पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला, पण भारताचा दुःस्वास कायम
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध बिघडले असून सौदी अरेबियाने पाककडे कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला आहे. या कर्जापैकी 11 हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी चीनकडे हात पसरला आहे. चीनकडून कर्ज घेऊन सौदी अरेबियाचे कर्ज फेडण्याची वेळ आता पाकिस्तानवर आली असल्याचे दिसत आहे.
मात्र, आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असतानाही भारताचा दुःस्वास करण्याची पाकची खुमखुमी जिरलेली नाही. सीमेवर त्याच्या कागाळय़ा सुरूच आहेत. तर पाकिस्तानमधील अनेक अर्थतज्ञांनी त्या देशाच्या ढासळल्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली असून यासाठी पाक पंतप्रधान इम्रानखान यांना जबाबदार धरले आहे. तसेच सौदीचे कर्ज फेडण्यासाठी चीनकडून कर्ज घेणे म्हणजे आगीतून फुफाटय़ात अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानवर सौदी अरेबियाचे 52 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. त्यापैकी अवघे 1 अब्ज (पाक रूपयाच्या हिशेबात 11 हजार कोटी) डॉलर्सचे कर्ज फेडले जाणार आहे. पण त्यासाठीही पाकला चीनकडून नव्याने कर्ज घ्यावे लागत आहे. अशीच स्थिती राहिल्यास एक दिवस देश रसातळाला जाईल आणि चीनचा गुलाम बनून राहण्याची वेळ पाकवर येईल. तेव्हा वेळीच जागे व्हा, असा इशारा तेथील तज्ञांनी दिला आपल्या सरकारला आणि इम्रानखान यांना दिला आहे.









