कोरोनाच्या उदेकामुळे लोकांच्या जीवनशैलीतच नव्हे तर बाजाराच्या स्थितीतही मोठे परिवर्तन घडत आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की काळ कितीही कठीण आला तरी महिलांची नटण्याची हौस काही संपत नाही. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या मागणीला कधी मरण नसते. तथापि, कोरोनाने ही समजूतही चुकीची ठरविली आहे. लॉकडाऊन, हालचालींवरील निर्बंध, सण-समारंभ साजरे करण्यावर बंदी आणि समाजात मिसळण्याची भीती यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या मागणीत गेल्या वर्षभरात मोठी घट झाल्याचे दिसत आहे.

याउलट शारीरिक स्वच्छतेची साधने अर्थात साबण आणि हँडसॅनिटायझर यांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मध्यमवर्गीय लोक सौंदर्यप्रसाधनांवर खर्च होणारा पैसा आता निर्जंतुकीकरणावर खर्च करत आहेत. सर्फसारख्या साबणांच्या मागणीत 25 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. अनेक लोक बाहेर जाऊन घरात आल्यानंतर कपडे धुवावयास टाकतात. त्यामुळे कपडे धुण्याच्या साबणाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच ब्युटीपार्लरच्या व्यवसायातही बरीच घट झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळात या व्यवसायावर बंदीच घालण्यात आली होती. तथापि, लॉकडाऊन उठल्यानंतरही रोगप्रसाराच्या भीतीपोटी कटींग सलून आणि ब्युटीपार्लर येथे जाण्यास लोक घाबरत आहेत. एकंदर कोरोनामुळे आपले बरेच काही बदलले आहे, ही बाब खरी.









