ऑनलाईन टीम / रियाध :
देशातील कोरोना संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेता सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 20 देशांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी आज रात्री 9 पासून लागू होणार आहे. मात्र, या बंदीदरम्यान वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय इतर देशातून सौदीसाठी प्रवास करू शकतील.
सौदीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने देशातील जनतेला कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या या देशातील नागरिकांना फायझर आणि ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जात आहे.
संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, लेबेनॉन, तुर्कस्तान, अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स, इटली, आयर्लंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि जपान येथून सौदी अरेबियासाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.









