देश-विदेशातील कंपन्यांमध्ये रंगलीय स्पर्धा: 22 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षीत: सौर प्रकल्पांना गती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशातील सौर प्रकल्प निर्मिती प्रक्रियेला चालना देण्यासाठी अभियान सुरु केले आहे. देश-विदेशातील कंपन्यांमध्ये हिस्सा घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्पर्धा सुरु आहे. देश-विदेशातील 15 कंपन्या सोलार उपकरण निर्मितीमध्ये जवळपास 22 हजार कोटी रुपये (3 अब्ज डॉलर) गुंतवणूक करण्यावर विचार करत असल्याची माहिती आहे.
यामध्ये अमेरिकेतील सिलिकॉन वेफर मेकर 1366 टॅक्नॉलॉजीज आणि फर्स्ट सोलर म्हणून ओळख असणारी कंपनी दिग्गज कंपन्यांमध्ये असून या कंपनीने निर्मिती प्रकल्पासाठी सरकारशी संपर्क साधला असल्याचेही सांगण्यात येते.
मीडीया अहवालात या कंपन्यांनी 10 गीगावॅट वेफर आणि 20 गीगावॅट सोलार सेल्स मॉडेल्स बनविण्यासाठी सरकारसोबत चर्चा केल्याचे म्हटले आहे. यासह एस्मे सोलार, विक्रम सोलार, रिन्यू पॉवर आणि अदानी सोलार यासारख्या नामवंत कंपन्यांचा यात समावेश असल्याची माहिती आहे.
पीएलआय योजना
देशातील निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने 10 प्रमुख क्षेत्रासाठी उत्पादन आधारीत सवलत(पीएलआय) योजनेची घोषणा केली आहे. सौर ऊर्जा क्षेत्राचाही यात समावेश असणार आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱया कंपन्यांना सरकार एकूण 1.97 लाख कोटी रुपयांची सवलत मिळवून देणार असल्याची माहिती आहे. यासह सरकारकडून 1 एप्रिल 2022 पासून सोलार मॉडेल्सवर 40 टक्के आणि सोलार सेलच्या आयातीवर 25 टक्के आयात शुल्क आकारण्याची योजना बनविली जात आहे.
स्वतंत्र विभाग स्थापणार
याखेरीज सरकार सागर किनारे असणाऱया राज्यात तीन मोठे निर्मिती विभाग(झोन) स्थापन करण्याचा विचार करते आहे. याशिवाय पुन्हा डोंगररांगा असणाऱया राज्यांकरीता वेगळा विभाग रचण्याचा विचार केला जात आहे. जमिनीवरची जागा जास्त असणाऱया राज्यांमध्येही स्वतंत्र विभाग स्थापन करण्यावर सरकार विचार करते आहे. सोलार कंपोनंट बाजारात आतापर्यंत चीनचा दबदबा राहिलेला आहे.









