पाच ‘गॅरंटी’च्या योजनांवरही शिक्कामोर्तब : सिद्धरामय्या-शिवकुमारांसह आठ कॅबिनेट मंत्री
सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील यांचाही समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर स्पष्ट बहुमत मिळविलेल्या काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. शनिवारी शानदार सोहळ्यात राज्याच्या नूतन मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्रिपदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार शपथबद्ध झाले. त्याचप्रमाणे आठ आमदारांनी कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, प्रियांक खर्गे, के. जे. जॉर्ज, रामलिंगारे•ाr, जमीर अहमद खान या आठ आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. लागलीच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या पाच ‘गॅरंटी’ आश्वासनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेंगळूरच्या कंठीरवा क्रीडांगणावर शनिवारी दुपारी 12:30 वाजता सिद्धरामय्या यांनी लाखो लोकांच्या उपस्थितीत राज्याचे 31 मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा हे पद भूषवत आहेत. यापूर्वी 2013 ते 2018 या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. सिद्धरामय्यांपाठोपाठ डी. के. शिवकुमार प्रथमच उपमुख्यमंत्रिपदी शपथबद्ध झाले. त्यानंतर उर्वरित आठ मंत्र्यांनी शपथ ग्रहण केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याप्रसंगी बिगर भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्री, तसेच विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. अनेक दाक्षिणात्य अभिनेते उपस्थित होते. तसेच हजारो लोकांची उपस्थिती होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचीही उपस्थिती होती. शपथविधी सोहळ्यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “आम्ही खोटी आश्वासने देत नाही, आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो”, असे उद्गार काढले.
मंत्रिमंडळात दक्षिण कर्नाटकला प्राधान्य
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात उत्तर कर्नाटकऐवजी दक्षिण कर्नाटकाला अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. दक्षिण कर्नाटकातून 5 जण तर उत्तर कर्नाटकातून केवळ 3 मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील दक्षिण कर्नाटकातीलच आहेत. तर 8 पैकी सर्वाधिक 3 मंत्री हे अनुसूचित जातीचे आहेत. उर्वरित समुदायाच्या नेत्यांना मंत्रिपद देत काँग्रेसने जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कुरुब तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वक्कलिग समुदायातील आहेत. डॉ. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे हे अनुसूचित जातीशी संबंधित नेते आहेत. सतीश जारकीहोळी हे वाल्मिकी समुदायातील आहेत. लिंगायत समुदायाला एम. बी. पाटील यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. के. जी. जॉर्ज हे ख्रिश्चन तर जमीर अहमद खान हे मुस्लीम समुदायाचे नेते मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकले आहेत.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप
कर्नाटक मंत्रिमंडळात एकूण 34 मंत्र्यांना सामील केले जाऊ शकते. सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आठ आमदार असे एकूण 10 जणांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. उर्वरित 24 मंत्री नेमण्याचा निर्णय आगामी काळात सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार घेतील. अनेक आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच दिल्लीत पोहोचतील अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच खाते वाटपचाही प्रश्न आहे. त्यावर कोणत्या पद्धतीने निर्णय घेतला जातो, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. वजनदार खाते मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
विरोधी पक्षांचे नेते उपस्थित
शपथविधी सोहळ्यात अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. यात शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), महबूबा मुफ्ती (पीडीपी), नीतीश कुमार (संजद), तेजस्वी यादव (राजद), डी. राजा (भाकप), सीताराम येच्युरी (माकप), फारुख अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), कमल हासन (एमएनएम), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा समावेश आहे. याचबरोबर काँग्रेसमधून राहुल गांधी, प्रियांका गांधी-वड्रा, कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या शपथविधी सोहळ्यावेळी हजर होते. परंतु सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासह काही नेते मात्र उपस्थित राहिले नाहीत. कर्नाटकातील शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने आम आदमी पक्ष, बीजद, बीआरएस, वायएसआर काँग्रेस या पक्षांना आमंत्रित केले नव्हते.
कलाकारांचीही लक्षणीय उपस्थिती
शपथविधी समारंभासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली. तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन, कन्नड हॅट्ट्रीक हिरो शिवराजकुमार, गीता राजकुमार, दुनिया विजय, अभिनेत्री रम्या, उमाश्री, चित्रपट दिग्दर्शक राजेंदसिंग बाबू, संगीत दिग्दर्शक साधू कोकील आदी उपस्थित होते. त्यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या.
निकालाच्या 6 दिवसांनी सरकार
कर्नाटक निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला होता. काँग्रेसने राज्यात 224 जागांपैकी 135 तर भाजपने 66 आणि निजदने 19 जागा जिंकल्या होत्या. स्वबळावर बहुमत मिळाले असले तरीही काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मोठा गोंधळ दिसून आला होता. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दोघेही मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. परंतु अखेरीस पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना या पदासाठी पसंती दर्शविल्याने शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले.
लोकसभा निवडणुकीनंतर…..
कर्नाटकात 50-50 फॉर्म्युला ठरला असल्याचे मानले जाते. पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी राहतील. तर उर्वरित अडीच वर्षांकरता डी. के. शिवकुमार यांना सरकारचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्याचे समजते. राज्यात लोकसभा निवडणुकीची धुरा डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्री बनल्यानंतर दुसऱ्या नेत्याला हे पद दिले जाऊ शकते.
इंदिरा कॅन्टीन्स पुन्हा सुरु होणार
राज्यात सरकार स्थापन होताच काँग्रेसने प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांसंबंधीच्या निर्णयांना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. घोषणापत्रात आम्ही 5 गॅरंटी दिल्या होत्या आणि या पाचही गॅरंटी लागू करण्याचा आदेश पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाची पुढील बैठक एक आठवड्यात होणार असून यात गॅरंटी लागू करण्यात येतील असा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे. राज्यात बंद पडलेली इंदिरा कॅन्टीन्स लवकरच पुन्हा सुरू केली जातील, अशी घोषणाही सिद्धरामय्या यांनी केली.
‘गॅरंटी’चे बजेट 50 हजार कोटींचे
शपथविधी समारंभानंतर दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक नूतन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्चाखाली पार पडली. यावेळी निवडणूक जाहीरनाम्यातील पाच प्रमुख गॅरंटी योजनांच्या घोषणेसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांनी आपल्या सरकारने गॅरंटी योजना जारी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, युवा निधी, शक्ती योजना जारी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. मात्र, यासंबंधीची शर्ती आणि विस्तृत मार्गसूची जारी झाल्यानंतरच योजनांची अंमलबजावणी होणार आहे. या पाच योजनांसाठी 50 हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. कितीही कष्ट सोसावे लागले तरी त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असा पुनरुच्चार सिद्धरामय्या यांनी केला.
उद्यापासून तीन दिवस विशेष अधिवेशन
आर. व्ही. देशपांडे हंगामी सभाध्यक्ष
सोमवार दि. 22 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. हे 16 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन असणार आहे. शनिवारी रात्री यासंबंधीचा अधिकृत आदेश राजभवनातून जारी करण्यात आला आहे. तीन दिवस बेंगळूरमधील विधानसौधमध्ये तीन दिवस विधानसभेचे अधिवेशन भरविण्यासाठी राज्यपालांची परवानगी मागण्यात आली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदार या अधिवेशनावेळी शपथग्रहण करतील, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांना हंगामी सभाध्यक्ष म्हणून कामकाज चालविण्याची विनंती केली आहे. सोमवारीच नूतन विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीत 5 प्रमुख ‘गॅरंटी’चा निर्णय
गृहज्योती योजना
प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 200 युनिट वीज मोफत दिली जाईल. ही योजना कशी जारी करावी, याबाबत लवकरच तज्ञांशी चर्चा करून आराखडा तयार केला जाणार आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळ बैठकीत अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल.
गृहलक्ष्मी योजना
प्रत्येक घरातील प्रमुख गृहिणीला दरमहा 2 हजार रुपये दिले जातील. गृहलक्ष्मी योजनेला तत्वत: मंजुरी देण्यात आली असून विस्तृत रुपरेषा आणि मार्गसूची स्वतंत्रपणे जारी केली जातील. या योजनेकरिता सरकारला 1200 कोटी रुपये खर्च येईल.
युवा निधी योजना
राज्यात 2022-23 या वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदवीधर बेरोजगारांना दरमहा 3000 रु. आणि डिप्लोमा शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना दरमहा 1,500 रु. बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. दर महिन्याला 3 हजार रुपये, पदविकाधारकाला 1500 रुपये दिले जातील. नोकरी मिळेपर्यंत किंवा कमाल दोन वर्षापर्यंत हा भत्ता दिला जाईल.
अन्नभाग्य योजना
बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबाला दर महिन्याला प्रतिव्यक्ती 10 किलो मोफत तांदूळ वितरीत केले जाणार आहे. सध्या प्रत्येक सदस्याला 5 किलो तांदूळ वितरीत केले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ही योजना राबविली जाणार आहे.
शक्ती योजना
सरकारी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येईल. लवकरच यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला जाणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या चारही निगमच्या सामान्य बसेसमधून मोफत प्रवास करता येईल. परराज्यात आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही योजना महिलांसाठी लागू केली जाईल का?, याविषयी स्पष्ट आदेश आल्यानंतरच समजेल.
असे आहे मंत्रिमंडळ….
नाव जात मतदारसंघ
मुख्यमंत्री सिद्धरामय्या (कुरुब-धनगर) वरुणा
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (वक्कलिग-कृषक) कनकपूर
के. जे. जॉर्ज (ख्रिश्चन) सर्वज्ञनगर
एम. बी. पाटील (लिंगायत) बबलेश्वर
सतीश जारकीहोळी (वाल्मिकी) यमकनमर्डी
डॉ. जी. परमेश्वर (दलित) कोरटगेरे
प्रियांक खर्गे (दलित) चित्तापूर
के. एच. मुनियप्पा (दलित) देवनहळ्ळी
जमीर अहमद खान (मुस्लीम) चामराजपेठ
रामलिंगारेड्डी (रेड्डी) बीटीएम लेआऊट
कोट्स…..
काँग्रेस सरकारकडून अपेक्षाभंग
राज्य काँग्रेस सरकारने कर्नाटकातील जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. मंत्रिमंडळ जनतेने बैठकीतून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होता. महिला आजपासूनच बसमधून मोफत प्रवास करण्यास सज्ज होत्या. मात्र सिद्धरामय्यांनी निराशा केली. पाचही गॅरंटी योजनांची केवळ घोषणा केली आहे. या योजनांसाठी 50 हजार कोटी रु. खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण यासाठी निधी पुरविण्याबाबत कोणत्xही पूर्वनियोजन केलेले नाही.
– बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री
हम जो कहते है, वह करते है!
राज्यातील जनतेने द्वेषाला बाजूला करून प्रेमाला सत्तेवर आणले आहे. राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर दाखविलेला विश्वास आम्ही कायम ठेवू. काँग्रेसला निवडणुकीत मिळालेला विजय राज्यातील जनतेला समर्पित करत आहे. पक्षाने निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला जाईल. “आम्ही खोटी आश्वासने देत नाही, आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो,” असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले. राज्य भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, राज्यात मागील भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या पक्षाची ही अवस्था झाली आहे. त्यांना निवडणुकीत जनतेने चोख उत्तर दिले आहे. काँग्रेस सरकार अल्पसंख्याक, मागस, दलितांसह सर्व समुदायातील लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.









