ट्रम्प स्वतःचा प्लॅटफॉर्म आणणार- ट्विटर-फेसबुकने घातली होती बंदी
वृत्तसंस्था / फ्लोरिडा
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुनरागमनाची तयारी करत आहेत. ट्रम्प यांना कॅपिटल हॅलवरील 6 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया संकेतस्थळांनी बंदी घातली होती. तेव्हापासून ट्रम्प हे सोशल मीडियावरून गायब झाले आहेत. ट्रम्प पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सादर करणार आहेत. ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागाराने याचा खुलासा केला आहे.
ट्रम्प यांच्या ट्विटर खात्याला ट्विटरने 9 जानेवारी रोजी कायमस्वरुपी निलंबित केले होते. ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटमुळे पुन्हा हिंसाचार भडकण्याची भीती पाहता हे पाऊल उचलले होते. ट्विटरवर ट्रम्प यांचे खाते बंद करण्यासाठी मोठा दबाव होता. मिशेल ओबामा यांच्यासह अनेक दिग्गजांनी ट्रम्प यांचे खाते बंद करण्याची मागणी केली होती. ट्विटरपूर्वी फेसबुकनेही ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. याचबरोबर स्नॅपचॅट, युटय़ूब, ट्विच आणि रेडिटनेही ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती.
अमेरिकेत मतदानाच्या (3 नोव्हेंबर) 64 दिवसांनी 6 जानेवारी रोजी संसदेत जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असताना हिंसाचार झाला होता. ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये तोडफोड आणि हिंसाचार केला होता. कॅपिटल हिल इमारतीत अमेरिकेच्या संसदेची दोन्ही सभागृहे आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या गोंधळामुळे काही काळासाठी संसदेचे कामकाज रोखावे लागले होते. या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटनने अमेरिकेवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या सैन्याच्या पराभवानंतर ब्रिटिश सैनिकांनी युएस कॅपिटलमध्ये आग लावली होती. त्यानंतर मागील 206 वर्षांमध्ये अमेरिकेच्या संसदेवर अशी वेळ ओढवली नव्हती.









