वार्ताहर / शिये
आज रात्रीच्या सुमारास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटांत झालेल्या वळीवाच्या पावसामळे शिये-बावडा रोडवरील शिये टोलनाक्याची शेड उध्वस्त झाली आहे.
शिये परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास विजेच्या कडकडाटांत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे उन्मळुन पडली आहेत. तर काही ठिकाणी जनावरांच्या शेडवरील व घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे परीसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोलमडून पडलेल्या टोल नाक्याच्या शेडखाली ६ दुचाकी वाहने अडकली आहेत. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग जागेवर हजर झाले आहेत.








