भगवान श्रीकृष्णाने जे अनेक विवाह केले त्याबद्दल स्वामी तेजोमयानंदजी म्हणतात -काही लोकांना वाटते, ‘इतके सगळे विवाह!’ जितके भगवंताचे विवाह येथे श्रीमद्भागवतात सांगितले गेले आहेत ते वास्तविक कमीच आहेत. खरे तर ह्या जगात जितके विवाह होतात ते सर्व भगवंताचेच असतात. हिंदू धर्मात तर हीच मान्यता आहे की कोणत्याही विवाहात वर म्हणजे कोणी दुसरा पुरुष नसतो. त्याला नारायण भगवानच मानले जाते आणि वधूला लक्ष्मी मानले जाते. विवाह विधीत हेच वचन आहे की ‘ही लक्ष्मी भगवान नारायणांना दिली जात आहे.’ सर्व देहांमध्ये स्थित असलेले चेतनतत्त्व म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंद परमात्माच आहे. या दृष्टीने पाहिले तरी सगळे विवाह त्यांच्याशीच तर होतात. जोपर्यंत आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत किंवा श्रीकृष्णांना ईश्वररूपात पाहण्याची दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत या विवाहांविषयी मनात शंका येतच राहतात.
इतर पुराणांमधून भगवान श्रीकृष्णांचे जितके विवाह झाले त्या सर्वांच्या कथाही सांगितल्या गेल्या आहेत. भगवंतांनी त्या सर्वांना आधीच्या अवतारात सांगितले होते की, ‘पुढच्या जन्मात मी तुमच्या इच्छा पूर्ण करीन.’ म्हणजेच ही काही एकाच जन्माशी निगडित कथा नाही. ह्या श्रीकृष्ण अवतारात भगवान किती जीवांच्या किती जन्मांच्या इच्छा पूर्ण करत होते कोणास ठाऊक? म्हणूनच तर भगवंताचा हा श्रीकृष्ण अवतार पूर्ण अवतार आहे. पूर्व काळातील सर्व वचनांची पूर्ती भगवंतांनी या अवतारात केली. ज्यांना कोणाला जी काही वचने दिली होती, ज्यांच्या ज्या ज्या म्हणून इच्छा होत्या त्या सर्व भगवंतांनी या अवतारात पूर्ण केल्या.
नरकासुराच्या कारागृहातील सोळा हजार राजकन्यांची भगवंताने सुटका केली व त्यांच्या बरोबर विवाह केले याविषयी स्वामी तेजोमयानंदजी म्हणतात-भगवंतांचे हे सर्व विवाह मोठेच विचित्र होते. ह्या विवाहांच्या बाबतीत, केवळ ईश्वरदृष्टीनेच नव्हे तर सामाजिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे.
जेव्हा कोणा व्यक्तीच्या कन्येचे अपहरण केले जाते आणि ती कन्या दुसऱया कोणाच्या घरी-राक्षसादींच्या घरी राहून येते तेव्हा तिचे आई वडीलही तिचा सहजतेने स्वीकार करण्यास राजी होत नाहीत. हे खरे आहे ना? त्यांच्या मनात कितीतरी शंका घर करतात. आई वडिलांना वाटू लागते आता हिच्यामुळे आमची समाजात अवहेलना होईल की काय? आम्ही ती कशी काय सहन करावी? अशा कन्येला टाकून देण्यास कितीतरी आई बाप तयार होतात असे समाजात दिसून येते.
भगवंतांनी विचार केला, ह्या सोळा हजार कन्या आहेत. जर यांचा कोणी स्वीकार केला नाही तर समाजाची स्थिती कशी होईल? हा तर मोठाच अनर्थ ओढवेल. इतक्मया स्त्रिया घरा-दाराशिवाय राहिल्या तर समाजाचीही सुस्थिती राहणार नाही व ह्या स्त्रियांचीही स्थिती बिघडेल. असा विचार करून भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. भगवंतांनी त्या सर्वांची इच्छापूर्ती केली हाही एक या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असू शकतो.
Ad.. देवदत्त परुळेकर








