बासमा बिन्त सौद आरोपाशिवाय 3 वर्षे कोठडीत : प्रकृती बिघडल्यावर सुटका
वृत्तसंस्था / रियाध
सौदी अरेबियाच्या अधिकाऱयांनी राजकन्या बासतमा बिन्त सौद आणि त्यांच्या मुलीची मुक्तता केली आहे. त्यांना जवळपास 3 वर्षांपर्यंत कुठल्याही आरोपाशिवाय तुरुंगात ठेवण्यात आले होते. एका मानवाधिकार गटाने त्यांच्या मुक्ततेची माहिती दिली आहे.
57 वर्षीय बासमा बिन्त सौद या राजघराण्याच्या सदस्या आहेत. त्यांना महिला अधिकार आणि घटनात्मक व्यवस्थेच्या समर्थक मानले जाते. मार्च 2019 मध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याचा आदेश दिला आहे.
स्वीत्झर्लंडला जाण्यापूर्वी अटक
राजकन्या बासमा यांना उपचारासाठी स्वीत्झर्लंडला जाण्यापूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु त्यांना नेमका कुठला आजार आहे याचा खुलासा कधीच करण्या आलेला नाही. राजे सलमान यांनी स्वतःचे पुत्र मोहम्मद यांना जून 2047 मध्ये स्वतःचा उत्तराधिकारी घोषित केले होते. तत्पूर्वी मोहम्मद बिन नाएफ यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. युवराज मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरेबियात सुधारणा कार्यक्रम राबवत आहेत. यात महिलांना कार चालविण्याची अनुमती देणे आणि महिलांचा पुरुष पालक होण्याची अनिवार्यता संपुष्टात आणण्यासारखी सुधारणा सामील आहे.
संभाव्य विरोधकांवर अंकुश
या सर्व सुधारणा घडवून आणल्यावरही सौदी अरेबियाच्या अधिकाऱयांनी असंतुष्ट तसेच संभाव्य विरोधकांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. महिला अधिकार कार्यकर्ते तसेच राजघराण्याच्या सदस्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागितली दाद
राजकन्या बासमा यांना अल-हेयर तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे अनेक अन्य राजकीय कैद्यांना ठेवण्यात आले आहे. राजकन्येच्या कुटुंबीयांनी यासंबंधी 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून दाद मागितली होती. स्पष्टवक्त्या असल्याने राजकन्या बासमा यांना अटक करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी म्हटले होते. राजकन्या बासमा यांना मोहम्मद बिन नाएफ यांच्या सहकारी मानले जायचे.









