बेदाणा पडून आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. सणासुदीसाठी पैशाची गरज आहे. याशिवाय उधारी-पाधारीही भागवायची आहे. बँकांचा तगादाही सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची मोठी गरज निर्माण झाली आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत बेदाणा विक्रीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौदे सुरू होताच एकदम बेदाणा विक्रीस काढला तर मात्र दर आणखी घसरण्याचा धोकाही आहे असे झाल्यास पुन्हा शेतकऱ्यांनाच फटका सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, सर्व बाजूनी सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीमालाचे सौदे सुरू करण्याची गरज आहे. कोरोनाचा विषय हळुहळु कमी होत आहे. त्यामुळे बाजार समितीने बंद असलेले बेदाण्यासह इतर शेतीमालाचे सौदे सुरू करून आक सापडलेल्या दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
शेतकऱ्यांची लूट
सहा-सात महिने खत, पाणी घालून तसेच रात्रंदिवस कष्ट करून शेतकरी शेती पिकवितो, पिक आल्यानंतर माल मात्र विक्रीसाठी व्यापाऱ्यांच्या ताब्यात देतो, त्यावेळी दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना न राहता तो व्यापाऱ्यांना आहे. ही लुट असताना बेदाण्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. याशिवाय बॉक्सला पाच रूपये विमा, लोडींग-अनलोडींगचे पाच रूपये द्यावे लागतात असे असताना स्टोअरेज भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. बॉक्सला 50 रूपये मोजावे लागत आहे. दरात लूट, भाड्यात वाढ, हमाली, जीएसटीचा भुर्दंड अशी सर्वच बाजूंनी लूट होत असल्यानेही शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.








