अहिल्या परकाळे/कोल्हापूर
प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचित आणि आधुनिक काळात प्रत्येक टप्प्यांत संतांपासून लोककलावंतापासून पंडीत आणि लेखक, कविंनी आपल्या कार्याने मराठीला विकसित केले. आज सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमाचा वाढता प्रभाव आणि तरुणाईची बदलती भाषा यामुळे माय मराठीवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती जरी व्यक्त होत असली तर त्यात तथ्य नाही. भक्कम पाया असलेल्या, सर्वसामावेशक असलेल्या मराठी भाषेला कोणताही धोका नाही, उलट सोशल मीडियाचा मराठीला आणखीन प्रवाही आणि समृद्ध बनवेल, असे मत मराठी विश्वातील तज्ञ, अभ्यासकांनी मांडली.
27 फेब्रुवारी हा दिवस अखंड महाराष्ट्र, मराठी माणूस आणि भाषिक मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवाने साजरा करतो. कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर अर्थात वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (27 फेब्रुवारी) हा मराठी राजाभाषा दिन म्हणून साजरा करताना मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्यास कुसुमाग्रजांचे योगदान अतुलनीय आहे. या दिवसाच्या निमित्ताने बदलते बदलत्या काळात माय मराठीच्या भविष्याबद्दल तज्ञांनी मांडलेली मते मराठीमनासाठी दिलासा देणारी आहेत.
मराठी भाषा व्यापक
मुघलांच्या काळात पारशी, आरबी भाषेचा प्रभाव होता. इंग्रजांच्या काळात इंग्रजी भाषेचे आक्रमण सुरू झाले. पण मराठी संपली नाही. उलट या भाषांना, त्यांच्यातील शब्दांना मराठीने स्वीकारले. लगतच्या राज्यातील कन्नड, तमिळ, तेलगूसह हिंदीतील शब्द देखील मराठीने स्वीकारत स्वतःला व्यापक केले, असे मत मराठीचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य श्रीधर हेरवाडे मांडतात.
साहित्य वाचनाचे प्रमाण जास्त
इंग्रजी माध्यम, सोशल मिडीया यासारखी कितीही नवीन साधन आली तरी मराठी पुस्तकांचा वाचक फारसा कमी झालेले नाही. वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, ज. मा. मिरासदार, शिवाजी सावंत यासारख्या लेखकांचे साहित्य वाचले जाते, अशी प्रतिक्रिया मेहता बुक सेलरचे अनिल मेहता यांनी मांडले.
शब्दांची वैज्ञानिक क्रांतीच
सध्या कोरोनाच्या संकटकाळात शास्त्रावर आधारीत इंग्रजी शब्दांना समुह संसर्ग, ताळेबंदी, संचारबंदी, अलगीकरण, विलगीकरण, उपचार केंद्र असे पर्यायी शब्द मराठीने दिले. ही शब्दांची वैज्ञानिक क्रांतीच म्हणावी लागेल, असे मत मराठीचे अभ्यासक, लेखक डॉ. सुजय पाटील मांडले
छत्रपती शिवरायांची लाख मोलाची दूरदृष्टी
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात मराठी राजव्यवहार कोषाची निर्मिती केली. त्यातून त्यांचे माय मराठी विषयी असणारे प्रेम आणि दूरदृष्टी दिसते, असे आठवण डॉ. शरद गायकवाड सांगतात.









