गुप्तचर यंत्रणांचा सैन्य अन् पोलीस जवानांना सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तान एकीकडे सीमेवर घुसखोरीचे सातत्याने प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्याची गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारताच्या संवेदनशील ठिकाणांविषयी गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे कट रचत आहे. याचनुसार पाकिस्तानकडून हनीट्रॅपमध्ये पंजाबमध्ये तैनात सैनिक, पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या महिला हस्तकांनी भारतासंबंधी गोपनीय माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियावर हनीट्रॅप रचला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली असून त्यासंबंधी सैन्य आणि पंजाब पोलीस विभागाच्या जवानांना सतर्क करण्यात आले आहे.
भारतीय सैन्य, नौदल, वायुदलाचे अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांना सोशल मीडियावर पाकिस्तानी महिला हस्तकांकडून लक्ष्य केले जात आहे. सैन्य आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या नातेवाईकांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी सोशल मीडिया अॅप्सवर बनावट छायाचित्रांचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तानी महिला हस्तकांनी सोशल मीडियावर भारतीय महिलांची नावे धारण करत भारतीयांचा विश्वास सहजपणे संपादित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशाप्रकारची कित्येक बनावट प्रोफाइल ब्लॉक करण्यात आली असली तरीही लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी दरदिनी नवी प्रोफाइल्स तयार केली जात असल्याचे पंजाबमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. पंजाब पोलिसांकडून 14 अशा संशयास्पद प्रोफाइल्सची यादी जारी करण्यात आली ओ, जी भारतीय अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी तयार करण्यात आली होती. या यादीत अनिया राजपूर, अलीना गुप्ता, आन्या अन्या, दीपा कुमारी, इशानिका अहीर, मनप्रीत प्रीति, नेहा शर्मा, परीशा अग्रवाल, प्रिया शर्मा, श्वेता कपूर, संगीता दास, तारिका राज, परीशा आणि पूजा अतर सिंह यासारखी नावे सामील आहेत. स्वत:ला महिला संबोधून पाकिस्तानी हस्तक फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम समवेत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रीय आहेत.
पठाणकोटमध्ये विशेष खबरदारी
पठाणकोटचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरकमलप्रीत सिंह खख यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही संभाव्य हेरगिरीच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे. पठाणकोट हा सीमावर्ती जिल्हा असल्याने आणि भारत-पाक सीमा अत्याधिक संवेदनशील पठाणकोटपासून केवळ 26 किलोमीटर अंतरावर असल्याने आम्ही अतिरिक्त खबरदारी बाळगत आहोत. सोशल मीडियावर खोट्या छायाचित्रांचा वापर करत बनावट सोशल मीडिया अकौंट्स तयार केली जात आहेत. अशा अकौंट्सवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते आणि मग चॅट अॅप्लिकेशनचा वापर करत चॅटिंग केली जाते. आपण कुणासोबत चॅटिंग करतोय हेच संबंधिताला कधीच कळत नाही. संभाषण रिकॉर्ड करून त्याला ब्लॅकमेल केले जाते अशी माहिती त्यांनी दिली आहे.
15 दिवसांत 325 जणांशी संपर्क
मागील 15 दिवसांमध्ये बनावट सोशल मीडिया आयडीद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 325 हून अधिक जणांशी संपर्क साधण्यात आला. अशाप्रकारच्या सापळ्यात डीआरडीओ, सैन्य आणि वायुदलाचे अधिकारीही अडकले आहेत. मागील 5 वर्षांदरम्यान अनेक संरक्षण अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत.









