द
रवषी पावसाळय़ात विजांचा कडकडाट आणि वादळी वारा ही वातावरणाची ठरलेली स्थिती असते. अशा पावसाळय़ाच्या काळात वीज चमकणे किंवा पडणे नैसर्गिकदृष्टय़ा आवश्यकच आहे, कारण तसे झाले नाही तर पाऊसही पडणार नाही. मात्र दुसरीकडे वीज अंगावर पडल्याने मोठय़ा प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडतात, तसेच इतरही अनेक प्रकारचे नुकसान होते. ही नैसर्गिक क्रिया आपण रोखू शकत नाही, मात्र त्यापासून खबरदारी घेऊन सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे वीज म्हणजे नेमके काय असते आणि ती पडण्यापूर्वी किंवा पडल्यानंतर काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊया…
वीज म्हणजे नक्की काय?
आकाशात चमकणारी वीज ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जमिनीलगत वाहणारी हवा गरम झाल्यावर हलकी होते आणि वर वर जाते. वर जाताना ती थंड होत जाते आणि थेंब तयार होतात. ही हवा अजून थंड झाल्यावर हिमकण तयार होतात. थंड हवा वजनदार असल्याने खालच्या दिशेने वाहते. या खालून वर आणि वरून खाली येणाऱया हवेतील पावसाचे थेंब आणि हिमकणांमध्ये घर्षण होते.
घर्षणामुळे विद्युतभार निर्माण होतो. ऋण भार पावसाच्या रूपात खाली येतो आणि धन भार आभाळावरच्या भागात जमा होतो. जमिनीवरही धन भार तयार होतो. ऋण भार आणि धन भार एकमेकांकडे आकर्षित होतात. यामध्ये सर्वात जवळचा वाहक पाहून वीज त्याठिकाणी पडते. आकाशातील केवळ 5 टक्के विजा जमिनीवर पडतात.

वीज कशी पडते?
विजा एकाच ढगात, दोन ढगात किंवा ढग आणि जमीन यामध्ये पडते. विजेमुळे निर्माण होणारे तापमान सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते, त्यामुळे एवढय़ा मोठय़ा तापमानाला तिथल्या हवेवर प्रचंड दाब पडतो आणि ती प्रसरण पावते. त्यावेळी विजेचा आवाज होतो. वीज तीनप्रकारे आपल्याला आघात करू शकते. वीज सरळ आपल्या अंगावर पडू शकते किंवा वीज बाजूच्या वस्तूवर पडून तिचा झोत आपल्या अंगावर येऊ शकतो किंवा वीज पडल्याने जमिनीखालील पाईप, तारा यांना तिचा धक्का बसू शकतो.
काय काळजी घ्यावी ?
विजेचा प्रकाश आणि त्याचा आवाज यात 30 सेकंदापेक्षा कमी अंतर असेल तर ती वीज आपल्यासाठी धोकादायक असते. ओल्या ठिकाणाहून त्वरित कोरडय़ा ठिकाणी जाऊन पायाखाली कोरडी वस्तू घेऊन दोन्ही पाय एकत्र करून तळव्यावर बसा. एखादे झाड असल्यास त्याच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर थांबा. झाडाच्या फांदीवर तांब्याची तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत गाढून ठेवा. जंगलात असाल तर कमीत कमी उंचीच्या आणि दाट झाडांचा आसरा घ्या. मोकळय़ा आकाशाखाली थांबू नका. खांब, तोवर, खुले मैदान, उंच झाडे यांच्याजवळ थांबू नका. घराला, शेताला, बागेला तारेचे कुंपण घालू नका. एका जागी गर्दी करून उभे राहू नका. वीज पडल्यास मानवी हृदय आणि श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी हृदयाजवळच्या भागात मालिश करावे. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.









