प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यांमधून येणाऱया नागरिकांना 14 दिवस सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. पण क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांना सोळा दिवसांनंतरही मुक्त करण्यात आले नसल्याने हॉटेल रामदेव येथील काही नागरिकांनी घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना नोडल अधिकाऱयांनी अडविल्याने अधिकारी व नागरिकांमध्ये वादावादी होऊन गोंधळ झाला. अखेर पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
परराज्यांमधून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने 14 दिवस सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्याचा आदेश शासनाने बजावला होता. त्यामुळे सरकारी संस्थांसह विविध हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन राहणे पसंद केले आहे. त्यामुळे बेळगावमधील विविध हॉटेलमध्ये शेकडो नागरिक क्वॉरंटाईन आहेत. क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणी करून निगेटिव्ह अहवाल आलेल्या नागरिकांना सात दिवसात सरकारी संस्थांमधून क्वॉरंटाईनमुक्त करून होम क्वॉरंटाईन करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे. पण क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेण्यास विलंब होत आहे. क्वॉरंटाईन केलेल्या दहा-बारा दिवसांनंतर स्वॅब घेतलेल्या नागरिकांचे अहवाल पंधरा दिवसांनंतरही उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांना मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. क्वॉरंटाईन होऊन सोळा दिवस झाले तरी क्वॉरंटाईनमुक्त करण्यात आले नसल्याने हॉटेल रामदेवमधील काही नागरिकांनी बॅग घेऊन घरी जाण्याचा प्रयत्न केला. हातातील शिल्लक रक्कम संपली असून हॉटेलचे बिल कसे द्यायचे, असा मुद्दा उपस्थित करून क्वॉरंटाईनमुक्त करण्याची मागणी केली. घरी जाण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. पण नोडल अधिकाऱयांनी त्यांची अडवणूक करून स्वॅबचा अहवाल आल्याखेरीज जाता येत नसल्याचे सांगितले. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच सोडण्यात येईल. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे स्वॅबचा अहवाल येईपर्यंत थांबावे लागेल, अशी सूचना अधिकाऱयांनी नागरिकांना केली. क्वॉरंटाईन करून सोळा दिवस झाले, आणखी किती दिवस राहायचे, अशी विचारणा अधिकाऱयांना करण्यात आली. यावेळी अधिकारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली. अखेर पोलीस अधिकाऱयांच्या हस्तक्षेपानंतर वाद निवळला.









